esakal | बारावीच्या तर्कशास्त्रात काय आहे नवीन? जाणून घ्या....
sakal

बोलून बातमी शोधा

What's new in 12th grade logic Science

बदललेला अभ्यासक्रम ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन लिहला गेला आहे.पाठ्यपुस्तकात एकुण सात पाठ आहेत. सर्वपाठांची मांडणी सोप्या पद्धतीने केली आहे.

बारावीच्या तर्कशास्त्रात काय आहे नवीन? जाणून घ्या....

sakal_logo
By
श्रद्धा भेगडे

तर्कशास्त्र (लॉजिक) हा महत्वाचा विषय आहे आणि सर्व शास्त्रांचा आधार आहे.योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा, ते हे शास्त्र आपल्याला शिकवते. विविध स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा तर्कशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो. यावर्षी इयत्ता बारावी तर्कशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम नवीन आहे. काय आहेत, त्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बदललेला अभ्यासक्रम ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन लिहला गेला आहे.पाठ्यपुस्तकात एकुण सात पाठ आहेत. सर्वपाठांची मांडणी सोप्या पद्धतीने केली आहे.आपण क्रमाने पाठांचा विचार करू.

पाठ 1. निर्णय पद्धती.(Decision procedure) : 
लघु सत्यता कोष्टक या पद्धतीची या पाठात ओळख करून दिली आहे. गतवर्षी विद्यार्थ्यांनी सत्यता कोष्टक या पद्धतीचा अभ्यास केला आहे. त्याच पद्धतीचे उपयोजन लघु सत्यता कोष्टकामध्ये करायचे आहे. काही वेगळे नियम व तत्त्व समजून घेऊन लघु सत्यता कोष्टक पद्धती कशी वेगळी आहे याचे अध्ययन करायचे आहे. लघु सत्यता कोष्टक पद्धती ही एकाच ओळीत मांडली जाऊ शकते, हाच एक निर्णय पद्धती म्हणून लघु सत्यता कोष्टक पद्धतीचा महत्त्वाचा फायदा आहे. सत्तेची कसोटी म्हणून लघु सत्यता कोष्टक पद्धतीचे उपयोजन करण्याची क्षमता विकसित करणे हा पाठाचा मुख्य हेतू आहे. लघु सत्यता कोष्टक एक प्रभावी व सोपी निर्णय पद्धती आहे. 

पाठ.2. नैगमनिक सिद्धता.(Deductive Proof)
नैगमनिक सिद्धतेचे 3 प्रकार आहेत. 1.प्रत्यक्ष सिद्धता(Direct proof), 2.सोपाधिक सिद्धता( conditional proof),3.अप्रत्यक्ष सिद्धता(indirect proof), मागील वर्षी विद्यार्थ्यीनी प्रत्यक्ष सिद्धतेचे अध्ययन केले. ज्यामद्धे 9 अनुमानाचे नियम (rules of inference) व 10  प्रतिनिवेशनाचे नियम(rules of replacement)शिकलो. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

युक्तिवादाची वैधता सिद्ध करण्यासाठी केवळ प्रत्यक्ष सिद्धता पुरेशी नाही. म्हणूनच आपण सोपाधिक सिद्धत, अप्रत्यक्ष सिद्धता शिकणार आहोत. या दोन्ही पद्धतीमध्ये 19 नियमांचा वापर करावा लागतो.


सोपाधिक सिद्धता पद्धतीही सोपाधिक सिद्धता तत्त्वावर आधारित आहे. निष्कर्षाचे पूर्वांग एक जादाचे आधारविधान म्हणून स्विकारले आणि त्याचे उत्तरांग नियमित केले की युक्तीवादाची युक्तता सिद्ध होते. या पद्धतीचा वापर केवळ त्याच युक्तीवादांच्या संदर्भात होतो ज्यांचा निष्कर्ष सोपाधिक विधान आहे. 

अप्रत्यक्षसिद्धता पद्धती तेव्हा वापरतात जेव्हा युक्तीवादांतील निष्कर्ष सोपाधिक विधान नसते.अप्रत्यक्ष सिद्धता विपरीत विपर्यय तत्वावर आधारित आहे. यात जे सिद्ध करायचे आहे त्याचा निषेध गृहीत धरला जातो त्यामुळे विसंगती निर्माण होते म्हणजे ही पद्धती, निषेध गृहीत धरल्यामुळे विसंगती निर्माण होते हे दर्शवून निष्कर्ष सिद्ध करणारी आहे.

भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुद्धिमत्तेतील नोकऱ्या आणि मुलाखती 

पाठ 3.विधेयतर्कशास्त्र (Predicate logic) : हा पाठ विद्यार्थींना विधान तर्कशास्त्र आणि विधेय तर्कशास्त्रयातील फरक समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. विधान तर्कशास्त्राच्या मर्यादा व विधेय तर्कशास्त्राची गरजहे समजण्यास मदत होईल. 
पाठाचा हेतू एकवाची(singular) व बहुवाची(general) विधानांचे चिन्हांकन करणे. विधानीय फलनांची संकल्पना समजून घेणे. विधानीयफलना (propositional function) पासून विधाने निष्पादीत करण्याच्या पद्धतीचे अध्ययन करणे. नैगमनीक संख्यापनाचे (Quantificational deduction) नियम व कार्यपद्धती यांचे अध्ययन करणे. नैगमनीक संख्यापन पद्धती द्वारे युक्तिवादाची युक्तता सिद्ध करण्याची क्षमता विकसित करणे.

संधी रोजगाराच्या :  कोरोनाचा कॅम्पस प्लेसमेंटवर परिणाम

पाठ.4. पारंपारिक तर्कशास्त्र(Traditional logic) :
पारंपारिक तर्कशास्त्राच्या अभ्यासामुळे तर्कशास्त्राचा इतिहास व त्याचा उत्तरोत्तर झालेला विकास हे समजण्यास उपयुक्त ठरेल. पारंपारिक तर्कशास्त्र न आधुनिक तर्कशास्त्र (modern logic) यातील फरक समजून घेण्यासाठी मदत होईल.
पाठाचा हेतू विधानांचे स्वरूप व वर्गीकरण समजून घेणे. A,E,I,O या विधानांचे वितरण समजून घेणे.अनुमनाचे(inference) व्यवहित व अव्यवहीत अनुमान हे प्रकार अभ्यासणे. प्रतियोग चैरस (opposition of proposition) समजून घेऊन त्याचे उपयोजन करण्याची क्षमता विकसित करणे. परिवर्तन(conversion) व प्रतिवर्तन(obversion) यांचे नियम व उपयोजन करणे.

पाठ. 5. संवाक्य(syllogism) 
इयत्ता बारावी मध्ये निरूपाधिक संवाक्य हा पाठ नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.ज्या मध्ये विद्यार्थी संवाक्याचे  मुलभुत नियम शिकुन त्याचे उपयोजन भावी आयुष्यात योग्य निष्कर्ष काढण्यास करतील. विविध स्पर्धापरीक्षा मध्ये जसे UPSC, MPSC,B.Ed. Law, CA.प्रवेश परीक्षा, बँक आणि रेल्वे आदी परीक्षांमधून विद्यार्थ्याची कमी वेळात तार्किक क्षमता विश्लेषणात्मक कौशल्य जाणून घेण्याचे संवाक्य(syllogism) प्रभावी व विश्वासनीय कार्यपद्धती आहे.

भारतीय तर्कशास्त्र न्याय संवाक्या व अॅरिस्टॉटलचे संवाक्या याचे स्वरूप व फरक या पाठात समाविष्ट केला आहे. भारतीय तर्कशास्त्र कोणत्याही ग्रीक विचारांचा प्रभाव नाही तर ते समृद्ध व स्वतंत्रपणे विकसित झाले आहे. भारताने तर्कशास्त्र विषयसाठी दिलेल्या योगदानामुळे विद्यार्थ्यांमधे नक्कीच गर्वाची भावना निर्माण होईल. या पाठात निरूपाधिक संवाक्याचे स्वरूप व मांडणी समजून घेणे. निरूपाधिक संवाक्याचे नियम व ख्याती अभ्यासणे.

पाठ.6. वीगमनाचे आधार(Grounds of induction) हा पाठ शास्त्रीय संशोधनातील तर्कशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करतात.
पाठाचा हेतू : विगमनाची समस्या जाणून घेणे. विगमनाचे वास्तविक व आकरिक आधार समजून घेणे. निरीक्षण पद्धती तिची वैशिष्ट्ये आणि निरीक्षणाचे दोष समजून घेणे. उचित निरीक्षणाच्या अटी समजून घेणे. प्रयोग पद्धती व तिची वैशिष्ट्ये आणि मर्यादा समजून घेणे.

पाठ 7. सिद्धांत कल्पना (hypothesis) :
हा पाठसुद्धा शास्त्रीय संशोधनातील तर्कशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करते. पाठाचा हेतू सिद्धांत कल्पनेची व्याख्या आणि वैशिष्ट्य समजून घेणे. सिद्धांत कल्पनेचा उगम समजून घेणे.उचीत सिद्धांत कल्पनेच्या अटी समजून घेणे. सिद्धांत कल्पनेचे परीक्षण समजून घेणे.अशाप्रकारे बारावी इयत्तेत तर्कशास्त्र या विषयांमध्ये काय शिकणार आहोत याचा आढावा घेतला.

महत्वाच्या सूचना : विद्यार्थ्यांनी अकरावी चे पुस्तक संदर्भासाठी ठेवावे. बारावी पाठ्य पुस्तका चे व्यवस्थीत वाचन करावे. 19 नियमांचा सराव व त्यांच्या उपयोजनांचा अभ्यास करावा.सतत स्वाध्याय करावा.

 लेखिका फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालय)