
Kasba ByPoll Result: धंगेकरांच्या विजयामागची 'पाच' कारणं; शिंदे-फडणवीसांनी तळ ठोकूनही फायदा नाही
पुणेः ज्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. त्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तळ ठोकूनही काही उपयोग झाला नाही. कसब्यातल्या जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरभरुन मतं दिली.
कसबा पेठ हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे आपण देऊ तो उमेदवार निवडून येईल, अशी शाश्वती भाजपला होती. प्रचारात पुढे-पुढे परिस्थिती बदलली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कसब्यात तळ ठोकावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर रात्री-अपरात्री मतदारांना भेटत होते. भाजपने या निवडणुकीचा धसका घेतल्याचं शेवटी-शेवटी लक्षात आलं होतं.
भाजपने पूर्ण ताकद लावूनही कसब्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. महत्त्वाचं म्हणजे पेठेतल्या मतदारांनी भाजपला नाकारुन धंगेकरांना पाठबळ दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजपने टिळकांना उमेदवारी नाकारल्याने मतदार नाराज असल्याचं सांगितलं जातं. हे एक महत्वाचं कारण हेमंत रासनेंच्या पराभवाचं असल्याचं समोर येतंय. दुसरं कारण यावेळी कसब्यात थेट दुरंगी लढत झाली. यापूर्वी कसब्यामध्ये तिरंगी लढती झालेल्या आहेत. या लढतींमुळे कसब्यातल्या मतदारांच्या भरोशावर भाजपला विजय सोपा होत होता.
रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचं तिसरं कारण ओबीसी उमेदवार असल्याचं सांगितलं जातं. भाजपने ब्राह्मण समाजाला डावलून हेमंत रासनेंना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसनेही ओबीसी उमेदवार रिंगणात उतरवला. आधीच टिळकांमुळे नाराज झालेली ब्राह्मण मतं भाजपपासून आणखीच दुरावली.
या निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचं मोठं आणि महत्त्वाचं कारण धंगेकरांचं काम. रवींद्र धंगेकर हे ग्राऊंडवर काम करणारे नेते आहेत. आपला माणूस आणि कामाचा माणूस म्हणून धंगेकरांची ओळख आहे. ते इतके साधे राहतात कसब्यात त्यांना कारमध्ये फिरलेली कुणी बघितलेलं नाही.
यानंतर मनसे फॅक्टर कामी आल्याचं राजकीय जाणकार सांगतात. मनसेच्या स्थानिक नेत्यांनी हेमंत रासने यांना मदत केल्याचं उघड गुपित आहे. याच पाच कारणांमुळे आज विजयाची माळ रवींद्र धंगेकरांच्या गळ्यात पडलेली आहे.