विकास बालकाचा!

घरातील मूल म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा आनंद असतो. बाळलीलांचा अनुभव हा स्वर्गातील अनुभवाच्या तोडीस तोड ठरावा असा असतो.
Child
ChildSakal
Summary

घरातील मूल म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा आनंद असतो. बाळलीलांचा अनुभव हा स्वर्गातील अनुभवाच्या तोडीस तोड ठरावा असा असतो.

आईच्या पोटात असताना मुलाची व्यवस्थित वाढ होण्याच्या दृष्टीने गर्भावस्थेच्या प्रत्येक महिन्यात त्याची वाढ कशी होते, त्यानुसार मातेचा आहार काय असावा हे सर्व शास्त्र व्यवस्थित समजावलेले आहे. निरोगी मुलाचा जन्म होण्यासाठी स्त्री-पुरुषाने कसे वागावे, त्यांनी कुठली तयारी करावी हेही शास्त्रात सांगितलेले आहे. आयुर्वेदात कौमारभृत्यतंत्र या विभागात अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयावर फार सुंदर मार्गदर्शन केलेले आहे. यात चांगल्या संततीसाठी पती-पत्नीची योग्य जोडी कशी निवडावी यापासून गर्भधारणेसाठी शरीराची पंचतत्त्वशुद्धी, शरीरातील वात-पित्त-कफ या त्रिदोषांचे संतुलन, रसायन, वाजीकरण, प्रकृतीच्या अनुसार आहार-विहारापर्यंत अनेक गोष्टींचा व्यवस्थित ऊहापोह केला आहे.

घरातील मूल म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा आनंद असतो. बाळलीलांचा अनुभव हा स्वर्गातील अनुभवाच्या तोडीस तोड ठरावा असा असतो. परंतु जर काही कारणाने बालकात काही दोष असला, बालकाची वाढ हवी तशी होत नसली तर या आनंदाची परिणती दुःखात होण्यास वेळ लागत नाही. दोन एप्रिल म्हणजे उद्याचा दिवस ‘ऑटिझम’ किंवा ‘स्वमग्नता’ग्रस्त बालकांमध्ये आढळणाऱ्या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करणारा दिवस होय. या निमित्ताने आज आपण बालकाच्या

वाढीबद्दल आयुर्वेदाची भूमिका समजून घेऊ या. लहान मुलांची वाढ खूप झपाट्याने होत असते. डोळ्यांनी दिसू सुद्धा न शकणाऱ्या दोन बीजांपासून नऊ महिन्यात जसा परिपूर्ण जीव तयार होतो, तसेच जन्मानंतर पहिली काही वर्षे बाळाच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक विकासाच्या दृष्टीने खूप मोलाची असतात. जन्मतः बहुतेक सर्व शरीरघटक तयार झालेले असले तरी त्यांचा विकास जन्मानंतरही होत असतो, विशेषतः मेंदूची वाढ पहिल्या सहा महिन्यात खूप झपाट्याने होत असते.

नंतरही साधारणपणे दोन वर्षांपर्यंत मेंदूचा आकार वाढत असतो. संपूर्ण बाल्यावस्थेत हाडांचा, मांसधातूचा विकासही मोठ्या प्रमाणावर होत असतो. अर्थातच हा विकास क्रमाक्रमाने होत असतो. यालाच ‘वाढीचे टप्पे’ असे म्हटले जाते. आई-बाबा बनलेल्या प्रत्येकाला हे वाढीचे टप्पे माहिती असायला हवेत आणि आपले बाळ या टप्प्यांचा प्रवास योग्य गतीने करते आहे ना याकडे नीट लक्ष ठेवायला हवे. दृष्टी स्थिर होणे, मान धरणे, हसणे, आवाजाकडे वळून पाहणे, कुशीवर वळणे वगैरे टप्पे बाळाने वेळेवर पार पाडणे अपेक्षित असते. यातून शरीरातील मेंदू, मज्जातंतू, अस्थिधातू, मांसधातू वगैरे महत्त्वाचे घटक योग्य प्रकारे विकसित होत असल्याचे समजते असते. आणि म्हणूनच जर या क्रिया योग्य वेळेला झाल्या नाहीत तर ती आतल्या दोषाची, अशक्ततेची नांदी असते. यावर जितक्या लवकर, जितके चांगले उपचार मिळतील तितक्या चांगल्या प्रकारे काम करता येणे शक्य असते.

झपाट्याने विकास होण्याचा कालावधी एकदा निघून गेला की मग गुणही कमी प्रमाणात येताना दिसतो. म्हणूनच बाळाची वाढ योग्य क्रमाने होते आहे ना, बाळ वेळेवर विकासाचे टप्पे पार करते आहे ना याकडे आई-वडिलांनी व घरातल्यांनी काटेकोरपणे लक्ष द्यायला हवे. बाळाच्या जन्मानंतरचे विकासाचे टप्पे, शारीरिक- बौद्धिक वाढ समजून घेणे सोपे असते. पण आयुर्वेदात याच्याही पुढे जाऊन जन्माअगोदर आईच्या पोटात असताना मुलाची व्यवस्थित वाढ होण्याच्या दृष्टीने गर्भावस्थेच्या प्रत्येक महिन्यात त्याची वाढ कशी होते, त्यानुसार मातेचा आहार काय असावा हे सर्व शास्त्र व्यवस्थित समजावलेले आहे. निरोगी मुलाचा जन्म होण्यासाठी स्त्री-पुरुषाने कसे वागावे, त्यांनी कुठली तयारी करावी हेही शास्त्रात सांगितलेले आहे. आयुर्वेदात कौमारभृत्यतंत्र या विभागात अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयावर फार सुंदर मार्गदर्शन केलेले आहे. यात चांगल्या संततीसाठी पती-पत्नीची योग्य जोडी कशी निवडावी यापासून गर्भधारणेसाठी शरीराची पंचतत्त्वशुद्धी, शरीरातील वात-पित्त-कफ या त्रिदोषांचे संतुलन, रसायन, वाजीकरण, प्रकृतीच्या अनुसार आहार-विहारापर्यंत अनेक गोष्टींचा व्यवस्थित ऊहापोह केला आहे. यात गर्भधारणा झाल्यावर गर्भवतीचे खाणे-पिणे, व्यायाम, दुष्ट शक्तींपासून संरक्षण आणि गर्भाच्या व्यवस्थित व सर्वांगीण वाढीसाठी मंत्र, संगीत याबद्दलही मार्गदर्शन आहे. ‘स्त्री संतुलन’ आणि ‘गर्भसंस्कार’ या शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या माझ्या संगीतरचनांचा अनुभव व फायदा अनेकांनी घेतला आहे.

नैसर्गिक आहाराद्वारे गर्भाचे व मातेचे पोषण करून सुलभ प्रसूतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन केले गेले आहे. प्रसूतिवेदना (लेबर पेन) सुरू झाल्यावर विशेष लेप केल्याने प्रसूती अत्यंत सुलभ होते. जन्मानंतर अंगाला तेल लावणे, धुरी देणे, शरीर पूर्ववत होण्यासाठी योग्य आहारयोजना, व्यायाम, तसेच बाळाला भरपूर व अनेक महिने स्तन्य मिळण्यासाठी इलाज सांगितले आहेत. आयुर्वेदीय सल्ल्यानुसार वागल्यास जन्माला येतानाच बालक सुदृढ, बुद्धिमान व निरोगी असेल म्हणजे मुलाच्या देखरेखीचे पुढील सर्व काम सोपे होते आणि याचा उपयोग व्यक्तीला जन्मभर होतो. आजकाल गर्भारपणात औषधांच्या अतिसेवनामुळे, चुकीच्या व आपल्या प्रकृतीला न झेपणाऱ्या आहार-विहारामुळे बालकांना जन्मतः वेगवेगळ्या ॲलर्जीसारखे रोग किंवा प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या अडचणीमुळे (कॉम्प्लिकेशनमुळे) जन्मतः येणारी व्यंगे पाहावयास मिळतात. याउलट आयुर्वेदिक तसेच जुन्या व चांगल्या अनुभवाच्या आधारावर बाळंतपण सुलभ होऊन हसरी, निरोगी व बुद्धिमान बालके जन्माला येतात हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. आग्य्राचा ताजमहाल, शनिवारवाड्याचे ध्वनिप्रकाश कार्यक्रम किंवा मॉडर्न गेम पार्क्स, हे सर्व कोणासाठी? संगणक संदेशवहन आणि परग्रहवस्ती हे सर्व कोणासाठी? कुठलीही ॲलर्जी नसलेली, जन्मतः चष्मा नसलेली किंवा नंतर आयुष्यभर दृष्टी उत्तम राहील अशी, भरपूर खाता-पिता येईल, प्रवास करता येईल अशी बालके जन्माला आली तरच हे आजचे सर्व सृजन त्यांच्या उपयोगाला येईल.

केवळ तुमचे-आमचे नव्हे, तर सर्व पृथ्वीचेच उज्ज्वल भवितव्य या सुदृढ, निरोगी व बुद्धिमान बालकांच्या अनुशासित व आनंदमय जीवनावर अवलंबून आहे. मात्र डिलेड माईलस्टोन (वाढ सावकाश होणे) असलेल्या मुलांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येऊ लागले. सध्या अनेक अनेक कुटुंबात अशी तक्रार असल्याचे दिसते की आमच्या मुलांची वाढ नीट होत नाही. मंदमती असलेली मुले अधिक प्रमाणात जन्माला येऊ लागल्याचे लक्षात येऊ लागले. व अशा मुलांसाठी वेगळ्या शाळा, वेगळे शिक्षक, वेगळे अन्न, वेगळी वैद्यकीय सेवा वगैरेंची पूर्तता करण्याची आवश्‍यकता भासू लागली. बालक वाढत असताना त्याचे शरीर, मन, बुद्धी, आकलनशक्ती व त्याचे कुटुंबासाठी असलेले प्रेम वगैरे सर्व गोष्टी संतुलित रीतीने वाढण्यासच, बालक समाजाचा एक उत्तम घटक होऊन कुटुंबाला व समाजाला मदत करू शकेल व समाजासाठी एक अभिमानाची बाब ठरू शकेल. तेव्हा बालकाची सर्वांगीण वाढ कशी होईल याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com