दीपपूजन!

अग्निपूजन जगात सर्वत्र स्वीकारलेले दिसते. जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजापासून ते सुसंस्कृत समाजापर्यंत सर्वांनीच अग्नीची श्रेष्ठता मान्य केलेली असते.
Deeppujan
DeeppujanSakal
Summary

अग्निपूजन जगात सर्वत्र स्वीकारलेले दिसते. जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजापासून ते सुसंस्कृत समाजापर्यंत सर्वांनीच अग्नीची श्रेष्ठता मान्य केलेली असते.

आषाढ महिन्यात येणारी अमावास्या ‘दिव्याची अवस’ म्हणून ओळखली जाते. भारतीय परंपरेचे, भारतीय संस्कारांचे महत्त्व पाहता ज्या ऋषी-मुनींनी व भारतीय समाजाने या संस्कारांची जपणूक केली, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या अमावास्येच्या दिवशी खऱ्या अर्थाने वर्षा ऋतूची सुरुवात होते.

अग्निपूजन जगात सर्वत्र स्वीकारलेले दिसते. जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजापासून ते सुसंस्कृत समाजापर्यंत सर्वांनीच अग्नीची श्रेष्ठता मान्य केलेली असते. भारतीय संस्कृतीमध्येही ‘यज्ञ’ ही विशेष संकल्पना मांडली आहे. यज्ञ म्हटला की अग्नी हीच महत्त्वाची देवता असते, अग्नी हाच महत्त्वाचा कारक असतो. रामायणातील पुत्रकामेष्टी यज्ञाची कथा भारतीत सर्वतोमुखी असते. गादीला वारस मिळावा, एक उत्तम राज्यकर्ता मिळावा असे दशरथराजाला वाटणे साहजिक होते, त्याचप्रमाणे लंकाधिपती रावणाने त्या वेळी मांडलेल्या अत्याचारांचे पारिपत्य करण्यासाठी कोणी तारणहार जन्माला यावा असा लोकमानस सुद्धा होता. याचा परिणाम स्वर्गावर झाल्याशिवाय राहिला नाही. दशरथराजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला, या यज्ञात प्रत्यक्ष अग्निदेव प्रकट झाले, ‘दशरथा घे हे पायसदान’ असे म्हणत त्यांनी राजाच्या हातात पायस म्हणजे खीर देऊन सांगितले, ‘यातील खीर तिन्ही राण्यांना दे, म्हणजे त्या योग्य वेळी प्रसूत होतील’. हे सर्व आपण ऐकतो तेव्हा सहज आपल्या लक्षात येते की, अग्नी हे एक माध्यम आहे. देव व मनुष्य म्हणजेच शक्ती व कार्य यांच्यामधील दुवा आहे. मनुष्याने केलेला कार्यभाग सर्व देवतांपर्यंत पोचवून त्यांच्यापासून मिळालेला प्रसाद मनुष्याकडे पोचवणारा तो अग्नी.

आषाढ महिन्यात येणारी अमावास्या ‘दिव्याची अवस’ म्हणून ओळखली जाते. भारतीय परंपरेचे, भारतीय संस्कारांचे महत्त्व पाहता ज्या ऋषी-मुनींनी व भारतीय समाजाने या संस्कारांची जपणूक केली त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या अमावास्येच्या दिवशी खऱ्या अर्थाने वर्षा ऋतूची सुरुवात होते. पावसाळ्याचा खरा ओलावा, खरा दमटपणा, थंडी ही श्रावण, भाद्रपदात प्रत्ययाला येते. या दोन महिन्यात भिजलेले कपडे लवकर वाळत नाहीत, सगळीकडे ओलावा भरलेला असतो, भिंतीत ओलावा असतो, घरात कुठे गळत असले तर जमिनीतही ओलावा असतो. साहजिकच, पिंड-ब्रह्मांड या न्यायाप्रमाणे या महिन्यांमधल्या बाहेरच्या ऋतुमानाचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी अतिशय मंद होऊ शकतो. आयुर्वेदिक तत्त्वानुसार ज्याला अग्नी म्हटले जाते त्याची तुलना आधुनिक विज्ञानातील हॉर्मोन्सशी करता येऊ शकते. तेव्हा या दोन महिन्यांमध्ये संपूर्ण शरीराची हॉर्मोनल व्यवस्था म्हणजे अग्नी संतुलित ठेवणे फार गरजेचे असते, त्यातल्या त्यात सर्व अग्नींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व पचनासाठी लागणाऱ्या जाठराग्नीला विशेष सांभाळावे लागते.

अग्नीचा विचार करत असताना सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर दिसतो तो निखाऱ्यांच्या ज्वाळांतून प्रकट होणारा अग्नी व दुसरा जाठराग्नी. जाठराग्नी परमेश्र्वराचा अंश असून अन्नपचनाचे काम करतो व त्यामुळे असा स्पष्ट निर्देश मिळतो की अन्न खाणे मनुष्याच्या हातात आहे पण खाल्लेल्या अन्नाचे पचन होणे सर्वस्वी परमेश्र्वराच्या हातात आहे. खाल्लेले अन्न पचवायचे असो, शरीरातील साखर पचवायची असो, शरीरातील इतर महत्त्वाच्या क्रिया घडवायच्या असोत, स्त्रीच्या बाबतीत मासिक धर्म असो, गर्भधारणा असो, स्तन्योत्पादन असो, या सर्व क्रियांना हॉर्मोन्स म्हणजेच अग्नी जबाबदार असतो. भारतीय परंपरेत वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या अग्नीचे आवाहन करावे असे म्हटलेले आहे. रोजच्या घरगुती वापरासाठी पावक (पवित्र करणारा) अग्नी, गर्भाधान वगैरे संस्कारासाठी मारुत, पुंसवन संस्कारासाठी पवमान, जातकर्मासाठी प्रबल, अन्नप्राशनासाठी शुचि, उपनयनासाठी समुद्भव, लग्नविवाहासाठी योजक, अग्निहोत्र करण्यासाठी द्विज, वैश्र्वदेवासाठी रुक्मक, देवकार्य करण्यासाठी हव्यवाह, पितृकार्य करण्यासाठी कव्यवाह, शांतिकार्यासाठी वरद, वशीकरणासाठी कामद, अशा प्रकारे वेगवेगगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या अग्नींचे आवाहन करायलासांगितलेले आहे.

अग्नीचे हे असे वेगवेगळे प्रकार म्हणजे काय व ते कसे दिसू वा समजू शकतात हे सामान्यतः कळणे अवघड आहे. त्याचप्रमाणे शरीरातील निरनिराळी हॉर्मोन्स सुद्धा वेगवेगळी कार्ये करत असतात आणि त्यांचीसुद्धा कार्यप्रणाली क्लिष्ट असते. यात एकदा बिघाड झाला तर पुन्हा संतुलन आणणे तितकेले सोपे नसते. विशेषतः बाहेरून हॉर्मोन्स घेण्याचे दुष्परिणाम सोसावे लागतात. आयुर्वेदात विशिष्ट औषधोपचारांच्या बरोबरीने शरीरस्थ अग्नीला व्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष उपचार, विशेष अनुशासन योजता आले तर अप्रतिम परिणाम मिळताना दिसतात. भ्रूमध्यात ध्यान करणे, विशिष्ट अग्निप्रार्थनेचे मंत्र ऐकताना ज्योतिध्यान करणे, डोळे बंद करून भ्रूमध्यात ज्योतीचा प्रकाश पाहणे हे सर्व अग्निसंतुलनाचा पर्यायाने हॉर्मोन्सच्या योग्य कार्याचे उपायच असतात.

अमावास्येच्या दिवशी सांगितलेल्या दीपपूजनाचे निदर्शक असे हे उपाय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणवार, उत्सव, रीतीरिवाजांयोगे चपखल बसविलेले दिसतात. अमावास्येचा दिवस म्हणजे आपल्याला कमीत कमी चंद्रशक्ती पर्यायाने कमीत कमी सूर्यशक्ती उपलब्ध होणारा दिवस. तेव्हा त्या दिवशी सर्व दिवे स्वच्छ करून पेटवणे यामागे त्यांच्याकडे पाहत असताना होणाऱ्या ज्योर्तिध्यानाच्या माध्यमातून शरीरात असलेल्या अग्नीला चालना मिळवून देणे व संपूर्ण शरीरव्यापार व्यवस्थित चालण्याच्या दृष्टीने असलेली हॉर्मोनल व्यवस्था बरोबर राखणे हाच उद्देश दिसतो. अपरिग्रह म्हणजे दुसऱ्याच्या अधिकारावर हक्क न सांगणे, काही काळासाठी एखादी वस्तू न खाणे वा एखादे काम न करणे, अहिंसा, खरे बोलणे अशा प्रकारच्या व्रतांमुळेसुद्धा शरीरातील हॉर्मोन व्यवस्था संतुलित करता येते. प्राणायामाच्या माध्यमातून तर शरीरातील अग्नीला संयमित करून हॉर्मोनल संस्थेचा व्यवस्थित फायदा घेता येतो.याचाच अर्थ चातुर्मासात सांगितलेले आहारासंबंधीचे नियम, उपवास, व्रतवैकल्ये यांचा संबंध वर्षा ऋतूत अग्नी मंद झाल्यामुळे हॉर्मोन्सच्या कार्यव्यवस्थेत उत्पन्न झालेला अडथळा दूर करण्याशी व पुढे येणाऱ्या महिन्यांमध्ये सर्वांगीण आरोग्य टिकण्यासाठी केलेल्या व्यवस्थेशी आहे असे दिसते. आषाढ अमावास्येच्या दिवशी केलेले दीपपूजन, भाद्रपदात अंगारकाची देवता असणाऱ्या गणपतीचे पूजन, वंशपरंपरागत गुणदोषांपासून स्वतंत्र राहण्यासाठी पितृपूजन, अश्र्विनात ज्या सुप्त शक्तीच्या जोरावर प्राणकर्षण होते त्या कुंडलिनीशक्तीचे पूजन आणि दीपावलीत सहस्रारचक्रात अनुभवलेला प्रकाशाचा उत्सव या सर्वांची सुरुवात दीप अमावास्येला केलेल्या दीपपूजनाने होते.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com