गर्भश्रीमंती संस्कारांची !

जीवन आनंदमय व संतुलित होण्यासाठी करायची कृती म्हणजे संस्कार. सर्व भारतीय विद्या संस्कारांना महत्त्व देतात.
Life Culture
Life CultureSakal
Summary

जीवन आनंदमय व संतुलित होण्यासाठी करायची कृती म्हणजे संस्कार. सर्व भारतीय विद्या संस्कारांना महत्त्व देतात.

मनामुळेच प्रत्येक प्राणिमात्राचा एक विशिष्ट स्वभाव असतो. अगदी दगडाचाही एक स्वभाव असतो आणि त्यावरून आपण ओळखतो की हा खडा आहे की वाळू आहे; कोळसा आहे की हिरा आहे, की अमुक रत्न आहे. कोळशाचाच हिरा होतो हे आपण जाणतो, पण कोळशाचा हिरा होतो तो केवळ संस्कारांमुळे, अग्नी आणि काळाच्या संस्कारामुळे. दगडावरही जर संस्कार होऊ शकतात, तर गर्भावर, मुलांवर, मनुष्यावर केलेल्या संस्कारांचे किती उत्तम परिणाम होत असतील...

जीवन आनंदमय व संतुलित होण्यासाठी करायची कृती म्हणजे संस्कार. सर्व भारतीय विद्या संस्कारांना महत्त्व देतात. आयुर्वेदात औषधे बनविताना, पाकशास्त्रात अन्न बनविताना, योगशास्त्रात मनावर संयम ठेवताना, गुरुकुलात विद्यार्थी तयार करताना संस्कार सर्वांत महत्त्वाचे असतात. एखाद्या लहान मुलाला पाहिल्यावर त्याच्या सवयी व त्याचे वागणे पाहिल्यावर आपण म्हणतो की याला घरचे चांगले संस्कार आहेत. कृतीच्या मागे असतात विचार व विचाराच्या मागे असते मन. स्मृती, वस्तुस्थिती, शक्याशक्यता या सर्वांतून निर्णय घेऊन नंतर त्या विचारातून कृती घडते. वस्तू जेवढी सूक्ष्म असेल तेवढे त्या वस्तूवर अधिक संस्कार होतात किंवा सूक्ष्म वस्तूचे संस्कार इतर वस्तूंवर अधिक प्रमाणात होतात. गंध जाणवतो पण दिसत नाही, धूप दिसला तरी पडकून ठेवता येत नाही. पण या सूक्ष्मत्वामुळेच यांच्यात संस्कार करण्याची मोठी क्षमता असते.

सुगंधी फुलाचा सुवास मनाला प्रसन्न करतो तर कुठेतरी उकिरड्यावर असलेला दुर्गंध सर्व वातावरण दूषित करून टाकतो किंवा संध्याकाळच्या वेळी खालच्या मजल्यावरील बिऱ्हाडाने केलेला धूप सर्व इमारतीला व सदनिकांना सुगंधित करतो. मनाचे तरलत्व तर अवर्णनीय आहे. प्रभु हनुमंतांचे वर्णन करत असता, ‘मनासि टाकिले मागे गतीसी तुळणा नसे’ असे समर्थ श्रीरामदास स्वामींनी म्हटलेले आहे, म्हणजे मनाची गती व सूक्ष्मत्व जवळ जवळ अंतिम आहे परंतु त्यामागची शक्ती, प्रेरणा व देवत्व हे त्याहून अधिक सूक्ष्म आहे. त्यामुळे मनावर संस्कार होतात तसेच मनाचे इतरांवर संस्कार होतात. उत्क्रांत मन फक्त मनुष्यालाच असते म्हणून आपण त्याला मनुष्य म्हणतो. मनुष्याप्रमाणे प्राणिमात्रांना इतकेच नव्हे तर जड वस्तूला अगदी दगडालाही मन असते. मनामुळेच प्रत्येक प्राणिमात्राचा एक विशिष्ट स्वभाव असतो. अगदी दगडाचाही एक स्वभाव असतो, आणि त्यावरून आपण ओळखतो की हा खडा आहे की वाळू आहे; कोळसा आहे की हिरा आहे, की अमुक रत्न आहे. कोळशाचाच हिरा होतो हे आपण जाणतो, पण कोळशाचा हिरा होतो तो केवळ संस्कारांमुळे, अग्नी व काळाच्या संस्कारामुळे. दगडावरही जर संस्कार होऊ शकतात, तर गर्भावर, मुलांवर, मनुष्यावर केलेल्या संस्कारांचे किती उत्तम परिणाम होत असतील.

मनुष्याला उत्क्रांत करण्याचे सर्वोत्तम साधन आहे संस्कार. जर भौतिकापासून ते चैतन्यापर्यंत संस्कार होत असतील तर गर्भात असणाऱ्या बालकावर ते निश्र्चितच होऊ शकतात. तशा कथा भारतीय परंपरेत आपल्या वाचनात येतात. समाजात दिसणारी गैरवर्तणूक म्हणजे त्या माणसावर झालेल्या चुकीच्या संस्कारामुळे झालेली कृती असते. आपण जेव्हा म्हणतो की गुन्हेगाराला शिक्षा करत असताना शरीराला वा व्यक्तीला शिक्षा करायची नसून गुन्हेगारी वृत्तीला बाहेर काढण्याचा हेतू असावा लागतो. तेव्हा वृत्ती म्हणजे खिशातून पदार्थ बाहेर टाकायचा पदार्थ आहे का? नाही, तर त्याच्यावर झालेले कुसंस्कार दूर करायचे असतात. चांगल्या संस्कारांनीच आधीचे चुकीचे संस्कार काढून टाकता येतात. घरात दहा दिवस गणपती बसविल्यास, नवरात्र बसविल्यास किंवा एखादे ज्ञानशिबिर आयोजित केल्यास जसे नियमात राहावे लागते, तसेच गर्भारपणाच्या नऊ महिन्याच्या काळात काही पथ्य पाळावी लागतात. काय खावे, काय खाऊ नये, डोहाळे कसे पुरवावे, कुठला योग करावा, कोठली आसने करावीत, स्त्री सतत आनंदात राहण्यासाठी काय करावे, तिने काय पाहावे, आपल्या शयनगृहात तिने कुठली चित्रे लावावीत, रोज कुणाला भेटावे, कुठल्या तरी भलत्याच प्रसंगाला सामोरे जाऊ नये अशी दिनचर्या हा संस्काराचाच एक भाग असते. डोहाळजेवणाच्या वेळी स्त्रीला ओवाळण्याची पद्धत असते.

आज जगातल्या सर्व ध्यानपद्धतींत, अाध्यात्मिक आचारसंहितेत, ईश्र्वरी वास असलेल्या जागेत दिवा लावण्याची (मग ते निरांजन असो वा मेणबत्ती) पद्धत आहे. ओवाळताना दिव्यावर होत असलेल्या त्राटकाने शरीरातल्या शक्तीला कशी उत्तेजना मिळते, मन कसे प्रसन्न होते, मेंदूचे द्वार असलेल्या आज्ञा चक्रातून हा संदेश (सिग्नल) आत गेल्यावर मन कसे प्रसन्न होते हे वैज्ञानिकांनाही पटलेले आहे. तेव्हा ‘ओवाळणे’ ही एक भारतीय बुरसटलेली कल्पना आहे असे न मानता, अशा गोष्टींचा अवलंब करणे हेच इष्ट. पोटात मूल वाढत असताना कोणती औषधे घ्यावीत, जी उष्णता वाढविणार नाहीत, किंवा त्यांचे दुष्परिणाम असणार नाहीत याची काळजी गर्भारपणात घ्यायला नको का? जन्मजात मुलाच्या अंगावरील त्वचेवर पुरळ (रॅश) असणार नाही, त्याच्या हृदय वगैरे अवयवात काही दोष असणार नाही याची काळजी गर्भारपणातच घेणे आवश्‍यक असते. गर्भारपणाच्या आधी पंचकर्म करून रसायन वाजीकरण चिकित्सा करून दांपत्याने तयारी केली असल्यासच पुढे चांगले परिणाम दिसतात. ‘स्त्री संतुलन’सारखे संगीत ऐकल्याने सर्व शरीराचे संतुलन होऊन गर्भधारणा होण्यासाठी शारीरिक व मानसिक पातळ्यांवर सुपीक जमीन तयार होऊन गर्भ राहिल्यावर संगीताचा, मंत्रांचा, ओवाळण्याचा वगैरे संस्कार केले तर सुंदर निरोगी व सुदृढ अपत्यप्राप्ती होते असा अनेकांचा अनुभव आहे.

सध्या आपण आढळणाऱ्या विकृतींविषयी ओरडत राहतो. गावातल्या महादेवाच्या मंदिरात पाऊस पाडावा या नवसासाठी प्रत्येकाने एक छोटा गडवाभर दूध टाकण्याचे ठरविले. पण गावातील बहुतेक लोकांनी असा विचार केला की ‘मी एकट्याने पाणी टाकले तर इतरांनी टाकलेल्या दुधात समजून येणार नाही’, पण अशा प्रवृत्तीमुळे सकाळी सर्व गाभारा निव्वळ पाण्याने भरलेला दिसला. आज समाजात काहीसे असेच चित्र दिसते. प्रत्येक व्यक्ती ओरडते की आज जीवन बिघडलेले आहे, भ्रष्टाचार व हिंसाचार वाढला आहे पण असे होण्यामागे जबाबदारी सर्वांचीच आहे. समाज ज्या व्यक्तींमुळे बनतो त्या व्यक्ती सुदृढ व संस्कारसंपन्न निर्माण झाल्या तरच समाज चांगला होईल. प्रत्येकाने सहकार्य करायचे ठरवून बालक जन्मण्यापूर्वीच जर गर्भसंस्कार करून काळजी घेतली तर जीवनाचे नंदनवन होऊन पुन्हा सर्वांना आनंद, सौंदर्य व शांतीचा लाभ होईल. यादृष्टीने गर्भसंस्कार सर्वांत प्रभावी असतात.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com