वेध करिअरचा : मी कोण होणार यापेक्षा मी काय करणार?

करिअरच्या निवडीमध्ये मी कोण होणार? या प्रश्नापेक्षा मी काय करणार, हा प्रश्न विद्यार्थ्याने स्वतःला विचारला पाहिजे. मी कोण होणार यामध्ये स्वार्थ आहे.
Career
CareerSakal
Summary

करिअरच्या निवडीमध्ये मी कोण होणार? या प्रश्नापेक्षा मी काय करणार, हा प्रश्न विद्यार्थ्याने स्वतःला विचारला पाहिजे. मी कोण होणार यामध्ये स्वार्थ आहे.

- प्रा. विजय नवले

करिअरच्या निवडीमध्ये मी कोण होणार? या प्रश्नापेक्षा मी काय करणार, हा प्रश्न विद्यार्थ्याने स्वतःला विचारला पाहिजे. मी कोण होणार यामध्ये स्वार्थ आहे. मी काय करणार यामध्ये माझे योगदान सूचित होते. मी कोण होणार यात माझे अधिकार दिसतात. मी काय करणार यात माझ्या जबाबदाऱ्या दिसतात. मी कोण होणार यात अडचण अशी आहे, की तुला जे व्हायचे ते तू झालास की मग थंड पडणार. कारण जे व्हायचे ते झाले ना. आता पुढे काय? पण मी काय करणार यात कामाचा पूर्ण विराम लवकर येत नाही. कृतिशील राहण्याचा कालावधी मोठा आहे. मी डॉक्टर होणार असे म्हणणारा बारावी सायन्स करून ‘नीट’ची परीक्षा उत्तीर्ण होऊन एम.बी.बी.एस. शिक्षणाचा कोर्स पूर्ण करून डॉक्टर होईल. झाले काम. झाले स्वप्न पूर्ण.

परंतु मला रुग्णसेवा करायची आहे, म्हणून मला या क्षेत्रात यायचे आहे असे म्हणणारा डॉक्टर झाल्यानंतरही तळमळीने, कष्टाने त्याच्या रुग्णसेवेचा उदात्त हेतूच्या किंवा स्वप्नाच्या मागे धावत राहणार आहे. त्यातून त्याचे मोठे काम होणार आहे.

कामातील गुणवत्तेमुळे तो उत्तम नावारूपास येणार आहे. खऱ्या अर्थाने करिअर होणार आहे. मला काय करायचे आहे, हा प्रश्न खूपच मूलभूत आणि स्पष्ट उत्तर देणारा आहे. यातून करिअरचे उद्दिष्ट कळणार आहे. त्यातील स्पष्टता लक्षात येणार आहे. करिअर करतानाचे अडथळे दूर होणार आहेत. सर्वोत्तमात गाठता येणार आहे.

हेतू लक्षात ठेवा

मला क्रिकेट संघात स्थान मिळणे हे माझे स्वप्न आहे, असे म्हणणारा पहिल्या दुसऱ्या दौऱ्यानंतर बेताचा दर्जा या नावाखाली टीममधून बाहेर पडू शकतो. परंतु मला का खेळायचे आहे, मला टीममध्ये जाऊन काय करायचे आहे, मला विश्वकप जिंकून द्यायचा आहे असे म्हणणारा सचिन, विराट, गांगुली होतो. अनेक जण मात्र तेवढे मोठे करिअर करू शकत नाहीत, कारण हेतू चुकलेला असू शकतो. मला शिक्षक व्हायचे आहे आणि मला पिढी घडवायची आहे असे म्हणण्यात फरक आहे.

त्याचप्रमाणे मला इंजिनिअर व्हायचे आहे आणि मला तंत्रज्ञानाचा वापर समस्या सोडविण्यासाठी करायचा आहे यात आहे, मला आय.पी.एस व्हायचे आहे आणि आणि मला गुन्हेगारांना जेरबंद करून जनतेला कायदा सुव्यवस्था पुरवायची आहे असे म्हणण्यात आहे. खूप फरक आहे या विचार करण्यात. म्हणून मला काय करायचे हे उत्तर अधिक सक्षमपणे करिअर का करायचे ते सांगेल. तसेच मग त्यासाठी मी काय व्हायला पाहिजे, आणि म्हणून मी काय शिक्षण घेतले पाहिजे हे कळते.

त्यामुळेच मी दहावी/बारावीनंतर कोणत्या शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेतला पाहिजे ते कळते. मी कोण होणार या प्रश्नापेक्षा जेव्हा मुलांना मी काय कर्तृत्व दाखविण्यास आतुर झालो आहे ते कळेल तेव्हा उत्तमतेचा ध्यास घेतलेली नवी पिढी सकस विचारांनी काम करेल. मोठा विचार करणारा मोठे करिअर करू शकतो. तो सर्व यंत्रणेला न्याय देतो. अशा करिअरमधून पैसे, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातील समाधान, चिरकाल टिकणारे नाव, असे जणू काही सर्वच प्राप्त होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com