आरोग्याचा पंचाक्षरी मंत्र

balaji-tambe
balaji-tambe

""नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि येणारे नूतन वर्ष आपणा सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी आणि सुखासमाधानाचे जावो'' अशा प्रकारे शुभेच्छांची देवाणघेवाण चालू असते; पण नुसत्या इच्छेने सर्व साध्य होत नसते. मनात शक्‍ती असली, तर त्या मनशक्‍तीच्या जोरावर इच्छा सफळ होत असतात. ज्यांच्याजवळ मनशक्‍ती आहे, त्यांनी स्वतः घेतलेले निर्णय आणि नियम पाळले जातात असे दिसते. व्यसन करायचे नाही असे ठरविले, की त्या सेकंदाला व्यसन बंद होते. सकाळचे चालणे, व्यायाम, योगासने, प्राणायाम व प्रकृतीला मानवेल असा आहार यापुढे करायचा असे ठरविले, की ते सर्व नियमात चालते. अशी मनशक्‍ती असणाऱ्यांच्या इच्छा आणि आशीर्वाद फळाला येतात.


मननात्‌ त्रायते इति मन्त्रः म्हणजेच सतत मनन, चिंतन करण्याने जो तारतो तो मंत्र! म्हणजेच आरोग्य उत्तम राहावे, असे वाटणाऱ्याने काही गोष्टी सतत डोळ्यासमोर ठेवायला पाहिजेत. मंत्र सतत मनःचक्षूंपुढे असल्यामुळे जसा तारतो, तसेच आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टी आजारपण येईपर्यंत न थांबता सतत ध्यानात ठेवायला लागतील. मंत्र गुरुंनी दिलेला असल्यामुळे त्यावर गुरू व शिष्य असे दोघांचेही लक्ष असते. आयुर्वेद हाच एकमेव आरोग्याचा गुरू! या आयुर्वेद गुरुने सांगितलेले मंत्र अनुसरले तरच संपूर्ण आरोग्यप्राप्ती होऊ शकेल. पूर्वीच्या काळी प्रत्येक घराचा "फॅमिली डॉक्‍टर' हा आरोग्याचा मंत्र सर्वांपर्यंत पोचवून त्यावर लक्ष ठेवण्याचे काम करत असे. हीच संकल्पना आपल्या या "फॅमिली डॉक्‍टर'च्या रूपाने सुरू झाली आणि सर्वांगीण आरोग्याचा मूलमंत्र सापडला.


*आयुर्वेदातील कानमंत्राचा पहिला चरण म्हणजे, आयुर्वेदात निसर्गचक्राशी संतुलन ठेवण्यासाठी ठरविलेले राहणीमान, वात-पित्त-कफ या संकल्पनेला अनुसरून व सप्तधातुवर्धनाला महत्त्व देऊन वैयक्तिक जाठराग्नि पाहून देश, काल, दिवस, रात्र आणि सहाही ऋतूंना अनुरूप आहार-विहार या सर्वांचाच समावेश आहे.
*दुसरा चरण म्हणजे, दैनंदिन जीवनव्यापारामुळे उत्पन्न झालेली आमद्रव्ये, विषद्रव्ये आणि विकृती शरीराबाहेर टाकल्यावर नेहमी लक्ष ठेवणे, तसेच पंचकर्मादी चिकित्सेतील विरेचन, वमन, बस्ती या विशेष प्रक्रियांच्या द्वारे शरीर शुद्ध ठेवून ताजेतवाने ठेवणे.


*तिसरा चरण म्हणजे, शरीरास प्राणशक्तीची असलेली गरज योग्य अन्न, रसायन, औषधे यापासून मिळवणे, जमेल तेवढे अमृतसेवन करणे आणि वाईट व विषारी वस्तूंचे सेवन टाळणे.


*चौथा महत्त्वाचा चरण म्हणजे, शरीरात घडणारे बदल व आजारांवर लक्ष ठेवून, आपल्या फॅमिली डॉक्‍टरांच्या कानावर सर्व गोष्टी घालून योग्य मार्गदर्शन मिळवणे. मनात येणारे विचार दाबून व ठेवता व्यक्त करणे, भौतिक मर्यादेपलीकडे असणाऱ्या शक्तीशी संबंध प्रस्थापित करणे आणि नाद व स्वास्थ्यसंगीत यांचा कटाक्षाने उपयोग करून घेणे. त्याचबरोबर मनःस्वास्थ्य ठीक राहण्यास सर्वाधिक महत्त्व देणे.
*पाचवा चरण म्हणजे, होणाऱ्या त्रासाचे व रोगाचे योग्य निदान व मोजमाप करून स्वतःच्या फॅमिली डॉक्‍टरांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाप्रमाणे कुठल्या प्रकारची औषध योजना किंवा उपचारपद्धत उपयोगी पडेल याचा विचार करून आवश्‍यक तेथे शल्यक्रियेची मदत घेणे.


हा आरोग्याचा पंचाक्षरी मंत्र जो कुणी नित्यनियमाने आचरणात आणेल, त्याला सर्व प्रकारचे आरोग्य व सुखसमाधान अवश्‍य मिळेल.


मंत्र कानात सांगायचा असतो; पण धंदा वाढवण्याच्या व वस्तू विक्रीच्या चढाओढीच्या जगात कान व डोळे फुटेपर्यंत खऱ्या-खोट्या जाहिरातबाजीचे मंत्र सांगितले जातात. "ज्याच्या हाती काठी, सर्व काही त्याच्यासाठी" या म्हणीप्रमाणे सत्ता, पैसा हे सर्व नफ्यातोट्याचेच गुलाम होऊन बसतात. वैयक्तिकपणे जरी प्रत्येक जण दुःखी राहिला, तरी एकूण समाज सुखी आणि प्रगत होत आहे, अशी सोईस्कर समजूत करून घेऊन चुकीच्या वस्तू, चुकीचे आचार-विचार, चुकीचा आहार-विहार हे विचारच जनसामान्यांत बरोबर व शास्त्रीय आहेत, अशा प्रचाराला सर्वांचे साह्य मिळते. त्या सर्व पसाऱ्यात या "आरोग्याच्या पंचाक्षरी मंत्रा'कडे कोण लक्ष देणार? परंतु संपूर्ण व सर्वंकष आरोग्यासाठी आयुर्वेदाचा वरील मंत्रच उपयोगी पडेल.

डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com