
संधी करिअरच्या... : ‘एनडीए’मधील ‘पेट्रियोटिक’ करिअर
भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांसाठी सक्षम अधिकारी घडवण्याच्या उद्देशाने १९५५ मध्ये पुण्यात खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) स्थापना करण्यात आली. बारावीनंतर येथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. दर सहा महिन्यांनी एनडीए, तसेच नेव्हल ॲकॅडमीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रॅंचसाठी चारशे विद्यार्थ्यांची (फक्त मुलगे, मुली नाही) संपूर्ण देशभरातून निवड केली जाते. यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. पुढील प्रवेश परीक्षा ५ सप्टेंबर २०२१ रोजी होणार असून, त्यासाठीची जाहिरात ९ जून रोजी upsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. २९ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येईल. या जाहिरातीमध्ये वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा केंद्रे, शारीरिक तंदुरुस्तीचे निकष या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती दिली जाते.
परीक्षेचे स्वरूप
या प्रवेशासाठीची लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते, ज्यामध्ये अडीच तासांचे दोन पेपर असतात. पहिला पेपर गणिताचा तीनशे मार्कांचा असतो, तर दुसरा पेपर जनरल ॲबिलिटीचा सहाशे मार्कांचा असतो. यामध्ये दोनशे गुणांचा इंग्रजीचा, तर चारशे गुणांचे फिजिक्स, केमिस्ट्री, जनरल सायन्स, भूगोल, ताज्या घडामोडी अशा विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे. परीक्षेनंतर साधारण तीन महिन्यांनी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर होतो, जो upsc.gov.in या संकेतस्थळावर बघता येतो. या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील तीन महिन्यांत एसएसबी इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाते. हा इंटरव्ह्यू प्रदीर्घ, म्हणजे पाच दिवस चालतो; ज्यात दोन टप्पे असतात. यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा कस लागतो. यातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून अंतिम यादी जाहीर केली जाते. निवडलेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते व विद्यार्थी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी घेऊन उत्तीर्ण होतात. त्यानंतर त्यांच्या क्षेत्रात (आर्मी/नेव्ही/एअरफोर्स) त्यांना पुढील प्रशिक्षण देऊन भारतीय संरक्षण दलांच्या सेवेत अधिकारी म्हणून एक लाख रुपये महिना या पगारावर दाखल करून घेण्यात येते. एनडीएचे संपूर्ण शिक्षण, निवास, भोजन मोफत असते.
काही महत्त्वाच्या टिप्स
१) एनडीएमध्ये जाण्यासाठी बारावीपर्यंत सायन्स शाखा घेणे फायद्याचे असले, तरी सक्तीचे नाही. आर्ट्स, कॉमर्सचे विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतात, मात्र यासाठी अकरावी, बारावीला गणित विषय घेणे फायद्याचे ठरते. मात्र, या विद्यार्थ्यांना फक्त आर्मीमध्येच जाता येते.
२) एनडीएमध्ये प्रवेशासाठी जास्तीत जास्त संधी घ्यायच्या असतील, तर एनडीए प्रवेश परीक्षेची पहिली संधी अकरावी संपल्यानंतर लगेचच सप्टेंबर महिन्यात घ्यावी, म्हणजे (वयात बसत असेल तर ) बारावीनंतरच्या सप्टेंबर महिन्यात शेवटची संधी मिळू शकते.
Web Title: Vivek Velankar Writes About Career Opportunity
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..