तारून नेणारे ते तरुण मन !

तारुण्य हा जीवनातील महत्त्वाचा काळ. तारुण्यातील सौंदर्य, धडाडी, शौर्य वगैरे सर्व गोष्टी सर्वांनाच आकर्षणाऱ्या असतात. पण खरे तारुण्य शरीराबरोबरच मनाचेही असते.
Youth
YouthSakal
Summary

तारुण्य हा जीवनातील महत्त्वाचा काळ. तारुण्यातील सौंदर्य, धडाडी, शौर्य वगैरे सर्व गोष्टी सर्वांनाच आकर्षणाऱ्या असतात. पण खरे तारुण्य शरीराबरोबरच मनाचेही असते.

शारीरिक तारुण्य टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी निसर्गनियम पाळणे, तारुण्य टिकण्याच्या दृष्टीने प्रकृतीला अनुरूप असा वीर्यवर्धक चांगला पौष्टिक आहार ठेवणे, व्यायाम करणे, खेळ खेळणे, सतत कार्यरत राहणे या गोष्टी शारीरिक तारुण्यासाठी जशा उपयोगी आहेत, तसेच सतत अभ्यास, मनन, चिंतन, नवीन नवीन शिकण्याची तयारी, पाठांतर, छंद या गोष्टी मानसिक तारुण्य घडवण्यासाठी उपयोगी ठरतात.

तारुण्य हा जीवनातील महत्त्वाचा काळ. तारुण्यातील सौंदर्य, धडाडी, शौर्य वगैरे सर्व गोष्टी सर्वांनाच आकर्षणाऱ्या असतात. पण खरे तारुण्य शरीराबरोबरच मनाचेही असते. बालपणानंतर आपसूक येणारे शरीराचे तारुण्य सर्वांनाच मिळते. पण मनाचे तारुण्य परिश्रमांनी मिळवावे लागते. त्यासाठी संस्कार महत्त्वाचे असतात, नीतिमत्तेची शिदोरी असावी लागते. तसेच मनात राष्ट्रासाठी, गुरुजनांसाठी, ज्ञानासाठी आदर असावा लागतो.

तारुण्याचा सुवर्णकाळ कधी संपू नये, परत यावा असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. सतत काम करण्याचा उत्साह, नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड, प्रसंगी धैर्य व दुसऱ्याला मदत करण्याची तयारी, कोणतीही जबाबदारी स्वीकारून आपल्यात असलेली शक्ती, बुद्धी व ज्ञान या गोष्टी प्रकट करण्याची इच्छा या सर्व गोष्टी खरे तारुण्य दाखवतात. शरीर जरी वयोमानाप्रमाणे म्हातारे होत जाऊन नष्ट होण्याच्या मार्गावर चालत राहिले तरी मनाला मिळालेले किंवा स्वभावात उतरलेले तारुण्य टिकवणे आपल्याच हातात असते. नुसतेच एखादे रसायन किंवा विशेष आहार सेवन करण्यावर भर देणे म्हणजे तारुण्य, फॅशनेबल कपडे किंवा विशेष केशरचना करणे म्हणजे तारुण्य, मी बॅडमिंग्टन खेळतो किंवा जिममध्ये जातो अशा वल्गना करणे म्हणजे तारुण्य असे नसून स्वभावात तरुणपणा असणे म्हणजे तारुण्य! हे मानसिक तारुण्य टिकवण्यासाठी लक्ष द्यायला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देता येईल अशी उमेद व आशा बाळगणे हे तर आपल्या हातात असू शकते. तारुण्यातील लवचिकपणा, प्रसंगी वाकण्याची तयारी ठेवूनही मोडणार नाही असा आत्मश्र्वास ठेवणे अवघड नाही. सर्व गोष्टी करण्याची तयारी दाखवून चार-चौघांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणे, खेळात आवड असणे, केवळ बक्षिसासाठी न खेळता तारुण्यासाठी, मनाच्या आनंदासाठी खेळणे, नुसताच परीक्षेसाठी अभ्यास न करता ज्ञानाची कदर करणे, वीर्यशक्तीचे संवर्धन व त्याचा योग्य उपयोग करणे या गोष्टी तारुण्यासाठी आवश्‍यक आहेत व त्या सर्व जोपासणेही शक्य आहे.

तरुण व्यक्तीवर सर्व समाजाच्या, कुटुंबाच्या आशा अवलंबून असतात. तरुण व्यक्ती मोठी होईल; तिचे शिक्षण पूर्ण होईल; चांगली नोकरी मिळेल; आई-वडिलांना, लहान भावंडांना आधार होईल अशी प्रत्येक घराची अपेक्षा असते. एखाद्या संस्थेला तरुण कार्यकर्ते मिळाले तर त्या संस्थेचे भाग्य उजाडले म्हणून समजावे. राजकारणात एखाद्या तरुण व्यक्तीची मानसिकता विध्वंसक प्रवृत्तीकडे वा दंगाधोप्याकडे न लागली तर अशा व्यक्तीकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागते, कारण या तारुण्यात असते सृजनशक्ती, संरक्षकशक्ती. सर्वसामान्य माणसाला अशाच व्यक्तीची आपला प्रतिनिधी म्हणून आवश्‍यकता असते. तारुण्यामध्ये शारीरिक व मानसिक शक्ती एकत्र आल्याने अनेक गुण आपसूकच तयार होतात. बऱ्याच वेळा असा समज असतो की संगणकावर तासन्‌ तास बसणे, इंटरनेटवर चॅट करणे, रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे, मुलाला मैत्रीण असणे व मुलीला मित्र असणे, डिस्कोसारख्या कर्णकर्कश संगीत व नृत्य असलेल्या ठिकाणी जाणे, जंक फूड खाणे, बाहेर खाणे व जेवणे हे तारुण्य. पण तारुण्याचे हे लक्षण समजून तिकडे मनाचा कल तयार केला तर मात्र असे तारुण्य खूप महाग पडू शकते. केवळ रात्रंदिवस पुस्तकात डोके घालून अभ्यास करणे किंवा नुसतेच शारीरिक, बौद्धिक तयारीच्या मागे लागणे म्हणजे तारुण्य नव्हे. पण बऱ्याच वेळा तारुण्याच्या इतर कल्पनांचा अतिरेक झाला की मग शरीराचे तारुण्य तर संपूनच जाते पण मनही तरुण राहत नाही.

मनाचे तारुण्य टिकवण्यासाठी शारीरिक तारुण्य तर हवेच. मनाने केलेल्या सूचना किंवा मनाने दिलेल्या आज्ञा किती मनापासून आहेत हे कळणे शेवटी शरीराकडून घडणाऱ्या कृतीवरच अवलंबून असते. तारुण्य म्हणजे नुसती तारुण्याची बडबड नव्हे. शारीरिक तारुण्यासाठीसुद्धा प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी निसर्गनियम पाळणे, तारुण्य टिकण्याच्या दृष्टीने प्रकृतीला अनुरूप असा वीर्यवर्धक चांगला पौष्टिक आहार ठेवणे, व्यायाम करणे, खेळ खेळणे, सतत कार्यरत राहणे या गोष्टी शारीरिक तारुण्यासाठी जशा उपयोगी आहेत तसेच सतत अभ्यास, मनन, चिंतन, नवीन नवीन शिकण्याची तयारी, पाठांतर, छंद या गोष्टी मानसिक तारुण्य घडवण्यासाठी उपयोगी ठरतात. हजरजबाबीपणा व ताबडतोब निर्णय घ्यायची क्षमता हे तारुण्याचे लक्षण आहे. त्यासाठी स्मृती चांगली असायलाच पाहिजे. ही स्मृती शारीरिक मेंदूच्या आरोग्यावर व मानसिक मेंदूच्या शिकवणीवर अवलंबून असते. म्हणून या दोन्हीसाठी जो मनुष्य प्रयत्न करतो, त्यालाच मानसिक आरोग्य व मानसिक तारुण्य टिकवता येऊ शकते.

तारुण्य म्हणजे स्वतंत्रता, तारुण्य म्हणजे स्वतःची जबाबदारी स्वतःच घेणे, दुसऱ्याची जबाबदारी घेण्याची तयारी असणे. म्हणूनच तारुण्य सर्वांनाच हवेहवेसे वाटते. जीवनसंसारातून म्हणजेच भवसागरातून जे तारून नेते ते तारुण्य मनाचेच!

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com