Balaji-Tambe
Balaji-Tambe

प्राणोपासना

वायू चलित झाला की चित्त चंचल होते आणि वायू व चित्त निश्‍चल झाल्यास स्थिरता प्राप्त होते. म्हणूनच प्राणावर म्हणजेच श्वसनावर नियंत्रण आणण्याने शरीर व मन दोन्हीही स्थिर होतात. प्राणायामाने इंद्रिय आणि मन यांच्यात जमा झालेले मल नष्ट होऊन म्हणजेच अज्ञानरूपी आवरण दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश दिसतो. प्रत्येक व्यक्‍तीने आहार-विहार व्यवस्थित करावाच पण शरीर, मन व आत्मा यांच्या स्वास्थ्यरक्षणासाठी आणि जीवन खरे खरे जगण्यासाठी रोज थोडा तरी प्राणायाम करणे आवश्‍यक आहे.

यद्वै प्रणिति सः प्राणः । 
प्राणामुळे जीवन असते. मनुष्य जिवंत असला म्हणजे आपण प्राण आहे असे म्हणतो. 
निजबोध म्हणजे अस्तित्वाची जाणीवरुपी राम हा आत्मा आणि वायुपुत्र हनुमान हा प्राण, ह्या अध्यात्म शास्त्रातील उपमा लक्षात घेतल्या तर ‘जेथे राम तेथे हनुमान‘ या संकल्पनेनुसार ’जेथे जाणीव तेथे प्राण!‘ हे स्पष्ट होते. मन हे या दोहोंच्या मध्यावर असते.
चले वाते चलं चित्तं निश्‍चले निश्‍चलं भवेत्‌ ।
योगी स्थाणुत्वमाप्नोति ततो वायुं निरोधयेत्‌ ।।
.....हठयोगप्रदीपिका

म्हणजेच वायू चलित झाला की चित्त चंचल होते आणि वायू व चित्त निश्‍चल झाल्यास स्थिरता प्राप्त होते. म्हणूनच प्राणावर म्हणजेच श्वसनावर नियंत्रण आणण्याने शरीर व मन दोन्हीही स्थिर होतात. प्राणायामाने इंद्रिय आणि मन यांच्यात जमा झालेले मल नष्ट होऊन म्हणजेच अज्ञानरूपी आवरण दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश दिसतो. प्रत्येक व्यक्‍तीने आहार-विहार व्यवस्थित करावाच पण शरीर, मन व आत्मा यांच्या स्वास्थ्यरक्षणासाठी आणि जीवन खरे खरे जगण्यासाठी रोज थोडा तरी प्राणायाम करणे आवश्‍यक आहे.

हनुमंताची उपासना ही प्राणशक्‍तीची  उपासना होय आणि प्राणशक्‍तीची उपासना ही हनुमंताची उपासना होय. प्राणशक्‍तीची उपासना म्हणजेच प्राणायाम करण्याची पहिली पायरी म्हणजे दीर्घश्वसन. त्यानंतरची पायरी म्हणजे एका नाकपुडीने प्राण आत ओढणे व दुसऱ्या नाकपुडीने बाहेर सोडणे.

प्राण आत घेणे किंवा सोडणे हे म्हणत असताना हा प्राण ज्याच्यावर आरूढ आहे ती हवा आपण आत घेऊन बाहेर सोडत असतो. या हवेबरोबर आत येणारी संकल्पना, परमात्मशक्‍ती, प्रज्ञा शरीरभर पसरण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. नुसती फासफूस करून हे काम होत नाही. त्यामुळे एका नाकपुडीने हवा आत ओढल्यावर दोन्ही नाकपुड्या बंद करून हवा काही वेळ आत ठेवणे (कुंभक - मस्तकरूपी वा शरीररूपी कुंभात हवा धरून ठेवणे) व नंतर दुसऱ्या नाकपुडीने हवा बाहेर सोडणे याप्रमाणे प्राणायाम करण्याचा उपयोग होतो. नाभीच्या आजूबाजूचे पोट आकुंचित करून श्वास आत धरून ठेवण्याने कुंभक होतो. श्वास बाहेर सोडत असताना पोट हलके हलके आत येते. या प्रमाणे प्राणायाम करण्याने शरीराची शुद्धी होते, नाडीशोधन होते, पचन सुधारण्यास मदत होते, आत येणाऱ्या हवेचे, प्राणवायूचे पर्यायाने प्राणांचे नियंत्रण करता येते. जोपर्यंत अशा रीतीने प्राणांचा कुंभक केला जातो तोपर्यंत त्या देवतेचा आशीर्वाद मिळू शकतो. 

आपले सणवार, आपल्या परंपरा कुठेतरी शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याशी बांधलेल्या असतातच. त्यांचा आपण आपल्या शरीरात असलेले संबंध शोधून काढला, त्यातून होणारे शारीरिक फायदे ओळखले तर या परंपरा किती योग्य आहेत हे लक्षात येते. त्यात बदल करण्याची वेळ आली तर कोणते बदल करता येतील व कोणते बदल करता येणार नाहीत याचेही ज्ञान मिळू शकेल. 

मन जसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लक्ष केंद्रित करेल तसे ज्या जागेशी संबंधित असलेली आपली इंद्रिये तिकडे लक्ष देतात व नाना प्रकारचे विचार सुरू होतात. या अति प्रमाणात बदलणाऱ्या विचारांमुळे शरीरात अव्यवस्था निर्माण होते. मनाला स्थिर व एकाग्र करण्यासाठी श्वासावर लक्ष देणे, प्राणायाम करणे हा एकमेव उपाय आहे. म्हणूनच संगीत, मंत्रशास्त्र हे सुद्धा प्राणायामावरच आधारलेले आहे असे दिसून येते. 

खरोखर रोज वीस मिनिटे प्राणायाम करण्याने प्राणायामाचे फायदे दिसू शकतात. प्राणायाम करायचा कसा? तर प्राणायामासाठी स्थिर सुखासन म्हणजे पद्मासनात बसणे उत्तम मानले गेले आहे, पण साध्या सुखासनात बसूनही प्राणायाम करता येईल. पाठीचा कणा ताठ ठेवून बसावे, दृष्टी समोर राहील अशी मान ठेवावी, डोळे पूर्ण बंद न करता नासिकाग्रावर म्हणजे नाकाच्या शेंड्यावर दृष्टी असावी (अर्धोन्मीलित). डाव्या नाकपुडीतून श्वास आत घेणे व उजव्या नाकपुडीतून बाहेर सोडणे (किंवा याच्या उलट) ही क्रिया करण्यासाठी उजव्या हाताचा अंगठा, करंगळी व अनामिका या तीन बोटांचा उपयोग करून (मध्यमा व तर्जनी उपयोगात आणू नये) नाकावर फार दाब येईल अशा पद्धतीने नाकपुडी बंद करू नये.

प्राणायामासंबंधी खूप विस्तृत व स्वतंत्रपणे लिहिता येण्यासारखे आहे. तरीही प्राणायामाचा अभ्यास योग्य मार्गदर्शन घेऊन नंतर करावा. प्राणायाम ही क्रिया केवळ शरीरापुरती मर्यादित नसून त्यात शरीर, मन, इंद्रिय व आत्मा या सर्वांचे संतुलन साधलेले असते. सध्या वाढत असलेल्या मधुमेह, हृदयविकार, मानसिक ताण वगैरे रोगांसाठी प्राणायामाएवढा सोपा पण उपयुक्‍त असा दुसरा इलाज नाही. सध्या अत्यंत जलद गतीने होणाऱ्या हवेच्या प्रदूषीकरणापासून वाचण्यासाठी आपणास प्राणायाम हाच एकमेव इलाज आहे. एकूणच जगण्यासाठी आपणास प्राणशक्‍तीची गरज असते. प्राणायामाचा अभ्यास हा प्राणशक्‍ती देऊन आरोग्य, दीर्घायुष्य, सिद्धी, समृद्धी व अंतिमतः मनःशांती देणारा असल्यामुळे प्राणायाम हे एक अत्यावश्‍यक नित्यकर्म आहे.

श्री गीतरामायणामध्ये म्हणजे पर्यायाने रामायणामध्ये एक उल्लेख आहे, ‘तरून जो जाईल सिंधु महान, असा हा एकच श्री हनुमान’. युद्धप्रसंगी लक्ष्मण बेशुद्ध पडले असता सूर्योदयापूर्वी प्राणशक्‍ती मिळाली नाही तर ते जिवंत राहणार नाही असे वैद्यांनी सांगितले होते. त्यासाठी विशिष्ट वनस्पतीची आवश्‍यकता होती. ही प्राणदायी वनस्पती वेळेवर आणण्याची जबाबदारी हनुमंतांवर होती, केवळ हनुमंतच हे काम वेळेत पूर्ण करू शकत होते. आपण यातून घ्यायचा बोध असा की, अगदी मरणसमयी, एखादा असाध्य विकार झाला असता किंवा बेशुद्ध झालेल्या व्यक्‍तीचा प्राण आपण एखाद्या वनस्पतीद्वारे चलित करू शकलो तर ती व्यक्‍ती पुन्हा शुद्धीवर येऊ शकते.

म्हणून प्राणायामाचे महत्त्व आहे. हनुमंत म्हणजे प्रत्यक्ष प्राण असे म्हणायला हरकत नाही. जेथे श्रीराम असतात म्हणजेच जेथे जाणीव असते तेथे हनुमंतांसाठी म्हणजे प्राणासाठी एक जागा ठेवलेली असते. श्रीराम व हनुमान यांची अशी जोडी आहे. हनुमान नसेल तर राम नाही आणि राम नसतील तर हनुमान नाही. राम म्हणजे जाणीव व जीवन आणि हनुमान म्हणजे प्राण. तेव्हा हनुमंतांची उपासना म्हणजे प्राणाची उपासना. हनुमंतानी आणलेल्या संजीवनी वनस्पतीच्या रसाचे काही थेंब लक्ष्मणाच्या नासिकेत टाकल्यावर त्या मार्गाने प्राण आत जाऊन ते शुद्धीवर आले. अशा प्रकारे प्राणाचे महत्त्व आपल्याला जाणून घेता येईल. तसेच शरीर हे काय आहे याचा शोध घेण्यासाठी सुद्धा हनुमंत गरजेचे असतात. हनुमंतांनी लंकेत जाऊन सीतेचा शोध लावला. सीता म्हणजे शरीर आणि जोपर्यंत शरीरात जाणीव येत नाही तोपर्यंत शरीराचा उपयोग नसतो. हे शरीर कुठे व कशा तऱ्हेने जीवनात आणायचे किंवा शरीरात जाणीव कशी आणायची म्हणजे राम-सीतेचे मिलन कसे होईल यासाठी काम करणारा प्राणच असतो. प्राणाचे एवढे महत्त्व आहे म्हणून प्राणायाम हे  योगशास्त्राचे तसेच सर्व प्रकारच्या जीवनप्रक्रियांचे मूळ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com