विद्यार्थ्यांनो, बारावीच्या इतिहासात काय आहे नवीन? वाचा सविस्तर

What's new in the history of Twelfth Standard
What's new in the history of Twelfth Standard

एप्रिल महिन्यात बारावीची बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके आपल्या हाती पीडीएफ स्वरूपात आली. आपल्या जवळच्या दुकानात आता पुस्तके विक्रीसाठीही उपलब्ध असतील. आपण एव्हाना पुस्तके वाचली असतील. आजच्या लेखातून आपण या पुस्तकाविषयी विस्ताराने जाणून घेऊ...
 

- अभ्यासक्रम  : इयत्ता बारावीची नवी पाठ्यपुस्तके हा अभ्यासक्रम बदलाच्या चक्रातील शेवटचा टप्पा आहे. हा अभ्यासक्रमातील बदल महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रम आराखाड्यावर आधारलेला आहे. अध्ययनातील माहितीचे ओझे कमी करणे, आजीवन शिकण्याच्या क्षमता वृद्धिंगत करणे, अभ्यासक्रमाची गुणवत्ता व व्यावहारिकता यांचे मूल्यमापन व्हावे. अभ्यासक्रमात ज्ञानरचनावादी भूमिकेचा स्वीकार व्हावा,  भारताला केंद्रस्थानी ठेवून अभ्यासविषयांची मांडणी केली जावी,  शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक व्हावा. तस्च आशयाचे नव्हे; तर अध्ययन प्रक्रियेचे मूल्यमापन केले जावे. या घटकांवर नवा पाठ्यक्रम आधारित आहे. अभ्यासक्रमातील पुनरावृत्ती व पारिभाषिक संज्ञातील विसंगती टाळण्यासाठी प्राथमिक स्तरापासून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत एकत्रित समन्वय व विचार केलेला आहे. उच्च माध्यमिक स्तरावर नवे प्रवाह, वर्तमानाची सखोल जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी हा विचार केला आहे. पाठ्यक्रमाची रचना व पाठ्यपुस्तकाचे लेखन प्रकल्पपूरक आहे. पाठ्यक्रम विद्याथ्यांना स्वयं अध्ययनास प्रवृत्त
करणारा आहे. 
विज्ञान शाखेत करिअर करायचय मग `हे` वाचाच

- आशय : या पाठ्यपुस्तकात भारताला केंद्रस्थानी ठेवून जागतिक घटनांचा आढावा घेतलेला आहे. ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांची साखळी उलगडण्यावर भर दिला आहे. या पाठ्यपुस्तकात एकूण दहा घटक असून या घटकांवर आधारित बारा पाठ आहेत. इतिहास म्हणजे घटनांची साखळी. या साखळीला स्थळाचे बंधन नाही. एखाद्या ठिकाणची घटना प्रादेशिकरित्या / भौगोलिकदृष्ट्या दूर असलेल्या प्रदेशाच्या इतिहासावरही प्रभाव पाडू शकते. प्रबोधन आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली. औद्योगिक क्रांतीचे दृश्य परिणाम म्हणजे वाढता वसाहतवाद आणि साम्राज्यवाद. युरोपातील प्रबोधनयुग आणि क्रांतियुगामुळे साम्राज्यवाद वाढीला लागून आशिया, आफ्रिका खंडात वसाहतीकरणाची प्रक्रिया वाढीला लागली. आशिया खंडातील भारत हा मोठा देश युरोपीयनांच्या साम्राज्यतृष्णेला बळी पडला. भारत ब्रिटिशांची वसाहत बनला. या वसाहतवादाच्या स्पर्धेत भारताच्या भूमीवर युरोपीय सत्तांमध्ये लढाया झाल्या. या युरोपीय सत्तांना महाराष्ट्राने कसा विरोध केला, हे ‘वसाहतवाद आणि महाराष्ट्र’ या पाठातून अभ्यासता येईल. भारतात आलेल्या सर्वच युरोपीय सत्तांशी छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवे काळापर्यंत झालेल्या संघर्षांचा आढावा या पाठात घेतला आहे. या पाठाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदर्शितत्व अभ्यासण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतात ब्रिटिशांनी हळूहळू नोकरशाहीची उतरंड रचली, लष्कराची उभारणी केली. भारताच्या शेजारी देशांशी असलेले तत्कालीन आर्थिक आणि राजकीय हितसंबंध याचीही माहिती मिळेल. एवढ्या विस्ताराने प्रचंड असलेल्या देशाचा राज्यकारभार केवळ मूठभर ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या मदतीने चालविणे अशक्य आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी भारतीयांना शिक्षण द्यायला सुरवात केली. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या तरुण वर्गाने भारतात सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळी घडवून आणल्या, आणि राजकीय चळवळीची पार्श्वभूमी तयार झाली. सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळी या घटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक ‘का’ ची उत्तरे शोधायची संधी मिळेल. युरोपातील प्रबोधन आणि भारतातील वैचारिक जागृती यातील फरक, भारतातील सामाजिक – सांस्कृतिक परिस्थिती आणि तिचा आजही टिकून असलेला प्रभाव यासारख्या अनेक बाबींवर विद्यार्थी स्वत: आपले मत मांडू शकतील, अभिव्यक्तीच्या संधी येथे साधता येतील. 
भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून ते स्वातंत्र्यापर्यंतचा कालावधी म्हणजे जनआंदोलनाचे विविध टप्पे दर्शविणारा कालावधी. 1857 चे युद्ध, मवाळ युग, जहाल युग, गांधी युग, क्रांतिकारी चळवळी आणि सशस्त्र लढे, समतेसाठीचे लढे, स्वातंत्र्योत्तर काळातील संस्थानांचे विलीनीकरण आणि वासाहतींची मुक्तता यासारख्या घटना या घटकात अभ्यासता येतील. याच बऱ्याच मोठ्या कालखंडात मोठ्या जागतिक घडामोडी झाल्या. दोन महायुद्धे लढली गेली. ब्रिटिशांची वसाहत म्हणून भारतावर या युद्धांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम कसा झाला, निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला त्यामुळे चालना कशी मिळाली, हे अभ्यासता येईल. 


पुढील घटकात निर्वसाहतीकरणाच्या नंतर बदललेली जागतिक परिस्थिती, जगाची दोन विचारसरणीत झालेली विभागणी, त्यामुळे उद्भवलेले शीतयुद्ध, जागतिक राजकारणाची बदललेली समीकरणे याविषयी अभ्यासता येईल. स्वातंत्र्योत्तर काळात भारताला ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागले, आणि जागतिक परिस्थितीत स्वतंत्र भारताचे स्थान याविषयी अभ्यासता येईल. शीतयुद्ध अखेरीस जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाची लाट घेऊन आले. जागतिकीकरणाचा भारताच्या सामाजिक – सांस्कृतिक परिस्थितीवर कसा प्रभाव पडला , भारत कसा बदलत गेला हे बदलता भारत या घटकातून अभ्यासता येईल. या दरम्यान दैनंदिन घटनांवर प्रभाव टाकणाऱ्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील घटनांचा परामर्श घेता येईल. यातील कित्येक बाबी विद्यार्थ्यांच्या अनुभव कक्षेतील आहेत. त्यांचा थेट अभ्यास विद्यार्थी करू शकतील. अश्या पद्धतीने जवळजवळ पाचशे वर्षांच्या कालावाधीतील जागतिक आणि स्थानिक घटनांचा आढावा घेणारे हे पाठ्यपुस्तक आहे. 

थोडक्यात, इयत्ता बारावीच्या पाठ्यपुस्तकांतील आशयाबाबत पुढील गोष्टी सांगता येतील. स्थानिक संदर्भांसह आशय विकसन केले आहे. ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांची साखळी उलगडण्यावर भर दिला आहे. आशयाची मांडणी अशा पद्धतीने केली आहे की जयाआयोगे विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारशक्तीला चालना मिळेल. संकल्पनात्मक आणि प्रक्रियात्मक स्पष्टीकरणावर भर दिलेला आहे. 

- मूल्यमापन 
लॉकडाउनमुळे अकरावीची द्वितीय सत्र परीक्षा न झाल्याने कदाचित तुम्हाला बदललेल्या मूल्यमापन पद्धतीचा सर्वार्थाने आवाका आला नसेल. अनेक नव्या प्रकारचे प्रश्न बारावीच्या कृतीपत्रिकेत असतील. 

कृतीपत्रिकेत जे वेगळे प्रश्न नव्याने समाविष्ट केले आहेत,  त्यांची माहिती :

- संकल्पनाचित्र पूर्ण करा : विद्यार्थी ज्ञानाची रचना पूर्वज्ञानावर आधारित करतात. मागील इयत्तांमधील आशयाची जोडणी नवीन ज्ञानाशी करतात. पाठातील मध्यवर्ती संकल्पना व तिचे उपविभाग यातील परस्परसंबंध चित्र/तक्ता/आकृती यातून स्पष्ट करता येतो. या प्रश्नप्रकारामुळे पाठातील आशयाचे आकलन सुलभ होते. विद्यार्थ्यांना पाठातील प्रमुख संकल्पना नेमक्या स्पष्ट पद्धतीने मांडता येतात.

- तक्ता पूर्ण करा/ओघतक्ता तयार करा : विद्यार्थ्यांना उपलब्ध माहिती सुनियोजितपणे तक्त्याच्या मदतीने मांडता येते. दोन घटकांमधील परस्परसंबंध तक्ता/ओघतक्त्याच्या मदतीने स्पष्ट करता येतो व ऐतिहासिक संकल्पनांचे आकलन सुलभतेने होण्यास मदत होते.

- नकाशाचे निरीक्षण करून उत्तरे लिहा : या प्रश्नप्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षण कौशल्याला चालना मिळते. विद्यार्थ्यांना स्वमत प्रकटीकरणाची संधी मिळते. नकाशा हे इतिहास अभ्यासाचे प्रमुख साधन आहे. ही जाणीव विकसित होते. त्याबरोबर विद्यार्थ्यांचे विचार जाणून घेण्याची संधी मिळते.

- ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना संबंधी नावे लिहा : इतिहास अभ्यासात विशिष्ट घटना, व्यक्ती, ठिकाणे यांचे स्थान महत्त्वपूर्ण असते. त्यातील कार्यकारण संबंध समजावा यासाठी या प्रश्न प्रकाराचा समावेश केला आहे.

- दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा : घटनांमधील कारणमिमांसा, कार्यकारणभाव जाणण्याची क्षमता विकसित होईल म्हणून या प्रश्नप्रकाराचा समावेश केला आहे.

अभ्यास कसा करायचा?
आपणास अजून महाविद्यालयात जावून अभ्यास करता येत नाहीये. काही ठिकाणी इंटरनेट च्या मदतीने अभ्यास सुरू झाला असला, तरीही सगळीकडे अशी परिस्थिती नाही. यासाठी आपण स्वयंअध्ययन सुरू करणे गरजेचे आहे. 

अभ्यास करताना पाठ्यपुस्तकांचे सखोल वाचन ही महत्त्वाची बाब आहे. 
पाठ्यपुस्तक वाचन करतानाच पाठातील महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवा . one liners म्हणजे प्रत्येक पाठातील काही महत्त्वाचे शब्द , ठिकाणे, व्यक्ती, घटना यांच्या नोंदी करून ठेवा. यामुळे आपोआपच वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी होईल. 

अवांतर वाचन वाढविले, तर उत्तर लिहिताना उदाहरणे देवून स्पष्टीकरण करता येईल. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी वृत्तपत्रे, समूह माध्यमे यांच्या मदतीने जाणून घेणे, अभ्यासविषयांशी संबंधित चित्रपट/चित्रफिती पहाणे, इंटरनेट च्या मदतीने अधिक माहिती मिळविणे हे सहज शक्य आहे. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही दडपण वा ताण न घेता अभ्यास चालू ठेवावा. हळूहळू जसा लॉकडाउन शिथिल होईल, परिस्थिती , जनजीवन पूर्वपदाला येईल, तसे आपल्यालाही अभ्यासाशी जुळवून घेणे सोपे जाईल. यासाठी थोडासा का होईना, अभ्यासाशी संबंध जुळवून ठेवणे गरजेचे आहे. 

शिक्षकांनाही या कालावधीचा उपयोग करून अध्यापन साहित्य तयार करणे, दैनंदिन अध्ययन-अध्यापनाचे नियोजन करून ठेवणे,  बदललेल्या मूल्यमापन पद्धतीनुसार प्रत्येक पाठावरील प्रश्न काढून ठेवणे अशी कामे करता येतील.
 

 ( लेखिका फर्ग्युसन महाविद्यालय शिक्षिका आहे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com