संधी करिअरच्या : डिझायनिंगच्या प्रवेश परीक्षा

डिझाईन क्षेत्रात सर्जनशीलता व विश्लेषणात्मक क्षमता या दोन पैलूंचा सुयोग्य मेळ आवश्यक आहे. त्यामुळे डिझायनिंगच्या प्रवेशपरीक्षेतसुद्धा प्रामुख्याने या दोन पैलूंच्या संबंधी विद्यार्थ्यांची क्षमता पडताळून पाहण्यात येते.
संधी करिअरच्या : डिझायनिंगच्या प्रवेश परीक्षा
संधी करिअरच्या : डिझायनिंगच्या प्रवेश परीक्षाsakal

मागील लेखात आपण डिझायनिंग क्षेत्रात कोणाला करिअर करता येते आणि डिझायनिंग क्षेत्रातील विविध शाखांची माहिती घेतली. या लेखात आपण या क्षेत्रातील तीन सर्वोत्तम संस्था व त्यांच्या प्रवेश परीक्षांसंबंधी माहिती घेऊयात. या प्रत्येक संस्थेची स्वतंत्र परीक्षा व प्रवेश प्रक्रिया होते. मागील लेखात आपण पाहिलेच आहे, की डिझाईन क्षेत्रात सर्जनशीलता व विश्लेषणात्मक क्षमता या दोन पैलूंचा सुयोग्य मेळ आवश्यक आहे. त्यामुळे डिझायनिंगच्या प्रवेशपरीक्षेतसुद्धा प्रामुख्याने या दोन पैलूंच्या संबंधी विद्यार्थ्यांची क्षमता पडताळून पाहण्यात येते. या संस्थांमध्ये प्रवेशासाठी बारावी आर्ट्स/कॉमर्स/सायन्स यांपैकी कोणत्याही शाखेतून किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतात.

यंदा बारावीला असणारे विद्यार्थी या प्रवेश परीक्षा देऊ शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेत लेखी परीक्षेत साधारणपणे दोन भाग असतात. पहिल्या भागात सामान्य ज्ञान, तार्किक विचार करण्याची क्षमता, कलात्मक दृष्टिकोन, सामाजिक संवेदनशीलता या विषयांवर बहुपर्यायी प्रश्न असतात, तर दुसऱ्या भागात सर्जनशीलतेवर आधारित प्रश्न असतात. जे विद्यार्थी या लेखी परीक्षेत यशस्वी होतात, त्यांना पुढच्या टप्प्यात संस्थेत प्रत्यक्ष जाऊन सर्जनशीलतेची स्टुडिओ टेस्ट द्यावी लागते. त्यानंतर मुलाखत होऊन अंतिम निवड होते. आयआयटीच्या डिझायनिंग इन्स्टिट्यूटच्या प्रवेशासाठी मात्र फक्त लेखी परीक्षा घेण्यात येते. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ५ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या uceed.iitb.ac.in या संकेतस्थळावरून अर्ज भरता येतील. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग प्रवेश परीक्षेसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या संकेतस्थळावरून अर्ज भरता येतील. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी प्रवेश परीक्षेची जाहिरात १५ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

या महत्त्वाच्या तीनही संस्थांची माहिती पुढीलप्रमाणे

  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग

    ही १९६१मध्ये स्थापन झालेली देशातील पहिली डिझायनिंग इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेच्या आज रोजी ७ ठिकाणी शाखा असून त्यापैकी अहमदाबाद, विजयवाडा, कुरुक्षेत्र, जोरहाट व भोपाळ या ठिकाणी बारावीनंतर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालवला जातो. यात पहिले वर्ष फाउंडेशन वर्ष असते, तर नंतर उरलेली तीन वर्षे डिझायनिंगच्या आठ पैकी कोणत्याही एका शाखेत स्पेशलायझेशन करता येते. संस्थेची अधिक माहिती संस्थेच्या www.nid.edu या संकेतस्थळावर मिळेल.

  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी

    या संस्थेची स्थापना १९८६मध्ये भारत सरकारच्या कापड व वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या पुढाकाराने झाली. या संस्थेच्या आज भारतात १७ ठिकाणी शाखा असून, फॅशन डिझायनिंग, टेक्स्टाईल डिझायनिंग, लेदर डिझायनिंग, ॲपरल डिझायनिंगसह विविध कोर्सेस तेथे चालवले जातात. संस्थेची अधिक माहिती संस्थेच्या www.nift.nic.in या संकेतस्थळावर मिळेल.

  • आयआयटी मुंबई डिझायनिंग स्कूल

    भारत सरकारच्या मनुष्य संसाधन मंत्रालयाच्या पुढाकाराने मुंबई येथे १९६९मध्ये आयआयटी IDC अर्थात इंडस्ट्रिअल डिझायनिंग सेंटरची स्थापना झाली. या संस्थेत इंडस्ट्रिअल डिझायनिंग, ॲनिमेशन डिझायनिंग, व्हिज्युअल कम्युनिकेशन, व्हेईकल डिझायनिंग असे बारावीनंतर ४ वर्षांचे डिग्री, तसेच ५ वर्षांचे इंटिग्रेटेड मास्टर्स डिग्री कोर्सेस चालवले जातात. संस्थेची अधिक माहिती संस्थेच्या idc.iitb.ac.in या संकेतस्थळावर मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com