अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

मागच्या वेळी आपण सर्व चवींचे सेवन करणे हे शक्‍ती वाढण्यासाठी सर्वोत्कृष्ट असते हे पाहिले. या पुढे चरकाचार्य म्हणतात, 

एक रसाभ्यासो दौर्बल्यकराणाम्‌ - फक्‍त एकाच चवीचे पदार्थ सेवन करणे हे दुर्बलतेचे मुख्य कारण असते. 

आहार षड्रसात्मक असणे हे संतुलित आहाराचे एक लक्षण असते. ‘मी कडू चवीचे काही खात नाही’ असे सांगणारी व्यक्‍ती संतुलित आहारापासून वंचित राहत असते. 

तत्त्रिविधं प्रवरावरमध्यविभागेन सप्तविधं च रसैकैकत्वेन सर्वरसोपयोगाच्च ।

व्यक्‍ती किती प्रकारच्या चवी सेवन करू शकते किंवा करते त्यावरून प्रवर (श्रेष्ठ), अवर (हीन) आणि मध्य असे तीन प्रकार होतात. 

तत्र सर्वरसं प्रवरम्‌ म्हणजे सर्व रसांचे सेवन करणे हे श्रेष्ठ समजले जाते.

अवरम्‌ एकरसम्‌ म्हणजे कुठल्या तरी एकाच रसाचे सेवन करणे हे हीन समजले जाते आणि  ध्यमस्यु प्रवरावरमध्यपस्थम्‌ म्हणजे दोन, तीन, चार किंवा पाच रसांचे सेवन करणे हे मध्यम समजले जाते.

तत्र अवरमध्याभ्यां सात्म्यानां क्रमेण प्रवरम्‌ उपायदयेत्‌ म्हणजे जे हीन किंवा मध्यम प्रकारात मोडत असतील त्यांनी क्रमाक्रमाने ‘प्रवर’ म्हणजे सहाही रसांचे सेवन करण्याची सवय, आवड निर्माण करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक होय. 

व्यवहारात आपण पाहतो की एखादे लहान मूल गोड अजिबात खात नाही किंवा एखाद्या मुलाला फक्‍त गोडच खायला हवे असते, काही व्यक्‍तींना तिखट खायला अजिबात आवडत नाही, काही जण कडू चव सपशेल नाकारतात. या उलट मधुमेही व्यक्‍ती मधुर चव सेवन करणे पूर्ण थांबवून कडू रसाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करते. मात्र आयुर्वेदाच्या या सूत्रांवरून स्पष्ट होते की प्रत्येक व्यक्‍तीने गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट या सहाही चवीच्या पदार्थांचे सेवन करणे हे आरोग्यासाठी आवश्‍यक आहे. 

हे सहा रस ज्या क्रमाने उल्लेखलेले आहेत, त्या क्रमाने उपयुक्‍त असतात. म्हणजे मधुर रस सर्वांत महत्त्वाचा आणि त्यामुळे सर्वाधिक प्रमाणात सेवन करायचा असतो. त्याच्या खालोखाल आंबट, त्यापेक्षा कमी खारट, त्याहीपेक्षा कमी प्रमाणात तिखट व कडू आणि तुरट रस तर फारच कमी प्रमाणात सेवन करायचा असतो. थोडेसे गोड व खूप सगळे तिखट पदार्थ खायची सवय किंवा मधुमेहामुळे गोड पूर्णतः बंद करून कडू, तुरट चवीचा अतिरेक हा आरोग्यासाठी हितकारक ठरू शकत नाही. योग्य प्रमाणात आणि योग्य स्वरूपात प्रत्येक रस महत्त्वाचा असतो. म्हणून आहार प्रकृतीनुसार वेगवेगळा असला, तरी त्यात षड्रस हे असावेच लागतात. 

मधुर रसाचे पदार्थ- दूध, तूप, लोणी, गूळ, शर्करा, शतावरी, ज्येष्ठमध, द्राक्षे, केळे, मध, जुने तांदूळ, साळीच्या लाह्या वगैरे.

आंबट रसाचे पदार्थ- लिंबू, आवळा, डाळिंब, महाळुंग, कोकम, ताक, संत्रे, मोसंबे वगैरे

खारट रस- सौवर्चल, सैंधव, सामुद्र, औद्भिद, बिड लवण, रोमक, पांसुज लवण व वनस्पतींचे क्षार ही लवण रसाची उदाहरणे होत. यातील सैंधव लवण सर्वश्रेष्ठ होय. रोजच्या स्वयंपाकात आपण वापरतो ते सामुद्र मीठ असते. पण आयुर्वेदिक औषधात मात्र मुख्यत्वे सैंधव मीठच वापरले जाते. 

तिखट रसाचे पदार्थ -हिंग, मिरे, सुंठ, पिंपळी, लाल मिरची, विडंग, लसूण, ओवा, आले वगैरे

कडू रसाचे पदार्थ - हळद, मेथी, कारले वगैरे 

तुरट रसाचे पदार्थ - सुपारी, काथ, मध, तुरटी, आवळा, जांभूळ, हिरडा वगैरे

अग्र्यसंग्रहातील यापुढचा भाग आपण पुढच्या वेळेला पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com