कसब्यातल्या दारुण पराभवानंतरही चंद्रकांत पाटलांना आत्मविश्वास, ...पुन्हा कमळ फुलवू! Kasba By Election Result | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba By Election Result

कसब्यातल्या दारुण पराभवानंतरही चंद्रकांत पाटलांना आत्मविश्वास, ...पुन्हा कमळ फुलवू! Kasba By Election Result

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये कसब्यात अत्यंत चुरशीची लढाई झाली.

या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या ३० वर्षापासून बालेकिल्ला असणाऱ्या भाजपला निवडणूक अवघड का गेली याचे कारण शोधण्यासाठी भाजपला नक्की विचार करावा लागणार आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कसब्यात तळ ठोकून होते.

सोबतच राज्यातीन ढीगभर नेते प्रचारात होते तरी देखील काँग्रेसने त्यांना अस्मान दाखलवं. भाजपने कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. दरम्यान कसब्याच्या निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी ट्विट केलं आहे की, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील‌ जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत.

या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू! असं ट्विटमध्ये लिहिले आहे.

मात्र धंगेकर यांच्या विजयानंतर काही लोकांच्या व्हाट्सएपवर स्टेटस झळकले होते की, कसबा तो झाकी है कोथरूड अभी बाकी है. त्यामुळे आता काँग्रेस कोथरूडमध्ये देखील विजयाची तयारी करणार काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.