
Job Switch : या महिन्यांत चुकूनही घेऊ नका नोकरी बदलण्याचा निर्णय; योग्य वेळ कोणती ?
मुंबई : प्रत्येक कंपनीमध्ये असे काही कर्मचारी असतात जे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी चिकटून बसतात. ते कंपनीला आणि कंपनी त्यांना कधीच सोडत नाही. असे काही लाडके कर्मचारी सोडले तर बरेच तरूण कर्मचारी असे असतात ज्यांना दर काही वर्षांनी एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू होणे आवश्यक वाटते.
काही जणांना दुसरी नोकरी शोधायला सुरुवात केल्यानंतर लगेच नोकरी मिळते; तर काही जणांना मात्र दिवसेंदिवस वाट बघूनही नोकरी मिळत नाही. हे असं होण्यामागे नेमके काय सिक्रेट्स आहेत जे कोणताच एचआर कधीच तुम्हाला सांगत नाही... पाहू या.
हेही वाचा: Job Loss : जगभरात कर्मचारीकपात; मात्र भारतीय लोक स्वेच्छेने सोडतायत नोकऱ्या
नोकरी बदलण्याची एक ठरावीक वेळ असते. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांमध्ये बहुतांश कंपन्या त्यांचं वार्षिक आर्थिक नियोजन करतात. त्यामुळे किती कर्मचाऱ्यांची भरती करायची हे याच काळात ठरतं आणि भरपूर रिक्त जागा (job vacancies) खुल्या होतात. मुलाखत सत्र सुरू होते व कर्मचाऱ्यांना ऑफर लेटर्स दिले जातात.
या काळात ऑफर लेटर्स मिळालेले कर्मचारी एप्रिल, मे, जून या काळात आधीची नोकरी सोडतात आणि दुसऱ्या ठिकाणी रुजू होतात. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या काळात नोकरी सोडणे धोक्याचे असते; कारण या काळात मर्यादित व्हॅकेन्सीज असतात.
नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात तुम्ही दुसऱ्या नोकरीसाठी तयारी करू शकता. बाजारात नव्याने आलेले तंत्रज्ञान, कौशल्य शिकून घेण्याला प्राधान्य द्या.
हेही वाचा: Job Loss : मेटा आणि मायक्रोसॉफ्टनंतर आता अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
या सर्व नियमांचा विचार करून तुम्ही जॉब स्वीच करणार असाल तर तुमच्यासाठी नोकरी बदलण्याचा प्रवास थोडा कमी त्रासदायक होईल. अन्यथा अनेकदा नोकरीच्या शोधात कर्मचारी जेरीस येतात आणि मानसिक आरोग्य बिघडते.