निसर्गाचे उन्हाळ्यातील वरदान !

निसर्ग हा आरोग्यासाठी कायम पूरक असतो. उन्हाळ्यामध्ये इतर हिरवाई दिसेनाशी झाली, नद्या-झरे आटू लागले तरी रसरशीत आणि गोड फळांची रेलचेल असते.
निसर्गाचे उन्हाळ्यातील वरदान !
Summary

निसर्ग हा आरोग्यासाठी कायम पूरक असतो. उन्हाळ्यामध्ये इतर हिरवाई दिसेनाशी झाली, नद्या-झरे आटू लागले तरी रसरशीत आणि गोड फळांची रेलचेल असते.

- डॉ. भाग्यश्री झोपे

निसर्ग हा आरोग्यासाठी कायम पूरक असतो. उन्हाळ्यामध्ये इतर हिरवाई दिसेनाशी झाली, नद्या-झरे आटू लागले तरी रसरशीत आणि गोड फळांची रेलचेल असते. उन्हाळ्यातील उष्णतेचे नियमन करण्यासाठी, घामामुळे शरीरातील कमी झालेला जलांश पुन्हा भरून येण्यासाठी शरीराची पाण्याची किंवा काहीतरी थंड पेय प्यायची ओढ रास्त असते आणि ही ओढ पूर्ण करण्यासाठी निसर्ग उन्हाळ्यात रसाळ फळे भरभरून देत असतो. निसर्गाच्या या खास योजनेचा उपयोग करून घ्यायला हवा.

आंबा

उन्हाळ्यात येणारे सर्वात लोकप्रिय फळ म्हणजे आंबा. ‘फळांचा राजा’ ही उपाधी लाभलेल्या या फळामुळे उन्हाळा सुसह्य तर होतोच शिवाय उन्हाळ्यातील उष्णता आंबा पचविण्यास मदत करते. ‘पक्वमात्रं जयेद्वायुं मांसशुक्रबलप्रदम्‌ ।...चरक सूत्रस्थान’ पिकलेला आंबा वातदोषाला जिंकतो, मांसधातू तसेच शुक्रधातूची ताकद वाढवतो, एकंदर शरीरशक्तीही वाढवतो. पिकलेला आंबा तास-दोन तास साध्या पाण्यात बुडवून ठेवावा व नंतर त्याचा रस काढून, दोन चमचे साजूक तूप, वेलची, दालचिनी, तमालपत्र आणि नागकेशर या चार वनस्पतींचे समप्रमाणात बनविलेल्या मिश्रणातील पाव चमचा मिश्रण मिसळून दुपारच्या जेवणात घ्यावा. यामुळे उन्हाळ्यामुळे वाढणारी रुक्षता आटोक्यात राहते, रक्तादी धातूंचे पोषण होते, उन्हाळ्यामुळे कोमेजलेल्या चित्तवृत्ती पुन्हा उल्हसित होतात. मधुमेहाच्या रुग्णांनी, वजन जास्ती असलेल्या व्यक्तींनी मात्र वैद्यांच्या सल्ल्याशिवाय आंबा खाऊ नये. रायवळ, लंगडा, पायरी वगैरे आंब्यांमध्ये जे धागे, रेषा असतात त्या काढण्यासाठी रस सुती वस्त्रावरून गाळून घेणे चांगले असते. यामुळे पोटात दुखणे, जुलाब होणे, पोट जड वाटणे वगैरे तक्रारींना प्रतिबंध होतो. आंब्याची ओली साल त्वचेसाठी उत्तम असते. स्नानापूर्वी अंगाला ओली साल चोळली तर त्वचेची कांती सुधारते, घामोळ्या, पुटकुळ्या वगैरे न येता त्वचा निरोगी राहते.

द्राक्षे

सर्व फळात उत्तम सांगितलेली द्राक्षे उन्हाळ्यात प्रत्येकाने अवश्‍य खावीत. द्राक्षाचा रस उन्हाळ्यात उत्तम असतो. यामुळे उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ, तोंडाला पडणारा शोष, हातापायांची व डोळ्यांची आग वगैरे लक्षणे शमतात. बिया-विरहित द्राक्षांऐवजी बीजयुक्त द्राक्षे शुक्रधातूसाठी विशेषत्वाने हितकर असतात. काळ्या मनुकाही शुक्रधातूसाठी उत्तम असतात. द्राक्षे मीठ विरघळवलेल्या पाण्यात सुमारे एक तास भिजत घालावीत, नंतर वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवावीत व मगच वापरावीत. तीव्र रासायनिक औषधे घ्यावी लागत असतील तर त्यामुळे शरीरात साठणाऱ्या विषद्रव्यांचा निचरा होण्यासाठी सेंद्रिय द्राक्षांच्या पाव कप रसात दोन चिमूट बडिशेप पूड, दोन चिमूट धण्याची पूड टाकून घेण्याचा फायदा होतो. रेडिएशन, केमोथेरपी वगैरे उपचार चालू असताना सुद्धा याप्रकारे द्राक्षांचा रस घेण्याने शरीरदाह, हातापायांची जळजळ वगैरे त्रास कमी होतात, शरीरशक्ती टिकून राहते.

शहाळे

शहाळे तसेच नारळ ही फळेही उन्हाळ्यात नित्य सेवन करण्यास उत्तम असतात. ‘बृंहणस्निग्धशीतानि बल्यानि मधुराणि च ।...चरक सूत्रस्थान’ नारळ पौष्टिक, स्निग्ध गुणाचे, शीत वीर्याचे व गोड चवीचे असते, बल्य म्हणजे शरीरशक्ती वाढविणारे असते. विशेषतः शहाळ्याचे पाणी शरीरात चटकन शोषले जाते. तहान शमत नसल्यास उष्णतेने लघवीचा दाह होत असल्यास, शरीरात कोठेही जळजळ होत असल्यास शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम असते. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी शरीर-मनाची तगमग होते अशा वेळी चहा-कॉफीऐवजी शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम होय. उन्हाळ्याच्या दिवसात नारळाचे दूध, ओले नारळ यांचा स्वयंपाकात नियमित वापर करणेही उत्तम असते. लिंबू व रातांबा लिंबू बाराही महिने मिळत असले तरी उन्हाळ्यात ते विशेष उपयोगी असते. उन्हाळ्यामध्ये भूक न लागणे, पचन मंदावणे, पित्त वाढल्याने जुलाब होणे वगैरे तक्रारी उद्भवू शकतात. लिंबू आंबट चवीचे असल्याने रुचकर असते, भूक वाढवते, दीपक, पाचक, अनुलोमक गुणाचे असल्यामुळे पचन सुधरवते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आहारात लिंबाचा नियमित समावेश असू द्यावा. शिवाय साखर, मीठ, जिऱ्याची पूड टाकून केलेले लिंबाचे सरबत उन्हाळ्यामध्ये शरीरातील जलांश टिकवून ठेवण्यास मदत करते. लिंबाप्रमाणेच उन्हाळ्यात कोकम (रातांबा) हे फळही उपयुक्त असते. उन्हाळ्यात तयार होणाऱ्या ओल्या, ताज्या फळाचे सरबत चवदार तर होतेच, पण उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास होण्यास प्रतिबंध होतो.

डाळिंब

‘मधुरं पित्तनुत्तेषां पूर्वं दाडिममुत्तमम्‌ ॥...चरक सूत्रस्थान’ गोड चवीचे डाळिंब पित्तशामक असते. उन्हाळ्यात गोड डाळिंबाचा रस तृप्तीकर तर असतोच पण उष्णतेचे निवारण करण्यासाठीही उत्तम असतो. उन्हामुळे पित्त वाढून डोके दुखत असल्यास, मळमळत असल्यास, खडीसाखर घातलेला डाळिंबाचा रस घोट घोट घेण्याचा उपयोग होतो. तहान फार लागत असल्यास व लघवी उष्ण होत असल्यासही डाळिंबाचा रस थोडा थोडा घेण्याने बरे वाटते.

खरबूज व कलिंगड

हनुमानजयंतीला आपल्याकडे खरबूजाचा प्रसाद दाखविण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यातील उष्णतेचा प्रतिकार करण्यासाठी खरबूज तसेच कलिंगड ही दोन्ही फळे उत्तम असतात. त्वचेचा दाह होत असल्यास कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग वाटून अंगाला लावण्याचा उपयोग होतो. खरबूज खाण्याने लघवीला साफ होते, थकवा कमी होतो, शरीरातील उष्णता कमी होते.

अंजीर

अंजीर हे फळही उन्हाळ्यात तयार होते. चवीने गोड व वीर्याने शीत असणारे अंजीर शरीरपोषक असते, हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करते. उष्णतेपाठोपाठ येणाऱ्या कोरडेपणामुळे शरीरातील रसधातू क्षीण होणे स्वाभाविक असते. क्षीण रसधातूमुळे जीभ सुकते, तोंड कोरडे पडते, काही करू नये असे वाटते. अशा वेळी अंजीर खाण्याचा चांगला उपयोग होतो.

मोसंबी

गोड मोसंबीचा रस वीर्याने शीत तसेच सत्वर तृप्ती देणारा असतो. उन्हाळ्यामध्ये जास्त घाम येऊन शरीरातील जलांश कमी होतो, याचा परिणाम रसधातूवर होऊन थकवा, अनुत्साह जाणवू शकतो. अशा वेळी गोड मोसंबीचा रस घेणे उत्तम असते. विशेषतः दुपारच्या वेळी चहा-कॉफीसारखे गरम पेय घेण्याऐवजी मोसंबीचा रस घेणे चांगले.

ऊस

ऊस चवीला गोड, वीर्याने शीत, गुणाने स्निग्ध, पौष्टिक, शुक्रवर्धक व कफवर्धक असतो. या सर्व गुणांमुळे उन्हाळ्यातील उष्णतेचे निवारण करण्यासाठी तसेच शरीरशक्ती टिकविण्यासाठी ऊस दातांनी चावून खाणे सर्वांत चांगले. उसाचा रस काढायचा असला तर उसाचे मूळ, शेंडा, साल वगैरे बाजूला करून, ऊस स्वच्छ धुवून मगच चरकात टाकून रस काढावा. उसाच्या पेरांवर असलेले कडक आवरण काढल्याशिवाय किंवा नीट स्वच्छता न ठेवता काढलेला रस मात्र विदाही म्हणजेच दाह करणारा ठरू शकतो, असेही चरकाचार्य सांगतात. अशा प्रकारे उन्हाळ्यात निसर्गाने भरभरून दिलेल्या फळरूपी वरदानाचा युक्तिपूर्वक उपयोग करून घेतला तर त्यामुळे उन्हाला सुसह्य होईलच, शिवाय आरोग्यही टिकून राहण्यास हातभार लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com