आयुर्वेदातील अग्निसंकल्पना

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 23 December 2016

जाठराग्नी सेवन केलेल्या अन्नाचे धातूंत किंवा शरीरधारण करणाऱ्या पंचमहाभूतांत रूपांतर करत असतो. अन्नावर पहिली प्रक्रिया होते ती जाठराग्नीकडून आणि त्यातून तयार होतो तो आहाररस.

शरीरात नामनिर्देश करता येतील असे तेरा अग्नी असतात, यापैकी जाठराग्नी हा सर्वांत प्रमुख असून इतर सर्व अग्नींचा आधार असतो.

यथास्वेनोष्मणेति पृथिव्यादिरुपाशितादेर्यस्य य ऊष्मा पार्थिवाग्न्यादिरुपस्तेन ।।....चरक सूत्रस्थान चक्रपाणी टीका

जाठराग्नी हा सात धातू, सात धात्वग्नी आणि पाच महाभूतांचे पाच भूताग्नी यांना दीप्त करत असतो आणि त्यातून क्रमाने सातही धातूंची उत्पत्ती, पोषण होत जाते. तसेच पांचभौतिक आहारातून शरीरातील पाच महाभूतांची पूर्ती होत राहते. मात्र अग्नीकडून पचन होत असले तरी इंधन हे बाहेरूनच मिळवायचे असते. ज्याप्रमाणे स्वयंपाकघरातील अग्नी अन्न शिजविण्यास समर्थ असला तरी मूळ अन्न, उदा. तांदूळ, पाणी किंवा मूग-तांदूळ, पाणी वगैरे अन्नधान्याची योग्य प्रकारे योजना केली तरच त्यातून चांगला भात किंवा खिचडी तयार होऊ शकते.

जाठराग्नी हासुद्धा सेवन केलेल्या अन्नाचे धातूंत किंवा शरीरधारण करणाऱ्या पंचमहाभूतांत रूपांतर करत असतो. अन्नावर पहिली प्रक्रिया होते ती जाठराग्नीकडून आणि त्यातून तयार होतो तो आहाररस.

यस्तेजो भूतः सारः परमसूक्ष्मः स रस इत्युच्यते, तस्य हृदयं स्थानं, कृत्स्नं शरीरम्‌ अहरहस्तर्पयति वर्धयति धारयति, यापयति चादृष्टकेन कर्मणा ।।...सुश्रुत सूत्रस्थान
आहाररस हा तेजोमय असतो, अन्नाचे सारस्वरूप असतो आणि परमसूक्ष्म (इंद्रियांना गम्य नसणाऱ्या स्वरूपात) असतो. त्याचे स्थान हृदय असते आणि तो हृदयातून संपूर्ण शरीरात अगदी सूक्ष्मातील सूक्ष्म स्रोतसात पोचून शरीराचे तर्पण (सर्व शरीरपेशींना तृप्त करणे), पूरण (सर्व शरीरघटकांची पूर्ती करणे), यापन (सर्व शरीराची देखभाल करणे) व धारण (सर्व शरीराचे धारण करणे) ही कामे करतो.
अर्थात हे सर्व काम व्यवस्थित होण्यासाठी आहारसुद्धा सर्वगुणसंपन्न असावा लागतो. "आडातच नाही तर पोहऱ्यात कसे येणार' या उक्‍तीनुसार सप्तधातूंचे पोषण व्हावेसे वाटत असेल, पाचही महाभूतांची पूर्ती होणे अपेक्षित असेल तर आहारसुद्धा सप्तधातूपोषक असणारा असायला हवा. रोज फक्‍त वडापाव, भेळपुरी किंवा तत्सम निःसत्त्व अन्न खाल्ले तर एक तर अग्नीची क्षमताच मुळात कमी होईल आणि दुसरे म्हणजे तयार झालेल्या आहाररसात शरीराचे हवे तसे पोषण करण्याची शक्‍ती नसेल.
यासाठी आयुर्वेदाने आहारपरिणामकर भाव समजावले आहेत. योग्य प्रकारे पचन होण्यासाठी अग्नी सर्वांत महत्त्वाचा असला तरी हे काम एका अग्नीकडून पूर्ण होणे शक्‍य नसते तर त्याला मदतीला इतर भावही लागतात. जसे स्वयंपाकघरात चांगला स्वयंपाक होण्यासाठी एकटा अग्नी पुरेसा नसतो तर सर्व घटकद्रव्ये चांगल्या प्रतीची असावी लागतात, त्यांचा संयोग विशिष्ट क्रमाने व्हावा लागतो, योग्य आकाराचे भांडे लागते, शिजविताना त्यात योग्य प्रमाणात तेल किंवा पाणी मिसळणे आवश्‍यक असते, किती वेळ आणि कशा प्रकारच्या आचेवर शिजवायचे आहे हे पाहावे लागते, त्याचप्रमाणे शरीरात अन्नपचन यथाव्यवस्थित होण्यासाठी सहा आहारपरिणामकर भावांची सहायता आवश्‍यक असते.

आहारपरीणामकरास्त्विमे भावा भवन्ति । तद्यथा उष्मा वायुः क्‍लेदः स्नेहः कालः समयोगश्‍चेति ।।...चरक शारीरस्थान

1. उष्मा - म्हणजे साक्षात अग्नी
2. वायू - अग्नीला संधुक्षित करण्यासाठी वायूची आवश्‍यकता असते. तसेच पचन होण्यासाठी आतड्यात, पोटात जी हालचाल व्हायची असते तीसुद्धा वायूच्या अंतर्गत असते.
3. क्‍लेद - खाल्लेले अन्न योग्य प्रमाणात ओलसर असावे लागते.
4. स्नेह - आहारात स्निग्धता नसावी तर त्याचे पचन नीट होऊ शकत नाही.
5. काल - आहाराचे पचन पूर्णपणे होण्यासाठी विशिष्ट काळ हा लागतोच.
6. समयोग - व्यक्‍तीची प्रकृती, तिच्या अग्नीची क्षमता, शरीरातील दोषांची अवस्था, व्यक्‍ती राहते तो देश, ऋतुमान, आहार शिजविण्याचे, वाढण्याचे आणि सेवन करण्याचे नियम, स्वच्छता, मनाची शांतता अशा अनेक दृष्टींनी अनुकूल अशा प्रकारचा आणि हितकर अशा परिस्थितीत आहार घेतला तरच त्याचे पचन योग्य प्रकारे होऊ शकते. याविषयीची अधिक माहिती आपण पुढच्या वेळी घेऊ.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayurveda