पथ्य-अपथ्य

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 23 February 2018

पथ्य, अपथ्य हे ठरलेले नसते. अमुक वस्तू पथ्यकर आणि अमुक वस्तू अपथ्यकर असे शंभर टक्के पक्के विधान करता येत नाही. कारण पथ्यकर वस्तूसुद्धा अतिमात्रेत खाल्ली तर ती अपथ्यकर ठरू शकते. प्रदेशानुसार व जीवनशैलीनुसारही पथ्यापथ्य बदलू शकते. 

स्वभावतःच कोणत्या गोष्टी हितकर आणि कोणत्या गोष्टी अहितकर असतात हे आपण मागच्या वेळी पाहिले. आयुर्वेदातील पथ्य-अपथ्य संकल्पना यावरच आधारलेली आहे. सहसा फक्‍त औषधे चालू असताना पथ्य-अपथ्य सांभाळायचे असते असा समज झालेला दिसतो. मात्र पथ्य-अपथ्य आपापल्या प्रकृतीला धरून ठरविलेले असते. औषध चालू असताना पथ्य सांभाळले की औषधाचा गुण चांगला येतो, तसेच औषध नसताना पथ्य चालू ठेवले तर पुन्हा रोग होण्यास किंवा दोषांमध्ये बिघाड होण्यास प्रतिबंध होऊ शकतो. चरक संहितेमध्ये पथ्य-अपथ्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे, 

पथ्य - पथ्यं पथोऽनपेतं यत्‌ यच्चोक्तं मनसः प्रियम्‌ ।

शरीरातील स्रोतसे, ज्यांच्यामध्ये अन्नपचन, धातू तयार होणे, श्वास घेणे-सोडणे वगैरे शरीरातील सर्व क्रिया चालू असतात. या स्रोतसांसाठी जे हानिकारक नसते तसेच जे मनाला प्रिय असते त्याला पथ्य म्हणतात. 

अपथ्य - यच्च अप्रियं च नियतं तन्न लक्षयेत्‌ ।

जे शरीरासाठी अहितकर असते, शरीराचे नुकसान करणारे असते आणि शिवाय मनाला अप्रिय असते त्याला अपथ्य असे म्हणतात. 

म्हणजे जे आपल्या प्रकृतीला हितावह आहे, शरीरधातूंना अनुकूल आहे आणि मनालासुद्धा प्रिय आहे ते आपल्यासाठी पथ्यकर असते. एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी मनाला रुचणारी नसली तर ती पथ्यात मोडत नाही. उदा. साधारणतः कफप्रकृतीच्या व्यक्‍तीसाठी कारले हितकर समजले जाते, पण जर ते त्या व्यक्‍तीला अजिबात आवडत नसले तर पथ्यकर ठरत नाही. किंवा धातुक्षय, वजन कमी होणाऱ्या व्यक्‍तीसाठी मांसरस औषधाप्रमाणे हितकर असतो, पण ती व्यक्‍ती शाकाहारी असेल व तिला मांसाहाराविषयी तिटकारा असेल, तर त्या व्यक्‍तीसाठी मांसरस पथ्यकर ठरणार नाही. 

याच्याही पुढे जाऊन चरकाचार्य सांगतात की पथ्य, अपथ्य हे ठरलेले नसते. अमुक वस्तू पथ्यकर आणि अमुक वस्तू अपथ्यकर असे शंभर टक्के पक्के विधान करता येत नाही. कारण

मात्रा - पथ्यकर वस्तूसुद्धा अतिमात्रेत खाल्ली तर ती अपथ्यकर ठरू शकते. उदा. मीठ रुची वाढविणारे, पचनास मदत करणारे, मलप्रवृत्ती साफ होण्यास मदत करणारे असते, मात्र अति प्रमाणात खाल्ले तर शुक्रधातूला कमी करते, शक्‍तीचा ऱ्हास करते. 

काळ - कोणत्या ऋतूत काय खावे हे ऋतुचर्येत समजावलेले असतेच. त्याचा विचार न करता कधीही, काहीही खाल्ले तर एका ऋतूत पथ्यकर असणारी वस्तू दुसऱ्या ऋतूत अपथ्यकर ठरू शकते. उदा. मलई बर्फीसारखी मिठाई हेमंत ऋतूत खाल्ली, तर तेव्हा अग्नी बलवान असल्याने नीट पचू शकते व धातूंचे पोषण करू शकते. मात्र हीच मलई बर्फी कफप्रकृतीच्या व्यक्‍तीने शिशिर ऋतूत खाल्ली, ती सुद्धा आवडते म्हणून थोडी जास्तीच खाल्ली, तर त्यातून कफदोष तयार होऊ शकतो. आणि हीच बर्फी पावसाळ्यात, जेव्हा अग्नी मंद झालेला असतो, खाल्ली तर अपचनाला कारण ठरू शकते. 

क्रिया - आपली जीवनशैली व आपला व्यवसाय यावर सुद्धा काय पथ्यकर, काय अपथ्यकर हे ठरत असते. दिवसभर शेतात काम करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या व्यक्‍तीने जड अन्न खाल्ले तर त्याला पचू शकते, मात्र दिवसभर बसून असणाऱ्या व्यक्‍तीला ते अन्न अपचनाला कारण ठरू शकते. 

भूमी - त्या त्या देशात पथ्यकर काय, अपथ्यकर काय याच्या व्याख्या बदलतात. उदा. दक्षिण भारतात उष्णता जास्ती असल्याने तेथे थंड गुणाचे खोबरेल तेल स्वयंपाकात वापरले जाते, तर उत्तर भारतात थंडी अधिक असल्याने तेथे मोहरीचे तेल वापरता येते. रुचीपायी किंवा इतर कोणत्या कारणाने दक्षिण भारतात मोहरीचे तेल वापरले गेले तर ते अर्थातच अपथ्यकर ठरते. 

देह - म्हणजे प्रकृती. कित्येक गोष्टी अशा असतात की त्या एका प्रकृतीला पथ्यकर असतात, पण दुसऱ्या प्रकृतीला अपथ्यकर असतात. उदा. मेथ्या कफशामक असल्याने कफ-पित्त किंवा कफ-वात प्रकृतीसाठी पथ्यकर असतात, मात्र वात-पित्त प्रकृतीसाठी अपथ्यकर असतात. थंड दूध पित्त प्रकृतीसाठी पथ्यकर असते, मात्र कफप्रवृतीसाठी अपथ्यकर असते वगैरे. 

दोषाच्या भिन्न अवस्था - ऋतुमानाप्रमाणे तसेच दिवस व रात्रीच्या विभागानुसार शरीरात वात-पित्त-कफ दोषात चढ-उतार होत असतात. त्यानुसारही कधी काय खावे किंवा काय करावे हे ठरत असते. वेळ-काळाचे भान न ठेवता खाल्लेली वस्तू किंवा केलेली क्रिया ही अपथ्यकर ठरू शकते. उदा. दुपारी झोपण्याने कफ व पित्त दोष वाढत असल्याने दुपारची झोप अपथ्यकर असते, मात्र तीच झोप रात्री घेतली तर पथ्यकर असते. दुपारचे जेवण मध्यान्ही जेव्हा पित्तदोष वाढलेला असतो तेव्हा केल्यास नीट पचते, मात्र ती वेळ उलटून गेल्यावर केलेले जेवण अपथ्यकर ठरते. 

म्हणून आपण राहतो ते देश, हवामान, आपली प्रकृती, आपला व्यवसाय, आपली जीवनशैली वगैरे सर्व गोष्टी ध्यानात घेऊन आपल्यासाठी पथ्यकर काय, अपथ्यकर काय हे ठरवणे आवश्‍यक होय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr balaji tameb article on dietetic