Budget 2021: आता कोठे धावे मन? बजेटकडे?

budget 2021 nirmala
budget 2021 nirmala

अपेक्षेप्रमाणे गेल्या शुक्रवारी शेअरबाजार घसरले, १८ तारखेलाही घसरण चालूच राहिली. या सदरात सुचविल्याप्रमाणे जर थोडाफार नफा खिशात टाकला असेल तर आज व पुढील १५ दिवसात अनेक संधी येतील. अत्यंत अल्प कालावधीसाठी बजेटपर्यंत तेजी करता येईल, किंवा अंदाजपत्रकानंतर विचारपूर्वक गुंतवणूक आखणी करता येईल.

मागील एका लेखात इंडिया व्हिक्सची मीमांसा केली होती. इंडिया व्हिक्स म्हणजे बाजाराची अस्थिरता किंवा चंचलता ह्यांचे मोजमाप करणारा निर्देशांक. एनएसईने गुंतवणूकदारांसाठी ही खूप मोठी सोय केली आहे. हा निर्देशांक सूचक (Indicator) सारखा वापरता येतो. शेअरबाजारात जेव्हा मोठी वाढ- घट होते तेव्हा इंडिया व्हिक्स वाढू लागतो. या निर्देशांकाने साधारणत: ३०ची पातळी ओलांडल्यास ती धोक्याची घंटा समजायला हरकत नाही. एक जुने उदाहरण देतो; १५ मार्च २००८ रोजी इंडिया व्हिक्सने ३०ची पातळी ओलांडली त्यावेळी निफ्टीचा निर्देशांक होता ४७००च्या दरम्यान. पुढे हा निर्देशांक वाढतच गेला व २२ ऑक्टोबर रोजी ९०ला पोहोचला. निफ्टी तेव्हा होती २२५२! म्हणजेच पुढे येणाऱ्या महामंदीची अलार्म बेल सहा महिने आधी या निर्देशांकाने वाजवली. तेव्हा अल्प व दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणूकदारांना ह्या सुचकाकडे लक्ष ठेवायला हवे. नेमका हाच इतिहास पुन्हा घडला कोरोनाच्या निमित्ताने बाजार खाली आले तेव्हा ! 

Budget 2021:बजेटमध्ये पेट्रोल-डिझेलचं काय होणार? पाहा व्हिडिओ

आता प्रथम तुमचा रक्तदाब कमी करतो. आज हा निर्देशांक केवळ २४.४ आहे. तेव्हा आजच भीतीपोटी सर्व शेअर्स विकायची गरज नाही. थोडा भार हलका केला तरी चालेल. ही कदाचित अल्पकालीन खरेदीची संधीही असू शकते. असो. हा इंडिकेटर आलेखासह एनएसईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर अखबारपर’ असे गंमतशीर ट्वीट टाटा मोटर्स इलेक्ट्रिक मोबिलिटी विभागाने १५ जानेवारी रोजी केले अन् लागलीच टेस्ला आणि टाटा मोटर यांची सोयरिक होणार अशी अफवा पसरली. टाटा मोटरचा शेअर पुढील तीन दिवसात ३० टक्क्यांवर वर गेला. नंतर मात्र टाटा मोटरच्या व्यवस्थापनाने ही बातमी नाकारली व ते ट्वीटही काढून टाकले. बाजाराच्या इतर घसरणीबरोबर हा शेअरही १८ जानेवारीला खाली आला.

बाजाराचा अफवांचा आवेग असा असतो की तो सारासार विचार करत नाही. टेस्ला आणि जेएलआर एकमेकांचे प्रतिस्पर्धी, तेव्हा भागीदारीची शक्यता धूसरच. त्यातही जेएलआर व टाटा मोटर स्वतंत्रपणे विद्युत वाहनांची निर्मिती करू इच्छितात. अर्थात टाटांच्या नेक्सॉन व टिगोर या विजेवर (सुद्धा) चालणाऱ्या कारना बऱ्यापैकी मागणी आहे. या वर्षी दुपटीने उत्पादन करण्याचा कंपनीचा मानस आहे. टाटा पॉवर ह्या सहयोगी उद्योगामुळे टाटांचे जागोजागी चार्जिंग स्टेशन्स उभे करण्याचे काम सुकर होईल. पण ही फक्त सुरुवात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. वरील अफवा खोडून काढल्यामुळे पडझड झालीच व किमान दोन वर्ष थांबायची तयारी असेल तर ह्या शेअरचा विचार करायला हरकत नाही.

Budget 2021 : चीन-पाकशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काय असेल रणनिती?...

टेस्लाला भारतात पाय नक्की रोवायचे आहेत. आशिया खंडातील उत्पादन केंद्र म्हणून. त्यात टेस्ला बॅटरीची खरेदी पॅनासोनिक कडून करते. पण ह्या निमित्ताने आपल्याकडील अमराराजा कंपनीने लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन करायचे ठरवले आहे. इलेक्ट्रिक वाहनांची अशी वारंवार रिचार्ज होणारी बॅटरी ही प्राथमिक गरज आहे. चारचाकी वाहनांपेक्षा तीनचाकी रिक्षा व इलेक्ट्रिक स्कूटी अधिक लोकप्रिय आहेत व त्यांची मागणी वाढती आहे. पूर्णपणे आवाजविरहित असलेली ही वाहने चार्जिंग स्टेशन्सची सोय झाली तर हातोहात खपतील असे वाटते. प्रायोगिक तत्त्वावर अमराराजाने तिरुपती येथे ई-ऑटो प्रकल्प कार्यान्वित केला आहे. वाहनउद्योग पुन्हा भरभराटीस येत आहे. सूचीबद्ध मारुती सारख्या व वाढती मागणी असलेल्या खासगी किया, मॉरिस हेक्टर, हुंडाई सारख्या सर्वच वाहनांची सर्व प्रकारच्या बॅटरीजची मागणी वाढतच जाणार असल्यामुळे अमराराजा व एक्साईड या शेअर्सची चलती राहणार आहे. अंदाजपत्रकामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना सवलत येऊ शकते त्या दृष्टीने महिंद्र व टाटा मोटारचा विचार होऊ शकतो.

अंदाजपत्रकाकडे सर्वसामान्य करदाते, विषेशत: मध्यमवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. कोरोना व लॉकडाउन मुळे या वर्षी उत्पादनात मोठा खंड पडला. रोजगार बुडाले. नागरिकांचे व सरकारचेही उत्पन्न बुडाले. या पार्श्वभूमीवर या वर्षीचे अंदाजपत्रक मांडणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यात गेल्या शंभर वर्षात झाले नाही असे बजेट देण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. या वर्षी वित्तीय तूट किमान ६ ते ७.५ टक्के असेल असा अंदाज आहे. ती ४ टक्क्यांवर आणण्याचा संकल्प अर्थमंत्रालयाने सोडला आहे. नवे कर न आकारता ही तूट कशी भरून निघेल हा प्रश्नच आहे. (निर्गुंतवणूक हा एक मार्ग आहे.) कर्जावरील व्याज उशिरा भरण्याच्या सवलतीमुळे बँकांच्या बुडीत कर्जांची टक्केवारी कमी दिसते. पुढील सहा महिन्यात खरे चित्र दिसू लागेल.

लघु व मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. अंदाजपत्रकाकडून साहजिकच ह्या क्षेत्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मोठ्या उद्योगांकडून लघु उद्योगांचे सतत शोषण होत असते. पुरवठा केलेल्या मालाची देयके वेळेवर वसूल होणे हे मुख्य आव्हान. तसेच कमी व्याज दरात व सहजरीत्या पत पुरवठा होणे ही या क्षेत्राची प्रमुख मागणी. लघु उद्योग वाचले तर अनार्जित कर्जे डोईजड होणार नाहीत व पर्यायाने बँका बुडणार नाहीत. तसेच आयबीसीची अंमलबजावणी वेगाने होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधीकरणाकडील दिरंगाई सरकारी हस्तक्षेप झाल्यासच दूर होऊ शकेल.

Budget 2021: परवडणाऱ्या घरांसाठी रिअल इस्टेट क्षेत्राला आहेत अपेक्षा

त्याचप्रमाणे जीएसटीतील त्रुटी दूर करणे ही एक प्रलंबित मागणी आहे. रोजगार निर्मिती, मागणी, पुरवठा व उत्पादन आणि त्यासाठी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, तसेच बाहेरील भांडवल भारतात येण्याची वाट सोपी करणे ही देशाची आजची गरज आहे. उत्पादन निगडित सवलत योजनेचा क्षेत्रविस्तार करणे अत्यंत आवश्यक आहे. आयातकर वाढवणे उद्योगाला दिलासा देणारे असेल. भांडवली खर्चात वाढीव घसारा मिळण्याची तरतूद गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊ शकते. हे सर्व आव्हान अर्थमंत्री पेलतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा. सामान्य गुंतवणूकदाराने मात्र आपल्या अंदाजपत्रकीय अपेक्षा न्यूनतम ठेवल्यास बजेटमधे जे काही मिळेल त्याचा आनंदच होईल.

नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम आदि ओटीटी सुविधेचे भारतात अंदाजे २० कोटी ग्राहक आहेत. या परिस्थितीत पीव्हीआर किंवा आयनॉक्ससारखे शेअर्स धुळीला मिळतील अशी तज्ज्ञांची अपेक्षा आपल्या सिनेरसिकांनी फोल ठरवली. तमीळ, तेलगू व हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या ‘मास्टर’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २५ कोटी गल्ला जमवला आहे. ह्यात हिंदी चित्रपटाचे उत्पन्न समाविष्ट नाही. सोमवारच्या पडझडीत पीव्हीआरच्या शेअरने डोके वर काढले ते यामुळे. सिनेमागृहे चालू लागली तर आपली अर्थव्यवस्था रुळावर आली, असे समजता येईल. तेव्हा इंडिया विक्स ३० खाली असेपर्यंत प्रत्येक पडझड अल्पकाळच्या खरेदीसाठी चोखंदळपणे वापरायला हरकत नाही.

महत्त्वाची सूचनाः या लेखातील सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअरबाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com