नको हा थकवा

'अहो डॉक्टर, आजार म्हणावा असा काही नाही, पण सकाळी उठले की अंग जड असल्याचे जाणवते. झोप नीट झाली असली तरी थकल्यासारखे वाटते.
fatigue
fatiguesakal

- डॉ. मालविका तांबे

'अहो डॉक्टर, आजार म्हणावा असा काही नाही, पण सकाळी उठले की अंग जड असल्याचे जाणवते. झोप नीट झाली असली तरी थकल्यासारखे वाटते. काहीही काम करायची इच्छा नसते, परत झोपावे असे वाटते, कुठल्याही गोष्टीत मन रमत नाही. सगळ्या तपासण्या नॉर्मल आहेत, डॉक्टर म्हणतात की तुम्हाला (नैराश्य) डिप्रेशन आलेले आहे. पण घरीही सगळे व्यवस्थित आहे' अशी तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

कुठलेही काम न करता येणारा अशा प्रकारचा थकवा आजच्या काळात ‘फटिग’ म्हणून ओळखला जातो. आयुर्वेदामध्ये थकव्याकरिता क्लम, ग्लानी वगैरे शब्दांचा वापर केला आहे.

अनायास जनिताश्रमाः क्लमः म्हणजे काही काम न करता येणारा थकवा याला क्लम म्हटले जाते.

कारणे - सध्याच्या काळात असा त्रास जास्त होण्यामागे झोपेचा अभाव, कामाच्या वेळा बदलणे, जेवणाच्या वेळा बदलणे, कुठल्याही गोष्टीचा मानसिक ताण जास्त प्रमाणात असणे, सततची धावपळ, सध्या असलेल्या अति स्पर्धेमुळे नैराश्यग्रस्त, चिंताग्रस्त असणे ही कारणे मुख्यत्वे आढळतात. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की रस वगैरे धातूंना पोषण न मिळाल्यास आलेला थकवा हा क्लम असतो. अर्थातच धातुपोषण नीट न झाल्यास शरीरात वातवृद्धी होते.

आहार - क्लम दूर करण्यासाठी शारीरिक स्तरावर विचार केला तर शरीराचे पोषण व्यवस्थित होणे गरजेचे आहे. म्हणजे रस-रक्त-मांस-मेद-अस्थी-मज्जा-शुक्रापर्यंत सातही धातू व्यवस्थित तयार होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सर्वप्रथम आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. आहारामध्ये दूध, तूप, लोणी वगैरेंसारख्या धातुपोषक गोष्टींचा नक्की समावेश असावा.

शक्य झाल्यास ताजे दूध तापवून त्यात संतुलन शतावरी कल्प किंवा संतुलन शतानंत कल्पासारखा कल्प घालून घ्यावा. आहार सुपाच्य असावा. आंबट, गोड, तिखट, व खारट जेवण अशा प्रकारचा थकवा कमी करायला मदत करते. आहार संतुलित असावा व यात वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, मोसमी फळे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्ये, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, तृणधान्ये वगैरेंचा समावेश नक्की असावा.

कधीतरी व्यवस्थित पचन न होणे किंवा पचन झाल्ल्यावर त्याचे नीट शोषण न होणे हे पोषणाच्या विरुद्ध जाऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदानुसार काळी मिरी, सुंठ, हिंग, पिंपळीसारखी दीपन व पाचन औषधे घेणे गरजेचे असते. तसेच रसायनांचा वापर केलेला चांगला. अश्र्वगंधा, गुडूची, पुनर्नवा, अर्जुन, हरीतकी, बला, आवळा वगैरे वनस्पतीपासून बनविलेली वेगवेगळी रसायने घेता येऊ शकतात. उदा. आमलकी रसायन, ब्राह्म रसायन, च्यवनप्राश, संतुलन आत्मप्राश, धात्री रसायन वगैरेंसारखी रसायने घेणे उत्तम.

थकव्यावर घरगुती उपाय म्हणून ताज्या फळांचा रस, आले व चिमूटभर जिरे पूड टाकून लिंबाचे सरबत घेण्याचा फायदा होताना दिसतो. इच्छा असल्यास आल्याचा रस-लिंबाचा रस-मध यांचे मिश्रण काचेच्या बाटलीत करून ठेवावे व दिवसभरात थोडे थोडे घेतल्यास फायदा मिळू शकतो. व्यवस्थितपणे संस्स्कारित केलेले हळद-दूध सुद्धा याकरता उत्तम ठरते. कोकम सरबत किंवा कोकम आहारात ठेवल्यास फायदा मिळू शकतो.

अभ्यंग - वातशमनाकरता आठवड्यातून दोन-तीनदा आयुर्वेदिक वनस्पतींनी सिद्ध केलेले संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल रोज रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण शरीराला वरून खाली हलक्या हाताने लावावे, हे तेल कोमट केलेले असले तर अधिक फायदा होतो. यानंतर पंख्याखाली किंवा एसीखाली झोपणे टाळावे.

मानसिक थकवा - हा थकवा बऱ्याचदा केवळ शारीरिक नसून मानसिकही असतो. धकाधकीचे जीवन, नकारार्थी विचार, एकटे राहावे असे वाटणे, स्वतःच्या निर्णयांबद्दल ठाम नसणे, हा सुद्धा थकव्याचा एक प्रकार असू शकतो. याकरता सगळ्यात उत्तम ठरतात योगासने व स्वास्थ्यसंगीत.

थकवा यायला लागला की बहुधा व्यायाम टाळला जातो. शरीरात शक्ती नाही त्यामुळे व्यायाम नाही आणि व्यायाम नाही त्यामुळे मरगळ वाटत राहते. अशा प्रकारे थकव्याच्या चक्रव्यूहातून बाहेर येणे अवघड जाते. पण रोज नियमाने योगासने करण्याने शरीर हलके वाटते. यामुळे शरीरात रक्ताभिसरण वाढून संपूर्ण धातुपोषणाला मदत होते.

त्यामुळे कितीही व्यस्तता असली तरी योगासने व व्यायाम नक्की करावा. त्यातल्या त्यात सूर्यनमस्कार, संतुलन क्रियायोगातील वेगवेगळ्या प्रकारच्या भस्त्रिका, दीर्घश्र्वसन, ॐकार गूंजन वगैरे नियमितपणे करण्याची शारीरिक व मानसिक अशा दोन्ही स्तरांवर मदत मिळते.

तसेच श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे स्पिरीट ऑफ हार्मनी किंवा योगनिद्रासारखे स्वास्थ्यसंगीत रात्री झोपताना ऐकणे उत्तम ठरते. रोज आहार खाल्ल्यानंतर जसा आपण रोज मलत्याग करतो तसे मनात येणाऱ्या चुकीच्या विचारांचा निचरा व्हायला अशा प्रकारचे स्वास्थ्यसंगीत ऐकल्यास मदत होते.

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे नेहमी म्हणत असत की, श्रद्धा कमी होत गेली की नकळत अनारोग्याकडे वाटचाल होत जाते. आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा ठेवत नाही तेव्हा होणाऱ्या वैचारिक संघर्षामुळे शरीरातील व मनातील उत्साह कमी होत जातो, अशा प्रकारचा थकवा व ग्नानी यायला कारणीभूत असू शकतो.

त्यामुळे उगाचच प्रत्येक गोष्टीच्या विरोधात जाण्यापेक्षा आपण जेवढा समर्पणभाव ठेवू, जेवढा स्वीकृतीभाव ठेवू, तेवढा त्रास कमी व्हायला मदत मिळते. श्रद्धा वाढवण्याकरता ध्यान, आराधना, स्तोत्र म्हणणे वगैरेंचा फायदा मिळू शकतो.

प्राणायाम - नियमित प्राणायाम करणे हे थकवा कमी करण्यासाठी उत्तम ठरते. शरीरात प्राणवायूचा पुरवठा व्यवस्थित झाला तर शरीरातील सर्व चयापचय क्रिया नीट व्हायला मदत मिळते. चयापचय क्रिया नीट झाल्या तर शरीरात धातुपोषण व्यवस्थित होऊ शकते तसेच नकारात्मक मानसिकता होण्याची प्रवृत्ती कमी व्हायला मदत मिळते.

इतर कारणे - सध्याच्या काळात आहाराच्या बाबतीत चुका होत असल्यामुळे हिमोग्लोबिन कमी असणे, कॅल्शियम कमी असणे, जीवनसत्त्वे, मुख्यत्वे बी १२ व डी, कमी असणे हेही थकवा येण्यामागचे कारण असते असे आढळून येते आहे. त्यामुळे तपासणी करून घेऊन जी गोष्ट शरीरात कमी पडत असेल तिची पूर्ती करण्याची योजना करावी.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या साखर नको हा एक मोठा युक्तिवाद सगळीकडे पसरलेला आहे. साखर खाणे टाळणे हेही अशा प्रकारच्या थकव्याला कारणीभूत ठरते असे दिसते. आपल्या पेशींना साखर पटकन पचवता येते. त्यामुळे संतुलित आहारात योग्य प्रमाणात साखरेचा वापर करणेच इष्ट.

घरी असताना स्वतःच्या हातातील मोबाईल, टीव्ही रिमोट, टॅबलेट वगैरे बाजूला ठेवावे. थकवा येण्यामागे फार वेळ स्क्रीनवर नजर लावून बसणे हेही एक कारण आहे. याऐवजी स्वतःच्या परिवाराबरोबर गप्पा मारणे, एखादा खेळ खेळणे, गाणी म्हणणे, घरातील एखादे छोटे-मोठे काम सगळ्यांना मिळून करणे हेही थकव्यापासून चार हात दूर राहण्यासाठी मदत करू शकते.

झोपण्यापूर्वी संतुलन पादाभ्यंग घृताने काशाच्या वाटीने तळपायांना पादाभ्यंग करणे उत्तम. तसेच संतुलन ब्रह्मलीन सिद्ध तेलासारखे तेल टाळूवर लावणे मदत करू शकते.

वाढत्या वयाबरोबर शरीराची शक्ती कमी होणे स्वाभाविक आहे. पण कमी वयात थकवा जाणवणे ठीक नव्हे. त्यामुळे शरीराची ताकद नीट राहायला, मानसिकता खंबीर राहण्याच्या दृष्टीने आणि युवावस्था टिकवून ठेवायला संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेणे अत्यंत उत्तम. पंचकर्मानंतर रसायनांचे सेवन केले गेले तर शरीराची ताकद वाढते व शरीरातील सर्व धातूंचे पोषण होऊन सर्व प्रकारचे त्रास कमी व्हायला मदत मिळते.

आयुष्य खऱ्या अर्थाने जगायचे असेल तर आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदात सांगितलेले आहे की मन प्रसन्न असले, शरीरात लघुता असली, चांगली झोप येत असली, सगळ्यांबरोबरची वागणूक चांगली असली, इंद्रिये काम करायला तयार असली व मुख्य सकाळी आपोआप जाग येत असेल, जाग आल्यावर ताजेतवाने वाटत असेल तर ते स्वस्थ आयुष्याचे लक्षण होय. त्यामुळे थकवा वाटत असला तर दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा नकळत असलेला आजार बरा करण्याकरता नक्की प्रयत्न करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com