Punjab Election Results 2022 l शहीद आझम भगतसिंग यांच्या गावात उद्या शपथ घेणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagwant Mann

शहीद आझम भगतसिंग यांच्या गावात उद्या शपथ घेणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री

पंजाब : पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धूच्या (Navjot Singh Sidhu) पंजाब मॉडेलपेक्षा पंजाबच्या नागरीकांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर अधिक विश्वास ठेवला. आणि आम आदमी (AAP) पक्षाने काॅंग्रेसचा (Congress) बालेकिल्ला हस्तगत केला. आता मुख्यमंत्री ( Punjab CM) कोण होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान भगवंत मान (Bhagwant Mann) हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे निकालांनी स्पष्ट केले आहे. शहीद-ए-आझम भगतसिंग यांची भूमी असलेल्या खटकर कलान येथे ते शपथ घेणार आहेत. तर चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) हे उद्या राजीनामा देतील.

हेही वाचा: Uttarakhand l धामींच्या पराभवानंतर CM पदासाठी भाजपातील चार जणांची नावे चर्चेत

आम आदमी पक्षाने राज्यातील ११७ पैकी ९२ जागा जिंकल्या आहेत. १९९७ मध्ये शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पार्टी या युतीने जिंकलेल्या ९३ जागांपैकी पक्षाला एक जागा कमी पडली. तरीही हा एकाच पक्षाचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. यापूर्वी २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने ७७ जागा जिंकून असाच विजय मिळवला होता.

२०१७ च्या निवडणुकीत आपने २० जागा जिंकल्या होत्या. अकाली दलाने १५ तर भाजप ३ आणि लोक इन्साफ पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र आपने बाजी मारली आहे. तर सत्ताधारी काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांना १८ जागांवर समाधान मानावे लागले. शिरोमणी अकाली दल आघाडीने चार, भाजपने दोन आणि एक अपक्ष उमेदवार जिंकला आहे.

हेही वाचा: यूपीत भाजपाचा झेंडा; असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ये कामयाबी है...

आपने आजच्या निकालाने सर्व दिग्गजांना धूळ चाटायला लावली आहे. तर प्रकाश सिंग बादल, सुखबीर सिंग बादल, बिक्रम सिंग मजिठिया, कॅप्टन अमरिंदर सिंग, बीबी राजिंदर कौर भट्टल, सलग सहा वेळा विजयी झालेले परमिंदर सिंग धिंडसा, सभापती राणा केपी सिंग, काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, मनप्रीत बादल या सवा सर्वांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे.

मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही जागा गमावल्या आहेत. तर चन्नींच्या मंत्रिमंडळातील केवळ सहा मंत्र्यांना त्यांच्या जागा वाचवता आल्या. यामध्ये सुखजिंदर रंधवा, तृप्त राजिंदर सिंग बाजवा, अरुणा चौधरी, परगट सिंग, सुखबिंदर सिंग सरकारिया, अमरिंदर सिंग राजा वाडिंग आणि राणा गुरजीत सिंग यांचा समावेश आहे. मात्र मुख्यमंत्र्यांसह ११ मंत्र्यांना आपल्या सीट्स वाचवता आल्या नाहीत.

हेही वाचा: 'यूपी'त भाजपाचा दणदणीत विजय; लखनऊमध्ये योगी पोहचताच गुलालाची उधळण

एक मौका केजरीवाल को, एक मौका भगवंत मन को' असा नारा देणाऱ्या 'आप'ने दिल्लीतील सुशासन आणि सरकारी शिक्षणातील सुधारणांचा मुद्दा तर मांडलाच, पण आपल्या कामगिरीवर ही प्रकाश टाकला. त्याचवेळी पंजाबमधील वाहतूक, वाळू माफिया, बेरोजगारी आणि लाल फितीचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी काँग्रेससह शिरोमणी अकाली दलावर जोरदार हल्लाबोल केला. केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या रूपाने पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा नवा चेहरा दिला आहे.

स्वच्छ आणि निष्कलंक असल्याने काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाकडे थेट मान यांच्यावर हल्ला करण्याचे कोणतेही हत्यार नव्हते. दोन्ही पक्षांनी मान यांच्या दारूच्या सवयीबद्दल हल्लाबोल केला. मात्र त्या बदल्यात आप ने काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या नातेवाईकांवर ईडीने छापा टाकला होता हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांच्यावर ट्रान्सपोर्ट घोटाळ्याच्या मुद्द्यावरून आरोप- प्रत्यारोप केले.

हेही वाचा: दलित मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न फसला; काँग्रेसच्या बालेकिल्यात 'आप'चा झेंडा

शिरोमणी अकाली दल असो वा काँग्रेसने केजरीवालांचे दिल्ली मॉडेल नाकारण्यावर अधिक भर दिला. असे असतानाही पंजाबमध्ये 'झाडू' असा चालला की मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, कॅप्टन अमरिंदर सिंग, प्रकाशसिंग बादल, सुखबीर बादल यांसारखे नेत्यांना मात्र पराभव स्विकारावा लागला.

Web Title: Chandigarh Bhagwant Mann Punjab Aap Cm Punjab Election 2022 Results Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top