esakal | वजन कमी कसे करावे?
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss

वजन कमी कसे करावे?

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

अर्थात लठ्ठपणा हा एका रात्रीत येत नाही, क्रमाक्रमाने वजन वाढत जाते. एकदा वजन वाढले की ते कमी करणे व एकदा कमी झालेले वजन तसेच टिकवून ठेवणे हे काम जिकिरीचे असते. यासाठी आहार, औषध, उपचार, व्यायाम अशा चारीही बाजूंनी काम करणे आवश्‍यक असते.

सध्या वाढलेल्या वजनाची धास्ती बहुतेक सगळ्यांनाच असलेली दिसते. अगदी शाळेतील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांचे अवाजवी प्रमाणात वजन वाढलेले आढळते. भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात लठ्ठपणा झपाट्याने वाढतो आहे असे दिसून आलेले आहे. स्त्री असो किंवा पुरुष, वाढलेले वजन हे सौंदर्याबरोबर आरोग्यालाही हानिकारक असते. विशेषतः रक्तदाब, मधुमेह, हृद्रोग, स्ट्रोक वगैरे विकार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. बरोबरीने अनुत्साह, दम लागणे, पटकन थकायला होणे, घाम जास्ती येणे वगैरे लक्षणे रोजच्या जीवनातील आनंद कमी करणारी असतात. वजन कमी करायचे उपचार तर आपण पाहूच, त्यापूर्वी वजन वाढण्याची कारणे माहिती असणे व ती बंद करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे होय. भुकेच्या मानाने जास्ती जेवणे, विशेषतः रात्री भरपेट जेवणे, व्यायाम, चालणे, याकडे दुर्लक्ष करणे, दिवसा झोपणे, पचण्यास जड तेलकट पदार्थ, पनीर, चीजसारखे मेदवर्धक पदार्थ, मिठाया अति प्रमाणात किंवा रोजच्या रोज खाणे, झोपण्याच्या वेळांमध्ये अनियमितता असणे, अनुवंशिकता, औषधांचे दुष्परिणाम वगैरे कारणे वजन वाढण्यामागे असू शकतात. अर्थात लठ्ठपणा हा एका रात्रीत येत नाही, क्रमाक्रमाने वजन वाढत जाते. एकदा वजन वाढले की ते कमी करणे व एकदा कमी झालेले वजन तसेच टिकवून ठेवणे हे काम जिकीरीचे असते. यासाठी आहार, औषध, उपचार, व्यायाम अशा चारीही बाजूंनी काम करणे आवश्‍यक असते. साधारणतः लठ्ठपणा व गोड यांचा छत्तिसचा आकडा असतो, मात्र याला अपवाद असतो मधाचा. मध गोड असला तरी कफ-मेदावर अप्रतिम काम करतो. म्हणूनच भैषज्यरत्नावलीत पुढील योग दिलेला आहे, '' प्रातमधुयुतं वारि सेवितं स्थौल्यनाशनम्‌ ।...भैषज्यरत्नावली सकाळी उठल्यावर पाण्यासह मध घेतल्याने (साधारणतः कपभर पाण्यात एक चमचा मध) लठ्ठपणा कमी होतो. सकाळी आठच्या आधी किंवा संध्याकाळी पाचनंतर कोवळे ऊन अंगावर घेण्याने सुद्धा वजन कमी होण्यास मदत मिळते. अगोदर अंगाला तेल लावून, सकाळच्या उन्हात सूर्यनमस्कार करणे हा त्यातला सर्वोत्कृष्ट उपचार म्हणता येईल. व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते. योग्य औषधयोजना ही सुद्धा वजन कमी होण्यास साहायक असते. सहसा ही औषधे मेदाचे लेखन (अवाजवी मेद खरवडून काढणे) करण्याबरोबरीने वाताचे शमन करणारी, पचन सुधारणारी असतात. उदा. गुग्गुळ, वावडिंग, त्रिफळा, नागरमोथा, चित्रक, सुंठ वगैरे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीपरीक्षण करून घेऊन योग्य औषध सुरू करणे सर्वोत्तम असते. मात्र, तत्पूर्वी लगेच सुरू करता येतील अशी काही घरगुती औषधे पुढीलप्रमाणे आहेत -

‘काथ’ हा वजन कमी करण्यासाठी उत्तम असतो. चांगल्या प्रतीच्या काथाचे दीड ते दोन ग्रॅम चूर्ण रोज पाण्याबरोबर किंवा विड्याच्या पानाबरोबर घेण्याने वजन कमी होण्यास मदत होते.

  • जेवणानंतर दोन चमचे लिंबाचा रस एक कपभर पाण्यात घेण्याने सुद्धा मेद कमी होण्यास मदत मिळते.

  • माक्याचा रस मेद साठलेल्या ठिकाणी हलक्या हाताने जिरवला तर त्यामुळे वजन कमी होण्यास, विशेषतः मेदाच्या गाठी तयार झालेल्या असल्यास त्या वितळण्यास मदत मिळते.

  • वातशामक व मेदनाशक द्रव्यांनी संस्कारित केलेले अभ्यंग सिद्ध तेलासारखे तेल संपूर्ण अंगावर जिरवणे व त्यानंतर औषधी वाफेच्या मदतीने स्वेदन करणे वजन कमी होण्यासाठी उपयोगी असते.

  • कफदोष कमी करून साठलेल्या मेदाला वितळविण्यासाठी उद्वर्तन उपचार उत्तम होय. उद्वर्तन म्हणजे विशिष्ट द्रव्यांचे बारीक चूर्ण संपूर्ण अंगाला ठराविक पद्धतीने चोळणे.

  • सॅन मसाज पावडर व कुळथाचे पीठ एकत्र करून तयार केलेले मिश्रण वापरण्याने घाम कमी होतो, वजन कमी होण्यास मदत मिळते.

  • वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी. शरीरशुद्धी म्हणजे शरीरातील अनावश्‍यक गोष्टी, अति प्रमाणात साठल्याने दोषरूप झालेले भाव शरीराबाहेर काढून टाकणे. लठ्ठपणामध्ये साठून राहिलेला ‘मेद’ हा मुळात धातू असला तरी अतिप्रमाणात वाढला की दोषच म्हणावा लागतो. शास्त्रोक्त पद्धतीने शरीरशुद्धी केली असता असा दोषस्वरूप मेद कमी होतो व वजन क्रमाक्रमाने उतरते असा अनुभव आहे.

loading image
go to top