आरोग्यासाठी पर्यावरणरक्षण...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Environmental protection for health

‘पिंडी ते ब्रह्मांडी’ ही भारतीय संकल्पना आज संपूर्ण जगाने स्वीकारण्याची गरज आहे. पिंड म्हणजे व्यक्ती आणि ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण विश्र्व.

आरोग्यासाठी पर्यावरणरक्षण...!

५ जून रोजी संपूर्ण जगात पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरणाचे आणि त्यातील बदलांचे साहजिकच आपल्या जीवनावर, आरोग्यावर परिणाम होत असतात. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आजच्या लेखात आपण याचाच आढावा घेणार आहोत.

‘पिंडी ते ब्रह्मांडी’ ही भारतीय संकल्पना आज संपूर्ण जगाने स्वीकारण्याची गरज आहे. पिंड म्हणजे व्यक्ती आणि ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण विश्र्व. जे विश्र्वात आहे ते सर्व व्यक्तीमध्ये आहे आणि जे व्यक्तीत आहे ते संपूर्ण विश्र्वात आहे. याचाच अर्थ असा, की व्यक्तिगत आरोग्य सांभाळायचे असेल तर त्यासाठी आपण ज्या पर्यावरणात राहतो त्याचे आरोग्य सांभाळणे गरजेचे होय. भारतीय ऋषीमुनींनी हे तत्त्व हजारो वर्षांपूर्वी जाणले आणि ते जपण्यासाठी भारतीय संस्कृती अशा प्रकारे जनमानसात रुजवली की जिच्यायोगे मनुष्याचे व पर्यावरणाचे, दोघांचेही आरोग्य राखले जाईल. वेदांमध्ये अग्नी, पवन, पर्जन्य, सूर्य, वृक्ष, नदी, पर्वत वगैरे सर्व नैसर्गिक, पर्यावरणातील तत्त्वांना देवता म्हणून संबोधले आहे, तो यातीलच एक भाग. पाच जून हा पर्यावरण दिन म्हणून ओळखला जातो.

भारतीय संस्कृतीत मात्र वसंताचे आगमन झाले की गुढी उभारून त्याचे स्वागत करणे, रामनवमीच्या निमित्ताने वसंतात वाढणाऱ्या कफदोषाचे पंजरीचा प्रसाद घेऊन शमन करणे, चातुर्मासाच्या निमित्ताने उपवास करून शरीरातील अग्नीचे रक्षण करणे, नागपंचमीला नागाचे पूजन, वसुबारसेला गाईचे पूजन, होळीला अग्निपूजन या आणि अशा सर्वच प्रथा, परंपरा एका बाजूने आरोग्यरक्षण करतात तर दुसऱ्या बाजूने मनुष्याला निसर्गाच्या जवळ नेतात. विश्र्वातील प्रत्येक घटक, अगदी एक न् एक अणू-रेणू एकमेकांशी प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे जोडलेला असतो. पर्यायाने एकात होणारा बदल दुसऱ्यावर परिणाम करतो. जड वस्तू असो किंवा सजीव प्राणिमात्र असोत, प्रत्येकात, जाणीव किंवा चैतन्यतत्त्व असतेच. जोपर्यंत वस्तूतील जाणीव ठरलेल्या मर्यादेच्या चौकटीत चालते तोपर्यंत त्याचे खूपसे गणित करता येते. यामुळे भौतिक गोष्टी, जड वस्तू किंवा प्राणिमात्रांचे शरीर यांच्याविषयी अंदाज वर्तवणे सोपे असते.

आधुनिक विज्ञानाने भौतिक शरीराचा सूक्ष्म स्तरापर्यंत अभ्यास केला, सर्व प्राणिमात्र पेशींपासून बनलेले असून त्यात असणाऱ्या गुणसुत्रांचा आधार घेऊन ते कार्य करत असतात हा निष्कर्ष काढला. फक्त भौतिकता हाच आधार घेतल्याने संपूर्ण विश्र्व हे एक यंत्र आहे आणि मनुष्य सुद्धा यंत्र आहे असा समज केला गेला. आणि भौतिकशास्त्र अशा निर्णयाप्रत आले की मनुष्यमात्र हा स्वतंत्र आहे, त्यासाठी परमेश्र्वर नावाच्या कुठल्याही शक्तीची आवश्‍यकता नाही, अशी कुठली शक्ती अस्तित्वात नाहीच. पण देवाचे अस्तित्व नाकारण्यात आले तेव्हा देवाने ठरविले, ‘आता मला माझे अस्तित्व दाखवून द्यावेच लागेल. आता मला माझे दर्शन द्यावेच लागेल.’ आणि त्यातून उदय झाला क्वांटम फिजिक्सचा. असे लक्षात आले की या विश्र्वात अति सूक्ष्म, इंद्रियांना अगोचर असे अस्तित्व आहे आणि या अति सूक्ष्म अस्तित्वाचा परिणाम सर्व मनुष्यमात्रांवर, प्राणिमात्रांवर होत राहतो. त्यामुळे जसे स्थळ व काळ बदलेल तसे व्यक्तीला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात किंवा त्यात वेगवेगळे बदल होऊ शकतात. याचा अर्थ असा की चांगले-वाईट केवळ वस्तूवर, शरीरावर, त्यात असलेल्या गुणसूत्रांवर अवलंबून नसते तर त्यावर बाहेरच्या वातावरणाचा प्रभाव पडतो. म्हणजेच आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहोत व आपला एकमेकांवर प्रभाव पडतो. सूर्य जसा आपल्याला तापवतो तसे आपणही अत्यल्प प्रमाणात का होईना सूर्यावर परिणाम करू शकतो. आपण सूर्यासाठी केलेल्या प्रार्थनेचा परिणाम अतिसूक्ष्म असेल व तो केवळ तर्काने समजता येईल, पण तो होतो हे नक्की. या अशा संकल्पनेमुळे संपूर्ण विज्ञानाला एक वेगळी दिशा मिळाली.

जी वस्तू दिसते व जिचे गुण कळतात तिचाच आपल्यावर परिणाम होतो हा सिद्धांत जाऊन त्या जागी परमेश्र्वराचे अस्तित्व मान्य करावे लागले. या शक्तीला ‘परमेश्र्वर’ असे म्हटले नाही तरी अशी काहीतरी ‘अदृश्‍य शक्ती’ आहे हे मान्य करावेच लागले. यातून पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबतीत किंवा पर्यावरणाच्या संरक्षणाच्या बाबतीत अधिक दक्ष राहण्याची आवश्‍यकता लक्षात आली. मनुष्याच्या वाढलेल्या अहंकाराचा, त्याच्या लोभी वृत्तीचा, क्रोधाचा, वाढलेल्या हिंसेचा परिणाम वातावरणावर होणे साहजिक आहे. यामुळे आज अनेक दुष्परिणाम दिसू लागले आहेत, मनुष्याला पळता भुई थोडी व्हायची वेळ आली आहे. उद्या मनुष्याला प्यायचे पाणी मिळेनासे झाले तर काय करणार? आज अचानक त्सुनामी वाढल्या, भूकंप वाढले, साथीचे रोग वाढले असल्याचे दिसत असल्यामुळे पर्यावरणाकडे वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज उत्पन्न झालेली आहे.

वातावरणात दूषित वायू न सोडणे एवढ्या एकाच उपायाने हे काम होणार नाही, तर यज्ञामागाचे विज्ञान समजून घेऊन यज्ञयागादी करणे, विशिष्ट वनस्पतींना यज्ञीय पद्धतीने शक्तीत रूपांतरित केले तरच पर्यावरणाची शुद्धी लवकर व व्यवस्थित होऊ शकेल. यज्ञाच्या धुरात अत्यंत सूक्ष्म रूपात द्रव्य असते, दिसले नाही तरी ते वातावरणात पसरते. धुरावर प्रक्षेपित केलेले मंत्रतरंग हेही धुराबरोबर वातावरणात पसरतात व इच्छित परिणाम घडवून माणसाला सुखी करू शकतात. पर्यावरणात असलेल्या दूषित वायूंचा नाश करण्यासाठी त्यात चांगले वायू सोडणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे वातावरणात चांगले विचारतरंग सोडण्याचीही आवश्‍यकता आहे.

आयुर्वेदाने व वेदशास्त्राने सुचविलेले यज्ञयाग हेही पर्यावरणासाठी आवश्‍यक ठरतात. आपल्या व्यवहारात शौर्य असावे पण हिंसा नसावी, कारुण्य असावे पण दीनता नसावी, प्रेम असावे पण ममत्व नसावे. एकूण मनुष्यमात्राने ‘घेण्याचे’ सोडून ‘देण्याचे’ धाडस दाखवावे, हे सुद्धा पर्यावरणशुद्धीसाठी आवश्‍यक ठरते. अन्यथा सद्यःस्थितीत दिसणारे अत्याचार, व्यभिचार, हिंसा वाढत जाऊ शकतात व त्यातून मनुष्यमात्र अधिक दुःखी होऊ शकतो. तेव्हा पर्यावरण रक्षणाचा विचार करत असता वनस्पती, वृक्ष यांच्या वाढीवर भर देण्याबरोबरीने, कचरा व्यवस्थापन, वाईट धुराचे व्यवस्थापन करण्याबरोबरीने मनुष्याच्या वागणुकीची शुद्धी, विचारांची शुद्धी केली, दान, प्रेम या गोष्टींकडे लक्ष तरच मनुष्य सुखी होऊ शकेल.

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.

Web Title: Article Writes Environmental Protection For Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top