Rajasthan Election : राजस्थानमध्ये भाजपकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही, तर काँग्रेसकडून १५ उमेदवार रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan Election : राजस्थानमध्ये भाजपकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही, तर काँग्रेसकडून १५ उमेदवार रिंगणात

Rajasthan Election : राजस्थानमध्ये भाजपकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही, तर काँग्रेसकडून १५ उमेदवार रिंगणात

पाली (राजस्थान): राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागांपैकी १९९ जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार यावेळी भाजपकडून मुस्लिम समाजातील एकाही व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही, याउलट सत्ताधारी काँग्रेसने १५ विधानसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार दिले आहेत.

दरम्यान, भाजपने मुस्लिम उमेदवार दिले नसले तरी काँग्रेसने दिलेल्या मुस्लिम उमेदवारांविरोधात तीन ठिकाणी साधुसंतांना दिली आहे. यापैकी दोन मतदारसंघात त्यांचा सामना काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारांविरोधात आहे.

मागील निवडणुकीत भाजपने केवळ एक मुस्लिम उमेदवार दिला होता, पण त्याचाही पराभव झाला. तर काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या १५ मुस्लिम उमेदवारांपैकी ८ जणांचा विजय झाला होता. यावेळीही काँग्रेसने १५ मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. जयपूर विभागाची लोकसंख्या सुमारे सव्वा पाच कोटी आहे, यापैकी ६२ लाख लोकसंख्या मुस्लिम समाजाची आहे. विभागातील ४० विधानसभा मतदार संघावर मुस्लिम समाज प्रभाव पाडू शकतो. यापैकी १६ मतदारसंघात यापूर्वी मुस्लिम उमेदवार विजयी झाले आहेत तर उर्वरित २४ मतदार संघात ‘मुस्लिम व्होट बँक’ मजबूत आहे.

जयपूर हा मुस्लिमांचा प्रभाव असलेला मतदारसंघ आहे. पण याठिकाणी गेल्या तीन निवडणुकीत काँग्रेसने कधीही मुस्लिम चेहरा दिला नव्हता. यावेळी भाजप आणि काँग्रेसनेही उमेदवार बदलले आहेत. भाजपकडून बालमुकुंद आचार्य तर काँग्रेसकडून आर. आर. तिवारी रिंगणात उतरले आहेत.

दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अणुचाचणी घेतलेल्या पोखरण विधानसभा मतदार संघात काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार सालेह महंमद तर भाजपकडून आचार्य प्रतापपुरी रिंगणात आहेत. काँग्रेसचे महंमद हे यापूर्वी तीनपैकी दोन निवडणुकीत फार कमी मताधिक्याने विजयी झाले होते, पण २०१८ च्या निवडणुकीत ते तब्बल ३४ हजार मतांनी पराभूत झाले होते. यावेळी पुन्हा या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांतच लढत आहे.

याच विभागातील तिजारा मतदारसंघात काँग्रेसच्या इम्रान खान यांच्याविरोधात भाजपने आचार्य बालकनाथ यांना उतरवले आहे. खान यांना या निवडणुकीत बसपाने उमेदवारी दिली होती, पण ती नाकारून रातोरात ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली.

टॅग्स :Rajasthanelection