शतायुषी व्हा!

काही व्यक्ती लवकर वृद्ध होतात तर काही व्यक्ती नव्वदी नंतर देखील अतिशय उत्तम आरोग्यपूर्ण जीवन जगताना दिसतात. खरोखर काय असेल बरं या दीर्घायुष्याचे रहस्य?
Centenarian
CentenarianSakal

आपली दैनंदिन गरज किती आहे यावर आपला आहार अवलंबून असला पाहिजे. वयोमानाप्रमाणे आहार बदलला पाहिजे. अनेक आजारांचे मूळ कारण म्हणजे गरजेपेक्षा जास्त जेवणे हेच असते, असे अनेक वेळा लक्षात येत असते.

जपान मध्ये एक छोटसं बेट आहे त्याचं नाव आहे, ‘ओकिनावा’! या बेटाचे वैशिष्ट्य असे आहे की येथील सर्व माणसे शंभर वर्षापेक्षा जास्त जगतात. संपूर्ण जपान मध्ये शंभरी गाठलेल्या व्यक्तींची संख्या दर एक लाखांमध्ये 65 आहे अनेक प्रगतीशील देशांमध्ये ही संख्या 30 पर्यंत आहे तर आपल्या देशामध्ये ही संख्या फक्त तीनच आहे. दीर्घायुषी होणे म्हणजे एका अडचणींची शर्यतच आहे जणू ! आपल्या देशामध्ये साथीचे रोग, आरोग्याविषयी अज्ञान, गरिबी आणि अशा अनेक कारणांमुळे आयुर्मर्यादा कमी आहे. मृत्यू म्हणजे काय, तो का आणि केव्हा, याची थोडी ओळख आपण करून घेतली पाहिजे. अनैसर्गिक मृत्यू ची अनेक कारणे आहेत. त्यातील महत्त्वाची आहेत, साथीचे आजार, संसर्गजन्य रोग आणि जीवनशैलीचे आजार. या कारणांमुळे अनैसर्गिक मृत्यू ओढवू शकतो.

काही व्यक्ती लवकर वृद्ध होतात तर काही व्यक्ती नव्वदी नंतर देखील अतिशय उत्तम आरोग्यपूर्ण जीवन जगताना दिसतात. खरोखर काय असेल बरं या दीर्घायुष्याचे रहस्य? मानवाला अनादिकालापासून हे दीर्घायुष्याचे रहस्य सोडवण्याची उत्सुकता असलेले आपणास दिसते. अशी एक म्हण आहे की तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा तुमच्या आयुष्यभराचे खाद्य तुमच्या पाठीवर घेऊन येता, जर तुम्ही लवकर लवकर खाल्ले तर हे अन्न लवकर संपून जाते. म्हणजेच आयुष्यमान कमी होते. म्हणून पूर्वजांनी कमी खा असा सल्लाच आपल्याला दिलेला आहे. याला काही शास्त्रीय पुरावा आहे काय हे समजण्यासाठी आपल्याला शरीरशास्त्रविषयी थोडीशी माहिती असणे आवश्यक आहे.

ज्या व्यक्तींना काही आनुवंशिक आजार नाही अशा व्यक्ती शंभरच काय परंतु 150 वर्षांपर्यंत जगू शकतील अशी रचना निसर्गाने केली आहे. परंतु काही कारणामुळे म्हणजेच ज्याला आपण आजार म्हणतो अशा कारणांमुळे ही आयुर्मर्यादा अवेळीच संपुष्टात येते. असे आजार मुख्यत्वे करून दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे संसर्गजन्य आजार सध्या चालू असलेल्या कोरोना या साथीमुळे कितीतरी व्यक्ती प्राणास मुकल्या आहेत. आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये नवनवीन संशोधन झाल्यामुळे बरेचसे साथीचे आजार आटोक्यात आले आहेत. परंतु त्याच बरोबर आहार विषयक आजार मात्र वाढले आहेत. एका बाजूला कुपोषण तर दुसऱ्या बाजूला अतिपोषण, अशी दोन्ही भिन्न चित्रे आपल्याला दिसतात. अति आहाराचे मुख्य कारण म्हणजे आहाराची मुबलक उपलब्धता, वैविध्य, तसेच आकर्षक जाहिराती आणि आरोग्यविषयक सामान्य ज्ञानाचा अभाव अशी असून, अशा अनेक कारणांमुळे स्थूलता, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि कॅन्सर यासारखे जीवनशैली मुळे होणारे आजार बळावलेले आहेत. साथीच्या आधारही भयानक प्रमाणामध्ये वाढले आहेत. आपण जो आहार घेतो तो बऱ्याच प्रमाणात वनस्पतिजन्य असतो.

वनस्पती सूर्याच्या ऊर्जेचा आणि मानवी उत्सर्जित कार्बन डाय-ऑक्साइड, युरिया इत्यादींचा वापर करून अन्न तयार करतात. हे अन्न खाल्ल्यामुळे सूर्यापासून मिळालेली ऊर्जाच आपण एक प्रकारे वापरत असतो. म्हणजेच सूर्य हा आपल्या जीवनाचा मूळ स्त्रोत आहे. म्हणूनच आपले पूर्वज सूर्याची उपासना करताना दिसतात, असो. तेव्हा दीर्घायुषी होण्यासाठी काय करायला हवे याचा थोडक्यात आढावा घेऊ या.

सध्या मानवाची अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती यावर बरीच चर्चा चालू आहे. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपायांची गरज आहे. सर्वात प्रथम आणि महत्त्वाची गोष्ट, म्हणजे आहार. आपली दैनंदिन गरज किती आहे यावर आपला आहार अवलंबून असला पाहिजे. म्हणजे आहाराचे प्रमाण या पेक्षा जास्त नसावे. वयोमानाप्रमाणे आहार बदलला पाहिजे. वाढत्या वयामध्ये तीन वेळा जेवण, मध्यम वयामध्ये दोन वेळा जेवण आणि उतार वयामध्ये केवळ एक वेळा जेवण घेणे संयुक्तिक ठरते. अर्थात आपल्या दैनंदिन जीवनशैली प्रमाणे यात बदल होऊ शकतो. अनेक आजारांचे मूळ कारण म्हणजे गरजेपेक्षा जास्त जेवणे हेच असते, असे अनेक वेळा लक्षात येत असते. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ ही ऊक्ती लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. वाढणारे वजन आणि पोटाचा घेरा या दोन गोष्टी याबाबत मार्गदर्शक ठराव्यात. मिताहार अंगीकारताना आहारामध्ये काय घटक आहेत याचाही विचार करणे आवश्यक आहे. आहार समतोल असणे, आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या यांचा भरपूर प्रमाणामध्ये समावेश असणे, आहारामध्ये तेल, तूप यासारखे स्निग्ध पदार्थ, तसेच दुधापासून बनणारे पदार्थ व मैद्या पासून बनणारे पदार्थ यांचा अतिरेक नसावा. माफक प्रमाणामध्ये मांसाहार करण्यासही हरकत नाही.

परंतु आहारामध्ये कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळला पाहिजे. त्याच बरोबर व्यसनाधीनता हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. तंबाखू, दारु, अमली पदार्थ यांचे सेवन कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे. म्हणजे सारासार बुद्धीचा विचार करून मोह टाळणं आवश्यक आहे. यासाठी आरोग्यविषयक वाचन करणे, मित्रांबरोबर चर्चा करणे आवश्यक आहे. आपल्या शरीरातील अस्थी आणि स्नायू हे लवकर वृद्ध होऊ नयेत म्हणून त्यांना नियमितपणे व्यायाम करण्याची आवश्यकता विसरून चालणार नाही. आपल्या हृदयाची गती व्यायाम केल्यामुळे आपल्या वयोमानाप्रमाणे वाढवली असता हृदयाची क्षमता वाढण्यास मदत होते आणि म्हणूनच नियमितपणे माफक प्रमाणात का होईना परंतु व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

आपल्या जीवनामध्ये प्राणवायूचे महत्त्व असामान्य आहे.. हवेतील प्राणवायू प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवणे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी श्वासाचे व्यायाम अतिशय महत्त्वाचे आहे आहेत. उत्तम श्वासोश्वास करण्यास शिकणे ही देखील एक कला आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. भारतीय संस्कृतीमधील प्राणायामाची संकल्पना हीच कला शिकवते. अर्थात ही कला जाणकारांच्या मार्गदर्शनाखालीच आत्मसात केली पाहिजे. म्हणून जर आपणास दीर्घायुषी व्हायचे असेल, अधिक काळ तरुण राहायचे असेल,जीवनशैलीचे आजार टाळायचे असतील आणि जीवनाचा आनंद भरपूर काळ उपभोगायचा असेल तर मिताहार, व्यायाम, प्राणायाम व सदाचार यांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे. मित्रहो, तर आजच करूया निश्चय निरोगी होण्याचा, तरुण राहण्याचा, वृद्धत्त्वावर मात करण्याचा आणि दीर्घायुषी आणि शतायुषी होण्याचा! आपल्या आयुष्यासाठी आपणास अनेक शुभेच्छा !

- डॉ. सुरेश शिंदे , MD, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com