#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 3 August 2018

मद्याच्या अतिसेवनाने विचारशक्‍ती नष्ट होते, झोप येते व व्यक्‍ती क्रियाशून्य होते. हलके हलके ओजाचा नाश होऊन मृत्यूदेखील येऊ शकतो. म्हणून मद्याची कितीही स्तुती केलेली असली, तरी ते दुधारी शस्त्र आहे, हे नजरेआड होऊ न देणे श्रेयस्कर होय. 

अग्र्यसंग्रहातील माहिती आपण घेतो आहोत. काही न खाण्याने आयुष्याचा ऱ्हास होतो, हे आपण मागच्या आठवड्यात पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ या.

मद्यं सौमनस्यजननाम्‌ - मनाला प्रसन्न करणाऱ्या द्रव्यांमध्ये मद्य सर्वोत्तम होय.

मद्य मुळात विधिपूर्वक तयार केलेले असेल, बराच काळ ठेवून जुने झालेले असेल आणि मद्य प्यायचे नियम सांभाळून योग्य प्रमाणात घेतलेले असेल, तरच मनाला प्रसन्न करू शकते. शिवाय जे बलवान आहेत, ज्यांचा आहार भरपूर, भरभक्कम आहे, ज्यांच्या शरीरात पुरेशी स्निग्धता आहे, ज्यांचे मानसिक बल चांगले आहे, ज्यांचा जाठराग्नी प्रदीप्त आहे, त्यांनीच मद्य सेवन करावे, असे सांगितलेले असते. तेव्हा या सर्व अटी सांभाळून जेव्हा योग्य प्रमाणात मद्य सेवन केले जाते, तेव्हा त्याचे गुण पुढीलप्रमाणे असतात, 

हृद्यं दीपनं रोचनं स्वरवर्णप्रसादनं प्रीणनं बृंहणं बल्यं भयशोकश्रमापहं स्वापनं नष्टनिद्राणां मूकानां वाग्विबोधनम्‌ अतिनिद्राणां बोधनं विबद्धानां विबन्धनुत्‌ परिक्‍लेश दुःखानां अबोधनम्‌ ।। .... चरक चिकित्सास्थान

हृदयाला हितकर, अग्निप्रदीपन करणारे, रुची वाढविणारे, स्वर-वर्णाला प्रसन्न करणारे, शरीराला तृप्त करणारे, सप्तधातूंचे पोषण करणारे, ताकद वाढविणारे, भय-शोक, श्रम यांचा परिहार करणारे, झोप येण्यास मदत करणारे, ज्यांची वाणी व उच्चार नीट नाहीत त्यांना उपयुक्‍त असणारे, फार झोप येणाऱ्यांना जाग येण्यास मदत करणारे, मलावष्टंभ नाहीसा करणारे, क्‍लेश, वेदना, दुःखाची जाणीव होऊ न देणारे, असे मद्य होय. त्यामुळे स्वतःची प्रकृती, ताकद समजून घेऊन योग्य प्रकारे तयार केलेले आणि योग्य प्रमाणात सेवन केलेले मद्य मन प्रसन्न करण्यास उत्तम असते. 

मद्यक्षेपो धीधृतिस्मृतिहराणाम्‌ - धी म्हणजे बुद्धी, धृति म्हणजे नियंत्रणशक्‍ती आणि स्मृती यांचा म्हणजेच प्रज्ञेचा नाश करणाऱ्या कारणांमध्ये मद्याचे नियम न पाळता व अतिरेक करून सेवन किंवा अविधिपूर्वक मद्यसेवन हे कारण सर्वश्रेष्ठ होय. 

मद्याची स्तुती केलेली असली, तरी ते सर्व नियम पाळून, स्वतःला सोसवते आहे आणि चांगल्या प्रतीचे आहे, याची खात्री करूनच सेवन करायला हवे, हे या सूत्रातून समजते. 

उदा. नवं मद्यं गुरु दोषकोपनं च म्हणजे मद्य नीट तयार झाल्यावरही नवे असेपर्यंत पचण्यास अतिशय जड आणि सर्व दोषांचा प्रकोप करणारे असते. तसेच ज्या व्यक्‍ती स्वभावतःच अशक्‍त, नाजूक असतात, ज्यांना उन्हाचा व उष्णतेचा त्रास होतो, ज्यांचा स्वभाव अति कोपिष्ट किंवा अति भित्रा आहे, ज्यांना ओझे वाहणे, पायी चालणे खूप करावे लागते, ज्यांना शरीरात कुठेही जखम आहे, जे भुकेलेले किंवा तहानलेले आहेत, ज्यांना अपचन, उदर, उरःक्षत यासारखा विकार आहे, ज्यांना विषबाधा झाली आहे, त्यांनी मद्य सेवन केले असता नानाविध विकार होऊ शकतात. मद्याच्या अतिसेवनाने विचारशक्‍ती नष्ट होते, झोप येते व व्यक्‍ती क्रियाशून्य होते. हलके हलके ओजाचा नाश होऊन मृत्यूदेखील येऊ शकतो. म्हणून मद्याची कितीही स्तुती केलेली असली, तरी ते दुधारी शस्त्र आहे, हे नजरेआड होऊ न देणे श्रेयस्कर होय. 

अतिप्रसंगः शोषकराणाम्‌ - अतिमैथुन हे शोष (शरीरक्षय, धातुक्षय) निर्माण होण्यासाठी मुख्य कारण होय. 

मैथुनामध्ये शुक्रधातू खर्च होत असल्याने वय, शरीरशक्‍ती, ऋतुमान, प्रकृती वगैरे मुद्द्यांचा विचार करून मैथुनाची योजना होणे आयुर्वेदाला अपेक्षित आहे. अतिमैथुनामुळे शुक्रधातूचा प्रमाणाबाहेर ऱ्हास झाला, तर त्यामुळे इतर सर्व धातू क्रमाक्रमाने क्षरण पावतात, पर्यायाने अनेक रोग, इतकेच नाही तर मृत्यूलाही आमंत्रण मिळते. मैथुन अतिप्रमाणात आहे का, हे लक्षणांवरून समजून घ्यावे लागते. 

शरीरशक्‍ती कमी झाल्यासारखे वाटणे, चक्कर येणे, गळून जाणे, शरीर आळसावून जाणे, उत्साह न वाटणे, इंद्रियांची ताकद कमी होणे, विशेषतः जननेंद्रिय उत्तेजित न होणे, शुक्र पातळ होणे, मैथुनसमयी शुक्राचा स्राव कमी होणे, वेदना होणे, मैथुनाची इच्छा हळूहळू कमी होऊ लागणे, सिक चिडचिड होऊन नैराश्‍याची भावना जाणवू लागणे वगैरे. स्त्रीमध्येसुद्धा याच प्रकारची लक्षणे दिसू लागतात, योनीच्या ठिकाणी कोरडेपणा जाणवतो, वेदना होतात. एकंदरच उभयतांमध्ये किंवा कोणाही एका जोडीदारामध्ये ही लक्षणे दिसू लागली, तर ते अतिमैथुनाचे पर्यायाने शुक्रऱ्हासाचे निदर्शक आहे, हे लक्षात घेऊन वेळेवर आवश्‍यक ते बदल करणे श्रेयस्कर होय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about alcohol