
हैदराबादः तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) सहभागी होणार नसल्याची घोषणा केल्यानंतर टीडीपीच्या मतदात्यांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी तेलंगणातील सर्व पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
टीडीपीच्या मतदारांना स्वतःच्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी, गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेले आणि नुकतेच जामिनावर सुटलेले टीडीपीचे प्रमुख एन.चंद्राबाबू नायडू यांच्याबाबत सर्व पक्षातील नेते उघडपणे सहानुभूती व्यक्त करत आहेत. भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगण सरकारमधील मंत्री पी. अजय कुमार हे आंध्र प्रदेशाच्या सीमेलगतच्या खम्मम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
‘‘नायडू आणि माझ्या वडिलांचे स्नेहपूर्ण आणि खूप जवळचे संबंध होते. ते कायम एकमेकांची विचारपूस करत असत, नायडू यांनी खम्मममध्ये आयोजित केलेल्या रॅलीमध्येही आम्ही सहभागी झालो होतो. त्यांना झालेली अटक ही बेकायदा होती’’ अशी प्रतिक्रिया अजय कुमार यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे खम्मम येथील काँग्रेसचे उमेदवार तुम्माला नागेश्वर राव यांनी देखील नायडू यांच्या सुटकेचे स्वागत केले. इतकेच नव्हे तर त्यांनी थेट टीडीपीचे कार्यालय गाठत टीडीपीच्या कार्यकर्त्यांसह आनंदही साजरा केला. त्याचप्रमाणे तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही केले.
जागावाटपाची बोलणी सुरूच
तेलंगणात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती शुक्रवारी तेलंगणचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी यांनी माध्यमांना दिली. ‘‘डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात नैसर्गिक मैत्री असून,माझ्या मते अद्याप जागावाटपाबाबत चर्चा संपलेली नाही. आमचे पक्षश्रेष्ठी याबाबत चर्चा करत आहेत’’ असे रेड्डी यांनी सांगितले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जागावाटपाबाबत काँग्रेसबरोबर बोलणी फिसकटल्याने १७ उमेदवारांची यादी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर रेड्डी यांच्याकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.