
ठाणे विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर निवडून आलेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजन विचारे यांचा ५८ हजार मतांनी पराभव केलाय.
लोकसभेच्या धड्यातून शिकवण घेत सगळ्याच पक्षांनी विधानसभेसाठी कंबर कसली होती. अर्थात जागांची मारामारी होतीच.
महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती कधी नव्हे इतकी विचित्र झाल्याने अर्थातच तिकीटासाठीची मारामारी न भूतो न भविष्यती झाली. मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात तिकीटावर अंमल कुणाचा या प्रश्नाचं उत्तर तर भलतंच कठीण होऊ बसलं होतं.
ठाणे या लोकसभा मतदारसंघात ठाणे विधानसभा मतदारसंघ आहे. इथून शिंदे गटाला जागा लढवण्याची प्रचंड इच्छा होती पण महायुतीतील मैत्रीचा आदर राखत शिंदे गटाने अगदी जड अंत:करणाने भाजपसाठी ही जागा सोडली.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून राजन विचारे यांना तिकीट देण्यात आलं तर भाजपकडून संजय केळकर यांना तिकीट देण्यात आलं. शिवसेना शिंदे गटाला हात चोळत बसण्याखेरीज काहीच हाती आले नाही.