पाणी हेच जीवन...

मीटिंग सुरू असताना एका सहकाऱ्याच्या मोबाइलमधून पाणी ग्लासमध्ये ओतल्याचा आवाज आला. त्याने दिलगिरी व्यक्त करून हा आपला पाणी पिण्याचा अलार्म असल्याचे सांगितले.
Water
WaterSakal
Summary

मीटिंग सुरू असताना एका सहकाऱ्याच्या मोबाइलमधून पाणी ग्लासमध्ये ओतल्याचा आवाज आला. त्याने दिलगिरी व्यक्त करून हा आपला पाणी पिण्याचा अलार्म असल्याचे सांगितले.

- डॉ. मालविका तांबे

मीटिंग सुरू असताना एका सहकाऱ्याच्या मोबाइलमधून पाणी ग्लासमध्ये ओतल्याचा आवाज आला. त्याने दिलगिरी व्यक्त करून हा आपला पाणी पिण्याचा अलार्म असल्याचे सांगितले. कामाच्या एकूण ताणामुळे पाणी पिण्याचे लक्षात राहत नसल्याने अशा तऱ्हेची सूचना योजना त्याने आपल्या मोबाइलमध्ये करून ठेवल्याचे सांगितले. खरे तर थोडे आश्र्चर्यच वाटले. मला मान्य आहे, आजचे आयुष्य धकाधकीचे आहे, बऱ्याचशा गोष्टींकडे आपले दुर्लक्षही होते, याची आपल्या सर्वांनाच जाणीवही आहे. पण पाणी, जे ‘जीवन’ आहे, असे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत, ते पिण्याकरिता आठवण करावी लागते?

पूर्वीच्या काळी पाणी पिणे सुद्धा सोपे होते. उकळून गार केलेले स्वच्छ पाणी आई मातीच्या माठात किंवा तांब्याच्या घड्यात भरून ठेवायची. तहान लागली की तेथे जाऊन पाणी प्यायचे. इतके सोपे पाणी पिण्याचे शास्त्र होते. पाण्यावर शाळेत निबंध लिहायला आला तर निरोगी राहण्यासाठी शरीरात ६५ ते ७० टक्के पाणी असणे आवश्यक आहे, सगळी जीवन सृष्टी पाण्यावर अवलंबून आहे, पाण्याचा वापर कसा जपून करावा वगैरे दहा-बारा ओळी लिहिल्या तरी पुरायच्या. पण आज समाजात पाण्याबद्दलचे इतके समज-गैरसमज पसरलेले दिसतात की त्याबद्दलच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक आहे असे मला वाटते.

पिण्याचे पाणी फिल्टर करणे गरजेचे आहे का?

पिण्याचे पाणी शुद्ध असावे हे आयुर्वेदात आवर्जून सांगितलेले आहे. खरे तर तर त्या काळाचा विचार केला तर तेव्हा रासायनिक खते वापरली जात नव्हती, आज आहे इतक्या प्रमाणात प्रदूषण नव्हते तरी पाणी शुद्ध करूनच वापरावे असे सांगितले होते. पाणी शुद्ध करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ते उकळणे. दिवसभरात पिण्यासाठी परिवाराला जेवढे पाणी लागण्याची शक्यता आहे तेवढे पाणी सकाळच्या वेळी १५-२० मिनिटे उकळून गाळून ठेवणे उत्तम. पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, मंजिष्ठा वगैरे वनस्पतींपासून बनविलेले जलसंतुलनसारखे मिश्रण टाकण्याने पाणी पचायला हलके होते, शरीरात शीतलता आणते तसेच अन्नपचनाला सुद्धा मदत करते. सध्या अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या फिल्टर्सचा वापर केला जातो. हे फिल्टर्स पाण्याच्या शुद्धीकरता मदत करू शकले तरी असे पाणी पचायला सोपे होत नाही. अशा पाण्यातील मिनरल्स कमी-जास्त झाल्याने पचनावर विपरीत परिणाम होताना दिसतो. पाणी कठिण (हार्ड) असल्यामुळे फिल्टर वापरण्याला पर्याय नसला तरी फिल्टर केलेले पाणी नंतर उकळण्याची क्रिया नक्की करावी. पचनाबरोबरच प्रतिकारशक्ती चांगली राहावी अशी इच्छा असेल तर पाणी उकळताना त्यात शुद्ध सोन्याचे (२४ कॅरटचे) वेढणे किंवा पत्रा पाण्यात टाकता येतो.

पाणी किती प्रमाणात प्यावे?

प्रत्येकाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वय व प्रकृतीनुसार ठरलेले असते. ते फार कमी वा जास्त होऊन चालत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण फार जास्त वा कमी झाल्यास त्याचा परिणाम चयापचय क्रियेवर होऊन शकतो. त्यामुळे फार कमी वा फार जास्त प्रमाणात पाणी पिणे हे दोन्ही चुकीचे ठरते. पाणी किती प्यावे हे ठरविण्याकरता तहानेकडे लक्ष द्यावे. तहान लागल्यास पाणी पिणे टाळू नये, तसेच तहान लागलेली नसताना मुद्दाम पाणी पिणे टाळावे. तहानेचा वेग आला नसताना पाणी पिल्यास शरीरातील पचनाग्नी मंद होऊ शकतो. प्रत्येकाला रोज अडीच-तीन लिटर पाणी पिणे आवश्यक असते असा आज समाजात असलेला समज बरोबर नाही. प्रकृतीनुसार व बाहेरील वातावरणाच्या तापमानानुसार पाण्याचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते. जी व्यक्ती थंडीच्या दिवसात ५-७ ग्लास पाणी पिते त्या व्यक्तीला उन्हाळ्यात ८-१० ग्लास पाणी लागू शकते. पाणी कधी प्यावे याचेही शास्त्र आहे.

सकाळी रिकाम्या पोटी थोडे पाणी पिणे उत्तम असते. प्रकृतीला मानवत असेल तर कोमट वा गरम पाणी पिणे उत्तम. जेवणादरम्यान २-३ घासांनंतर थोडेथोडे पाणी घेतलेले उत्तम. काही व्यक्ती जेवणात अजिबात पाणी पीत नाहीत व जेवण झाल्यानंतर वा जेवणानंतर एक तासानंतर भरपूर पाणी पितात. याने अपचन होऊन वजन वाढण्यासारखे त्रास होऊ शकतात. ज्याला शक्य असेल त्याने कोमट वा गरम पाणी पिणे उत्तम, जे पचनास मदत करते, भूक वाढवते, घशातील कफ कमी व्हायला, लघवीला साफ व्हायला, गॅसेस कमी व्हायला मदत मिळते, शरीरातील वात व कफाचे संतुलन राहायला मदत मिळते, सर्दी-खोकला-ज्वर वगैरेंमध्ये उपयोग होतो. पित्त प्रकृतीच्या किंवा आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी गरम पाणी पिणे टाळलेलेच बरे.

संस्कारित पाणी

साधे पाणी पिण्याऐवजी फळे वगैरे घालून संस्करित केलेले पाणी पिण्याचा कल सध्या वाढलेला आहे. जास्मिन इन्फ्युज्‍ड वॉटर, लेमन इन्फ्युज्‍ड वॉटर वगैरे तब्येतीसाठी चांगले असते असे आज सांगितले जाते. एका अर्थी हे खरे आहे, कारण पाणी कुठल्याही प्रकारचे गुण स्वतःमध्ये धारण करते. त्यामुळे पाणी औषधासारखे वापरता येते. पचनास मदत करण्यासाठी, लघवीला साफ होण्यासाठी जिरे घालून तयार केलेले पाणी शरीरात औषधासारखे काम करते. तसेच वाळा घालून तयार केलेले पाणी रक्तशुद्धीकरता तसेच लघवी साफ होण्याकरता मदत करते. पण असे संस्कारित पाणी औषधासारखे पिणे आवश्यक असते, ते फार प्रमाणात पिऊन चालत नाही. त्यामुळे वेगवेगळे इन्फ्युज्‍ड वॉटर दिवसभर न पिता एखादा ग्लास घ्यावे कारण नैसर्गिक पाणीच आपल्या शरीराकरता उत्तम असते.

गरमीच्या काळातील पेये

उन्हाळा सुरू झाला की गार पाणी पिण्याकडे कल वाढतो. शक्यतो गार पाणी पिणे टाळावे. माठात गार केलेले पाणी किंवा तांब्याच्या कळशीत नैसर्गिक रित्या गार झालेले पाणी पिणे उत्तम. सध्या बर्फ घालून पाणी पिण्याचा किंवा थंड पेये पिण्याची पद्धत रूढ होत चाललेली आहे. त्यामुळे लहान मुलांमध्येही अपचनाचा त्रास होऊन वजन वाढणे, शरीरात हॉर्मोनल बदल होणे वगैरे त्रास मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेले आहेत.

पन्हे, शहाळ्याचे पाणी, सरबते, वगैरे पेये उन्हाळ्याच्या काळात घेतली जातात पण ती पाण्याऐवजी घेतली आहेत असे न समजता पाणी पाण्याच्या जागी नीट प्यावे, अधून मधून अशा प्रकारची पेये घेतली तर चालू शकते. अशा प्रकारे आयुर्वेदात पाणी पिण्याच्या बाबतीत खूप खोलवर मार्गदर्शन केलेले सापडते. या व्यतिरिक्तही अनेक गोष्टी आहेत की ज्या ऋतू, वय, काळ, आजार वगैरेंनुसार बदलू शकतात. आज समाजात चुकीच्या गोष्टींचा प्रसार-प्रचार चाललेला आहे त्याबद्दल माहिती करून घेऊन मगच त्याचा अवलंब करावा म्हणजे त्यापासून येणारे दुष्परिणाम कमी होण्यास-टाळण्यास मदत मिळू शकते. पाणी शरीरासाठी अमृत आहे, जीवन देणारे आहे, पण त्याचे प्रमाण व घेण्याची प्रद्धत याचा नीट विचार केला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com