International Yoga Day 2023: योगदिनाच्या निमित्ताने!

योग हे एक अतिप्राचीन भारतीय शास्त्र आहे. जीवनात आपल्या वागण्याने भेद आणि असंतुलन निर्माण होण्याची शक्यता असते.
International Yoga Day 2023:
International Yoga Day 2023:Sakal

International Yoga Day 2023: योग हे एक अतिप्राचीन भारतीय शास्त्र आहे. जीवनात आपल्या वागण्याने भेद आणि असंतुलन निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र योगाभ्यासामुळे ते टाळून एकता, संतुलन आणि कार्यकुशलता साधता येते. शरीरासाठी व्यायामाचा उपयोग होतो, तर योगाचा उपयोग हा प्राधान्याने मानसिक तसेच हॉर्मोनल पातळीवर होत असतो. 

भारत सरकारच्या पुढाकाराने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. परंतु योग म्हणजे योगासने करणे किंवा प्राणायाम करणे अशी छोटी कल्पना करून चालणार नाही. योगासनांचा उपयोग शरीरातील काही विकृतींवर होऊ शकतो पण आसन, प्राणायाम ही अष्टांग योगातील दोन अंग आहेत.

International Yoga Day 2023:
कधी साजरा केला जातो International Yoga day ? जाणून घ्या इतिहास

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी याप्रमाणे शून्यापासून अनंतापर्यंत एकरूपता साधणारी अशी अष्टांगयोगाची कल्पना होय! एकाच वेळी या सर्व आठही अंगांचा अभ्यास करीत ती आचरणात आणावीत असेही नव्हे व अगदीच पायरी पायरीने एकामागोमाग एक करीत जावे, असेही नव्हे.

त्यामुळे सर्व अंगांचा अभ्यास हा योगविद्येत अभिप्रेत आहे. मात्र याची जाणीव एकूण समाजात केव्हा होईल व योग हे एक समाधीपर्यंत एकरूपता अनुभवण्याचे साधन आहे हे केव्हा समजेल व हा योग येईल तेव्हाच खरे. 

योगाचा अभ्यास जसजसा पुढे जातो तसतशी एकेक कल्पना पतंजली मुनी वाढवीत जातात व त्यात ‘चित्तवृत्तिनिरोधः इति योगः’ व ‘तपः स्वाध्यायः प्रणिधानानि इति क्रियायोगः’ ही सूत्रे सांगतात. मन, चित्त या वाईट गोष्टी नाहीत.

चंचल असणे हा तर मनाचा धर्मच. पण या वृत्तींचे अनुशासन करणे, म्हणजे मनाच्या पलीकडे पाहणे, मनाला आत्म्याच्या आज्ञेत काम करायला लावणे म्हणजे योग.

तपस्या आणि त्याग स्वतःच जाणण्याचा ‘स्व’ अभ्यास म्हणजेच प्रेमातून सर्व जग समजून घेणे ती क्रिया असा हा क्रियायोग आचरणात आणला की हे सर्व मी करतो आहे, माझ्याभोवती विश्र्व फिरते आहे, असा समज न होता उलट त्या परम ईश्र्वराच्या, परमसत्तेच्या सान्निध्यात किंवा अस्तित्वामुळे घडते आहे, ही ठाम श्रद्धा मनात उत्पन्न होऊ शकते.

योग हा शब्द ‘जोडणे’ किंवा ‘एकत्र येणे’ (युज्‌) या धातूपासून तयार झालेला आहे. त्यामुळे शरीर, मन आणि आत्म्याचा परमतत्त्वाशी संयोग साधण्याची कला म्हणजे ‘योग’.

योगाभ्यासाच्या साहाय्याने व्यक्तीला जीवात्मा आणि परमतत्त्व यांची एकात्मता साधून व्यक्तिगत पातळीवर मुक्तता, समाधान आणि सर्वोच्च आनंदाचा अनुभव घेता येतो, असे योगदर्शन सांगते.

जीवनात विघटनाची, विनाशाची क्रिया आणि शरीराच्या बाबतीत विशेषत्वाने क्षरणाची क्रिया ही साहजिकच चालू असते. त्यामुळे संघटित राहून एकरूप होणे या क्रियेला योग हा शब्द फार समर्पक आहे व त्याचे जीवनातील स्थान अत्युच्च आहे.

इतकेच नव्हे तर, योग हे जीवनाचे मुख्य ध्येय आहे. उत्क्रांतीची व उन्नतीची क्रिया विशेष यत्नांनी साधावी लागते. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. हे सहजासहजी होणारे काम नव्हे.

श्रीमद्भगवद्गीतेत विषादयोगापासून कर्मयोग, संन्यासयोग, ध्यानयोग, पुरुषोत्तमयोग, भक्तियोग, दैवासुरसंपदविभागयोग, मोक्षसंन्यासयोग असे अनेक प्रकारचे, जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे व विविध व्यक्तिमत्त्वांना अनुकूल असे योगाचे प्रकार सांगितलेले आहेत.

मात्र, दैनंदिन जीवनात ‘योगः कर्मसु कौशलम्‌’ म्हणजेच ‘जीवन जगण्याची पूर्ण कला अवगत असणे’ व ‘समत्वं योग उच्यते’ म्हणजे ‘एकात्म अवस्थेत संतुलित असणे’ ही योगाची व्याख्या केलेली आहे.

International Yoga Day 2023:
Yoga for Skin: निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी करा ही चार योगासने

माणसाचे अस्तित्व शरीर, मन व आत्मा या तिन्ही पातळ्यांवर असते आणि विश्र्वाशी एकरूपतेचा अनुभव घेण्यापूर्वी या तिन्ही पातळीवर आरोग्य उत्तम राहणे महत्त्वाचे असते. यासाठी श्री पतंजली महामुनींनी अष्टांगयोगाची रचना करून एकूणच योगमार्ग सुलभ केला.

तेव्हा संपूर्ण जीवन हे योगमय करायचे असेल तर आसन प्राणायामाबरोबर त्याग आणि सेवा, अनुशासन आणि प्रेम, म्हणजेच सामाजिक बांधिलकी व सर्वसमभाव म्हणजे सर्वांभूती परमेश्र्वर ही श्रद्धा असा ‘योगाभ्यास’ करावा लागेल.

जडाचे शक्तीत व शक्तीचे जडात रूपांतर होत असताना आणि दोन वस्तू जोडत असताना आवश्‍यकता असते अग्नीची. भौतिक पातळीवर अग्नी विशेष कार्य करतो.

शरीरात जाठराग्नी, वैश्र्वानर अग्नी वगैरे अग्नीची विविध रूपे दिसतात, ज्यांचे आधुनिक शास्त्रातील हॉर्मोन्सशी साधर्म्य दाखवता येईल. म्हणून योगशास्त्राचा अवलंब केला असता संप्रेरकांच्या असंतुलनामुळे आलेले दोष कमी होतात आणि मनुष्याला कर्म करताना वेगवेगळ्या कल्पना अंतर्भूत करण्यासाठी आतून मार्गदर्शन मिळते.

म्हणूनच असे म्हणतात की सूर्य हा बाहेरचा अग्नी शरीराला आरोग्य देतो आणि शरीरस्थ अग्नी मनुष्याला धन, समृद्धी, विकास या गोष्टी प्रदान करतो.

‘आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌ धनमिच्छेत्‌ हुताशनात्‌’ या श्र्लोकात हेच सांगितलेले आहे. या दृष्टीने एकूण मनुष्यमात्राचा विकास आणि सर्व विश्वाला एकत्र जोडून विश्र्वबंधुत्वाचा (सध्याच्या भाषेत ग्लोबलायझेशनचा) अनुभव  घेण्यासाठी योगशास्त्राचा उपयोग होईल.

१९७२ साली मी ‘संतुलन क्रियायोग’ ही एक योगावर आधारलेली, परंतु मूळ शास्त्रात कोणतीही विकृती न करता, योगोपचार पद्धती पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली, त्याचा फायदा आजवर अनेकांनी उचललेला आहे.

करण्यास सोपी परंतु प्रभावाने उत्तम असणारा हा ‘स्काय - संतुलन क्रियायोग’ पंचकर्मातील एक आवश्यक भाग आहे. भारतातच नाही तर परदेशातही संतुलन क्रियायोग करणारी अनेक मंडळी आहेत. ज्यांना योग करण्यास वेळ नाही पण योग करण्याची च्छा आहे त्यांच्यासाठी ही एक आदर्श योगपद्धती आहे असे म्हणायला हरकत नाही.

तेव्हा आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र होय आणि म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर जीवन यथार्थाने जगता येईल, जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. 

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com