esakal | संधी करिअरच्या... : फार्मसीमधील करिअरची ‘सुगी’

बोलून बातमी शोधा

Career Opportuniy

संधी करिअरच्या... : फार्मसीमधील करिअरची ‘सुगी’

sakal_logo
By
विवेक वेलणकर

बारावी (HSC) विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना करिअरचे (Career) जे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील फार्मसी हा एक अत्यंत आकर्षक पर्याय आहे. फार्मसी (Pharmacy) हे प्राचीन काळापासून औषधनिर्माण शास्त्र म्हणून मानवाला ज्ञात आहे. औषधांच्या संशोधनापासून निर्मितीपर्यंत आणि गुणवत्ता नियंत्रणापासून विक्री व्यवस्थापनापर्यंत सर्व अंगांचा समावेश फार्मसी विषयात होतो. जगभरातच या उद्योगात अब्जावधी डॉलरची उलाढाल (Transaction) होते. भारतातही हे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. करोना (Corona) महामारीच्या काळात सर्व उद्योगधंद्यांना मंदीचा सामना करावा लागत असताना औषध कंपन्यांना (Medicine Company) सुगीचेच दिवस होते, हे आपण सगळ्यांनी जवळून पाहिले आहे. (Vivek Velankar Writes about Career Opportunity)

शिक्षणाचे पर्याय

बारावीनंतर फार्मसीमध्ये शिक्षणाचे तीन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे, दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम, त्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मसी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे, चार वर्षांचा फार्मसी पदवी कोर्स व तिसरा पर्याय म्हणजे सहा वर्षांचा ‘फार्म डी’ कोर्स. बारावीनंतर फार्मसी पदवी आणि ‘फार्म डी’ या कोर्सेसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्राची फार्मसी व इंजिनिअरिंग सीईटी परीक्षा घेतली जाते. याच सीईटीच्या मार्कांवर फार्मसीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटीक्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री व बायोलॉजी यांतील कोणताही ग्रुप घेणारे विद्यार्थी ही सीईटी परीक्षा देऊ शकतात. २०१८ पासून ‘नीट’ या राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या मार्कांवरही फार्मसी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू लागला आहे. महाराष्ट्रात दीडशेहून अधिक फार्मसी महाविद्यालयांमध्ये फार्मसी पदवीच्या दहा हजारांहून अधिक जागा आहेत.

येथे नोकरी मिळेल...

विविध औषध कंपन्यांमधील औषध उत्पादन प्रक्रियेत तर फार्मसी पदवीधरांची आवश्यकता असतेच, त्याशिवाय सौंदर्यप्रसाधने, साबण, सुगंधी द्रव्ये यांच्या उत्पादन प्रक्रियेतही फार्मसी पदवीधरांची आवश्यकता असते. सर्वच औषध कंपन्या संशोधनावर भरपूर खर्च करतात किंबहुना संशोधन हा या उद्योगाचा आत्माच आहे. अनेक कंपन्यांनी स्वतः ची अद्ययावत संशोधन केंद्रे स्थापन केली आहेत. ‘फार्म डी’ झालेल्या विद्यार्थ्यांना या संशोधन क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी मिळतातच, त्याशिवाय प्रक्रिया सुधारणा व संशोधन तसेच क्लिनिकल ट्रायल्स या मध्येही भरपूर संधी आहेत. या उद्योगात कच्च्या मालापासून उत्पादन प्रक्रियेतील शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी गुणवत्ता नियंत्रणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. या क्षेत्रातही फार्मसी पदवीधरांना उत्तम संधी उपलब्ध आहेत. ओषधांचे सेल्स व मार्केटींग, हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी या क्षेत्राबरोबरच फार्मा जर्नालिझम , डॉक्युमेंटेशन व लायब्ररी इन्फॉर्मेशन, फार्मा एज्युकेशन यासारख्या क्षेत्रांबरोबरच सरकारी व निमसरकारी खात्यांत ही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

भारतासह सर्व जगभरातच औषधनिर्मिती उद्योग ज्या वेगाने विस्तारत आहे, ते पाहता करोनोत्तर काळात फार्मसी क्षेत्रात करिअरच्या उज्ज्वल संधी असणार आहेत, यात शंकाच नाही.