Health Care News : जिवाणू आणि कृमींचा धुमाकूळ

काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे दवाखान्यात सौ. पांढरे, वय ५७ वर्षे, अंगावर खूप खाज असल्यामुळे दाखवायला आल्या.
Bacteria
Bacteriasakal

- डॉ. मालविका तांबे

काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे दवाखान्यात सौ. पांढरे, वय ५७ वर्षे, अंगावर खूप खाज असल्यामुळे दाखवायला आल्या. बरेच महिने निरनिराळे इलाज करून, गोळ्या-औषधे घेऊही त्यांना हवा तसा परिणाम मिळत नव्हता. त्या रडायलाच आल्या होत्या. म्हणाल्या, ‘‘ही खाज बंद झाली नाही तर मी आत्महत्येचा विचार करते आहे, कारण खाज येत असल्यामुळे मला रात्रंदिवस झोप येत नाही, आराम करता येत नाही, खाजवून खाजवून मी स्वतःला रक्तबंबाळ करते.’

त्यांच्या स्वास्थ्याचा इतिहास पाहिला, नाडीपरीक्षण केले आणि निदान करून त्यांना काही औषधे दिली. औषधांमध्ये विडंगारिष्ट हे नाव त्यांच्या ओळखीचे होते. ते पाहून त्या म्हणाल्या, ‘डॉक्टर मी काही लहान नाही, मला विडंगारिष्ट का देता आहात?’ मी त्यांना म्हटले, ‘तुमच्या त्रासासाठी तुम्हाला विडंगारिष्ट व अन्य जंतुघ्न गोष्टी दिलेल्या आहेत.’ साधारण २-३ महिने औषधे घेतल्यानंतर त्यांना बराच फरक जाणवू लागला, नियमितपणे घ्यायच्या गोळ्या घ्यायची गरज कमी झाली होती. त्यामुळे अशी काय औषधे दिली की ज्यामुळे त्रास कमी झाला याचे मनात कुतूहल उत्पन्न झाले.

मी त्यांना सांगितले की खरे पाहता मी तुमच्या त्वचेवर फार काम न करता कृमींवर काम केलेले आहे. यापूर्वी त्वचेवर काम केल्यामुळे तुमचा त्रास कमी होत नव्हता. त्यांना फार आश्र्चर्य वाटले, म्हणाल्या, ‘अहो डॉक्टर माझे वय काय, मी आज आजी आहे. मला कसे कृमी होतील, ते तर लहान मुलांना होतात.’ त्यांना समजावून सांगितले की जंतुसंसर्ग ही अशी गोष्ट आहे की जो वय, देश, काल, लिंग, जात वगैरे कशाचाही विचार न करता कोणालाही होऊ शकतो.

आयुर्वेदात कृमी हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो. सगळ्या प्रकारचे जिवाणू, विषाणू, जंत, कृमी हे सर्व कृमीरोगांतच मोडतात. कृमींमुळे खूप प्रकारचे आजार, संक्रमण होतात. आयुर्वेदामध्ये याबाबत सखोल मार्गदर्शन मिळते. कृमींची उत्पत्ती म्हणजे कृमी कोठे असतात तर ते सर्व विश्र्वाला व्यापून असतात. पाणी, हवा, वनस्पती, सगळ्या प्रकारचे पशू तसेच सगळ्या प्रकारच्या अधिवासांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कृमी पाहायला मिळतात.

कृमी होण्याची कारणे

‘अजीर्णभोजी मधुराम्लसेवी द्रवप्रियः पिष्टगुडोपभोक्ता। व्यायामवर्जी च दिवाशयी च विरुद्धभोक्ता लभते क्रिमींश्र्च॥’’ कृमीरोग होण्याच्या कारणांचा विचार केला तर आयुर्वेदात सांगितलेले सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आधी खाल्लेल्या अन्नाचे पचन झालेले नसताना पुन्हा अन्न खाणे. त्याचबरोबरीने वारंवार होणारे अपचन, अति प्रमाणात गोड व आम्ल पदार्थांचे सेवन, अशुद्ध गूळ खाणे, फार जास्त प्रमाणात जलीय मांस म्हणजे मासे वगैरे खाणे, दिवसा झोपणे, व्यायाम न करणे, आहाराचे नियम न पाळणे, कुठले अन्न किती वेळ शिजवायला हवे याचे म्हणजे पाककृतींचे पालन न करणे, मांस व्यवस्थित न शिजवणे, भाज्या, फळे न धुता सेवन करणे, स्वयंपाक करताना स्वच्छतेचे पालन न करणे, हाताची नखे कापलेली नसणे, बाहेरून घरात आल्यावर हात-पाय धुता खायला-प्यायला घेणे, अशुद्ध पाणी पिणे ही मुख्य कारणे असतात. त्याचबरोबरीने शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाली तरी असा प्रकारचा त्रास होताना दिसतो. बाहेरचे पदार्थ खूप प्रमाणात खाण्यात असणे, झोपेच्या वेळा व्यवस्थित नसणे, खूप प्रमाणात प्रवास होणे, प्रदूषण वाढल्यामुळे शुद्ध हवा व शुद्ध पाण्याचा अभाव वगैरे अनेक कारणांमुळे जंतूंचा प्रादूर्भाव सगळीकडे वाढत चाललेला आहे.

जंत / कृमी असल्याची लक्षणे - ‘ज्वरो विवर्णता शूलं हृद्रोगश्छर्दनं भ्रमः। भक्तद्वेषोऽतिसारश्र्च सञ्जातक्रिमिलक्षणम्।।...योगरत्नाकार.’ सगळ्यात महत्त्वाचे लक्षण म्हणजे ताप येणे, अधून मधून वा कायम पोट दुखणे, पोट दुखण्याचे प्रमाण संध्याकाळी वा रात्री जास्त असणे, भूक कमी लागणे, भूक लागली तरी अन्न अंगी न लागणे, असलेले वजन कमी होणे, पातळ मलत्याग, गुदभागी खाज येणे, रात्री झोपेत दचकणे किंवा दात खाणे, त्वचेवर वा गालावर पांढरे चट्टे येणे, शरीरावर खाज वा पुरळ येणे, डोके दुखणे, चेहऱ्यावरील तेज कमी होणे, उलट्या होणे, हृदयप्रदेशी दुखणे, उत्साह न वाटणे, चिडचिड होणे वगैरे लक्षणे जंत असल्याची असू शकतात.

कृमींचे प्रकार - आयुर्वेदात सर्वसाधारणपणे २० प्रकारच्या कृमीचे वर्णन मिळते व त्यांचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण केलेले आहे.

1. बाह्य कृमी - बाहेर दिसणाऱ्या कृमींना बाह्य कृमी म्हटले जाते. बाह्य कृमी केसांत, त्वचेवर, कपड्यांमध्ये, पापण्यांमध्ये दिसतात. बरेच दिवस स्नान न करणे, कपडे न धुणे, केस न धुणे, स्काल्प साफ न करणे, दूषित गोष्टींच्या व कृमींचा संसर्ग असलेल्यांच्या संपर्कात राहणे वगैरेंमुळे बाह्य कृमी होताना दिसतात.

2. आभ्यंतर कृमी - जे कृमी शरीराच्या आत जाऊन त्रास देतात त्यांना आभ्यंतर कृमी म्हटले जाते. आभ्यंतर कृमी वेगवेगळ्या प्रकारचे असतात.

कफज कृमी - हे आमाशयात तयार होतात. याचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहे. उदा. आंत्रदा, उदरदा, हृदयचरा, महागुद दुरुना इत्यादी. हे कधी लांबट, कधी छोटे असतात. कधी पातळ असतात, चपटे असतात. हे कृमी साधारणपणे गांडुळाच्या आकाराचे असतात. कधी पारदर्शक असतात, तर कधी पांढरे व तांब्यासारख्या रंगाचे असतात. यामुळे मळमळणे, खूप ढेकर येणे, वजन कमी होणे, तसेच ताप, उलटी वगैरेंसारखी लक्षणे दिसू शकतात.

रक्तज कृमी - केशदा, लोमदा, उदुंबरा, कुष्ठज, परिसर्प वगैरे याचे प्रकार असतात. हे कृमी अत्यंत सूक्ष्म असतात, डोळ्यांना दिसत नाहीत, तसेच रक्त वाहून नेणाऱ्या शिरांमध्ये असतात. यामुळे त्वचेवर लाल चट्टे येणे, कोरडेरणा येणे, छोट्या छोट्या जखमा होणे, केस व रोम झडणे, टक्कल पडणे, पूयुक्त फोड होणे, शरीरामध्ये मांस, शिरा व स्नायू यांची झीज होताना दिसते.

पुरीषज कृमी - पक्वाशयात (कोलोन) राहणाऱ्या कृमींना पुरीषज कृमी म्हटले जाते. हे सहसा डोळ्याला दिसणाऱ्या आकाराचे असतात. या कृमींना आचार्यांनी द्विमुखा, काकेरुका, सशुलका इत्यादी नावे दिलेली आहेत. अशा लोकांच्या मळाला फार घाण वास येतो, तसेच मळ पातळ होण्याची प्रवृत्ती दिसते. अशा लोकांच्या चेहऱ्यावर तेज दिसत नाही, तसेच मलत्यागाच्या वेळी गुदभागी वेदना किंवा कंड येताना दिसते. काही वेळा मलाबरोबर कृमी बाहेर पडतानाही दिसतात. कृमी फार प्रमाणात वाढल्यास वर पोटाकडेही येतात.

कृमीरोगाबद्दलची आणखी माहिती आणि त्यावर घरी व वैद्यांकडून करता येतील असे उपाय पुढच्या भागात बघू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com