Diet : क्रेझ डाएटची

काही गडबड झाली का असे मी तिला विचारले. ती म्हणाली, मी सध्या स्पेशल
Diet
Dietsakal

(भाग १)

डॉ. मालविका तांबे

लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा मनात संभ्रम उत्पन्न झाला तो असा की, क्रेझ डाएटची आहे की डाएट क्रेझी आहे का लोक सध्या डाएटच्या मागे क्रेझी झालेली आहेत? मागच्या आठवड्यात माझ्या काही मैत्रिणींबरोबर बाहेर जेवायला जाण्याचा बेत ठरला. मी पोचले तेव्हा माझी एक मैत्रीण सर्व्हरबरोबर गहन चर्चा करण्यास दंग होती. साधारण ७-८ मिनिटांनंतर तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरले व तो सर्व्हर तेथून निघून गेला.

काय झाले, काही गडबड झाली का असे मी तिला विचारले. ती म्हणाली, मी सध्या स्पेशल डाएटवर आहे. त्या डाएटमध्ये ज्या गोष्टी खाल्लेल्या चालतात त्या वापरून हे लोक मला कसा चांगला पदार्थ करून देतील याबद्दल मी त्याच्याशी चर्चा करत होते. हे ऐकल्यावर पुढचे दोन तास मैत्रिणींचा चर्चेचा विषय डाएट हाच होता. असे एक नव्हे तर कित्येक प्रसंग माझ्यासमोर झालेले आहेत.

पूर्वी साधारण घरात काय चाललेले आहे, कपडे, कामाचे स्वरूप, दागिने यावर चर्चा होत असत. पण सध्या चार लोक जमले की चर्चेचा मुख्य विषय असतो तो म्हणजे डाएट. सोशल मीडियावरही जगभरातील आहारतज्ज्ञ आहाराच्या संकल्पना सांगताना दिसतात. एखाद्या पदार्थाबद्दल एक आहारतज्ज्ञ खूप चांगल्या गोष्टी सांगतो, त्या पदर्थाची वाखाणणी करतो, तर त्याच पदार्थाबद्दल दुसरा आहारतज्ज्ञ तो आहार आपल्यासाठी कसा वाईट आहे हे पटवून देण्याच्या प्रयत्नात असतो. गंमत म्हणजे दोन्हींच्या मागे कुठल्यातरी संशोधनाचा आधार दिलेला दिसतो.

Diet
Gout Diet : सांधेदुखीला पळवून लावणारं Gout Diet काय आहे?

डाएट या शब्दाचा साधा सरळ अर्थ आहे आहार. आहार कसा असावा तर तो शरीराला पोषण देणारा असावा, हे आपल्याला सर्वसाधारणपणे सांगण्यात येते. आयुर्वेदात तर आहाराला ‘महाभैषज्य (श्रेष्ठ औषध)’ असे म्हटलेले आहे. याचाच अर्थ आहाराचा उपयोग औषधासारखा करता येऊ शकतो. आहारामुळे शरीराची वृद्धी होते, शक्ती मिळते, आरोग्य मिळते, वर्ण सुधारतो, इंद्रियांची कार्यक्षमता वाढते, मनुष्य आनंदी राहतो असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. आहारात आलेली विषमता अस्वास्थ्याकडे घेऊन जाते. आहाराबद्दल आयुर्वेदात सखोल मार्गदर्शन केलेले आढळते. ते जाणून घेण्यापूर्वी आहाराशी किंवा डाएटसंबंधी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.

डाएट फक्त वजन कमी करण्यासाठी नसते. शरीराला सर्व पोषकत्तत्वे कशी मिळतील याचा विचार करून डाएटचे नियोजन करावे. आरोग्य नीट ठेवण्याच्या दृष्टीने डाएटचे नियोजन केले तर बऱ्याच चुका टाळता येतात.

डाएटचे नियोजन करताना शरीरातील अग्नीचा, प्रकृतीचा विचार करावा. वातप्रकृती असणाऱ्या व्यक्तीची भूक व त्याच्या आहारासंबंधी गरजा पित्तप्रकृती असणाऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळ्या असू शकतात.

भूक लागलेली असता व्यवस्थित आहार पोटात गेला नाही तर शरीराचे क्षरण होण्याची शक्यता असते.

आहार नेहमी संतुलित असावा. सध्या बऱ्याच व्यक्ती फॅशनच्या आहारी जाऊन फक्त सॅलड खाण्यात आपले इष्ट आहे असे समजतात व कमीत कमी कॅलरी असलेले अन्न घेतात. यामुळे मनाला बरे वाटले व तात्पुरते वजन कमी झाले तरी नंतर याचे दुष्परिणाम होताना दिसतात.

Diet
Illness Facts- Healthy Diet आणि व्यायाम करूनही सतत आजारी पडताय? मग हे असू शकतं कारण...

रोज निघणाऱ्या नवीन नवीन फॅडस् च्या मागे न लागता विचारपूर्वक आपला स्वतःचा आहार ठरविणे योग्य असते. यासाठी आयुर्वेदातील नियम आपण समजून घेऊ या.

आहार षड्रसयुक्त असावा म्हणजे तो मधुर, अम्ल, लवण, कटु, तिक्त, कषाय या सहाही रसांनी युक्त असावा. शरीराला प्रत्येक रसाची गरज उतरत्या क्रमात आहे हे लक्षात घ्यावे म्हणजे शरीराला मधुर रसाची आवश्यकता सर्वांत जास्त असते तर कषाय रसाची कमीत कमी. सध्या अनेक जण मधुर रसाला घाबरून असतात. मधुर रस म्हणजे फक्त साखरेचा किंवा गुळाचा गोडवा नव्हे, तर धान्य, फळे, बऱ्याच भाज्या मधुररसप्रधान असतात. आहारातील मधुर रस कमी करून कटु, तिक्त, कषाय रसाला सध्या प्राधान्य दिले जात आहे, त्यामुळे शरीरातील वीर्यशक्ती कमी होत चाललेली आहे. हे सहाही रस योग्य त्या प्रमाणात आहारात असावेत याची काळजी घ्यावी.

आहारात चावून खाण्यासारखे भक्ष्य पदार्थ, गिळून टाकण्यासारखे भोज्य पदार्थ, चाटण्यासारखे लेह्य पदार्थ, गिळण्यासारखे पेय पदार्थ नक्की असावे.

सध्या आहारातील कोरड्या अन्नाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. यामुळेही शरीरात वातादी दोष असंतुलित होण्याचे प्रमाण वाढताना दिसते.

तत्रेदमाहारविधिविधानमरोगाणामातुराणां चापि केषांचित् काले प्रकृत्यैव हिततमं भुञ्जानानां भवति – उष्णं स्निग्धं मात्रावत् जीर्णे वीर्याविरुद्धम् इष्टे देशे इष्टसर्वोपकरणं नातिद्रुतं नातिविलम्बम् अजल्पन् अहसन् तन्मना भुञ्जीत आत्मानमभिमसमीक्ष्य सम्यक् ।।

आहार नेहमी गरम, ताजा असावा. तसेच त्यात स्निग्धता असावी. सहज पचेल एवढ्याच प्रमाणात आहार घ्यावा. पहिले अन्न पचल्यावरच पुढचे अन्न सेवन करावे. विरुद्धान्न खाऊ नये. चांगल्या जागी बसून खावे. फार भरभर नाही फार हळू हळू नाही असे जेवावे. न बोलता, न हसता जेवावे. सध्या ताजे व गरम अन्न मिळणे दुरापास्त झालेले आहे. गोठविलेले अन्न, तयार (रेडी मेड) अन्न खाण्याकडे कल वाढत चाललेला आहे. वाढत्या वयाची मुले तर सतत फास्ट फूड खात असतात. हे अन्न कुठे तरी बऱ्याच दिवसांआधी तयार झालेले असते,

मायक्रोवेव्हसारख्या चुकीच्या उपकरणात ठेवून गरम करून खाल्ले जाते. अशा प्रकारचा आहार वीर्यासाठी अजिबात पोषक नसतो. आहार जेवढा ताजा व गरम असेल तेवढा शरीराला अधिक फायदा होतो.

Diet
Navratri Diet Chart : नवरात्रीला फॉलो करा 'हा' डाएट प्लान, ९ दिवसांत एक किलोसुद्धा वाढणार नाही वजन

आहार स्निग्ध असावा. स्निग्ध म्हटले की लोकांच्या मनात भीती बसते. तेल-तूप जास्त प्रमाणात खाल्ले तर वजन वाढणार नाही का, स्वास्थ्य नीट कसे राहील असे अनेकांना वाटते. आहार स्निग्ध असणे म्हणजे तो तेलकट वा तुपकट असणे नव्हे. थोड्या प्रमाणात तूप व तेल शरीरासाठी आवश्यक असते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

भाज्यांमधील पोषक तत्त्वे टिकवून ठेवण्यासाठी, भाज्या नीट शिजण्यासाठी तेलाची वा तुपाची फोडणी दिली नसेल तर त्यातील महत्त्वाची घटकद्रव्ये आपल्या शरीरापर्यंत पोचत नाहीत. गंमतीचा भाग म्हणजे तेल व तूप वर्ज्य केले जाते पण बाहेर जाऊन मेओनिज् टाकलेले बर्गर, सॅलडस्, प्रोसेस्ड चीज टाकलेला पिझ्झा, भरपूर सॉल्टेड बटर लावलेले सॅँडविच खायला यांची ना नसते. तसेच शेव-चिवड्यासारखे पारंपरिक पदार्थ थोड्या तेलात तळलेले असायचे ते आता बेक्ड खाण्याची पद्धत सुरू झालेली आहे. मात्र भेळ, पाणीपुरी, ज्यातील बहुतेक गोष्टी तेलात तळलेल्या असतात, त्या खाताना भीती वाटत नाही.

डाएटचे पालन करत असताना अशा प्रकाराच्या विरोधाभासाच्या आहारी तर आपण जात नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे. घरी केलेले साजूक तूप, ताजे लोणी, चांगल्या प्रतीचे तेल योग्य प्रमाणात आहारात असल्याचा निश्र्चितच फायदा होतो.

प्रत्येक व्यक्तीची आहाराची मात्रा त्याच्या शरीरातील अग्नी व प्रकृतीनुसार निर्धारित असते. आचार्य सुश्रुत व वाग्भटांनी सांगितलेले आहे की पोटाचे चार भाग कल्पून दोन भाग घन आहार, एक भाग द्रवाहार, घेऊन बाकीचा भाग वाताच्या चलनवलनासाठी मोकळा ठेवणे आवश्यक असते. पोटाला तडस लागेपर्यंत जेवण केले तर नंतर पचनाला त्रास होतो हा आपल्या सर्वांचा अनुभव असतो. मिक्सरमध्ये कुठलीही गोष्ट बारीक करत असताना मिक्सर पूर्ण भरून चालत नाही, काही भाग मोकळा ठेवावाच लागतो, तसे आपल्या पोटात थोडी जागा मोकळी ठेवली नाही तर पचनाला त्रास होऊ शकतो.

(क्रमशः)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com