कर्करोगः नवे उपचार, नव्या दिशा

cancer
cancer

कर्करोग हा पूर्वीइतका भयंकर आजार राहिलेला नाही. नवनव्या उपचार पद्धतींमुळे कर्करोगावर नियंत्रण मिळवणे सहज शक्‍य झाले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगीकरण आणि जगण्याच्या बदलत्या सवयींमुळे भारतातील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सध्या वेगाने वाढताना दिसत आहे. एक गोष्ट खरी, की कर्करोगावर जरी उपचार असले, तरी ते कायमस्वरूपी आजारावर मात करू शकतील का, या प्रश्नाचे उत्तर डॉक्‍टरांना अजूनही सापडलेले नाही. त्यामुळेही देशभरात दिवसेंदिवस कर्करुग्णांची संख्या वाढत चालली आहे.  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुमारे साठ टक्के रुग्ण विविध कारणांनी अखेरच्या टप्प्यात वैद्यकीय तज्ज्ञांकडे येतात, त्यामुळे उपचारांना मर्यादा पडतात. एकीकडे प्रसारमाध्यमे, समाज संपर्कमाध्यमे (सोशल मीडिया) याद्वारे समाजात विविध प्रकारची जागृती वाढत चाललेली दिसत असताना आरोग्याबाबत अजूनही हेळसांड चालते. देशभरात कर्करोगावरील उपचारपद्धती व आवश्‍यक त्या साधनसुविधा खूपच सुधारलेली आहे. पण, त्यासाठी रुग्णांमध्ये पुरेशी जागृती दिसत नाही. तंबाखूचा वापर टाळला व रुग्णाला लवकरात लवकर वैद्यकीय तज्ज्ञांकडे नेण्यात आले, तर कर्करोगावर कितीतरी अधिक नियंत्रण मिळणे सहज शक्‍य आहे. 

कर्करोगाचे भारतात दोनशेपेक्षा जास्त प्रकार आढळतात. पण, त्यातील महत्त्वाचे असे चार प्रकार आहेत. कार्सिनोमा, सोरकोमा, लिम्फोमा आणि ल्यूकेमिया. त्यातही कार्सिनोमा हा प्रकार सामान्यपणे जास्त आढळतो. कार्सिनोमा हा प्रकार सर्वांत जास्त महिलांमध्ये आढळतो. ज्यात ब्रेस्ट कॅन्सर, गर्भपिशवी आणि योनीला जोडणाऱ्या अवयवाच्या ऊतींमध्ये तयार होणाऱ्या कर्करोगाचा समावेश आहे. तर, पुरुषांमध्ये डोके, मान, फुप्फुस आणि अन्ननलिकेचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळतो. लहान मुलांमध्ये रेटिनोब्लोस्टोमा, विल्म्स ट्यूमर आणि रक्ताचा कर्करोग हे सामान्य कर्करोगाचे प्रकार आढळतात. भारतात मुख्यत्वे कर्करोगाचे निदान हे अखेरच्या टप्प्यात होते, त्यामुळे रुग्ण वाचण्याचे प्रमाण कमी आहे. अनेकदा आपल्याला कॅन्सर झाला आहे, हे माहीत असूनही रुग्ण उपचार घेण्यासाठी धजावत नाहीत. रुग्ण कॅन्सरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये रुग्णालयात दाखल होतात. पण, तोपर्यंत रुग्णावर उपचार करणे डॉक्‍टरांना कठीण होऊन जाते.

भीती आणि लाजेपोटी अनेकदा कर्करुग्णाला जीव गमवावा लागतो. पुढारलेल्या देशांत स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांचे वाचण्याचे प्रमाण ऐंशी टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. मात्र, भारतात हेच प्रमाण फक्त साठ टक्के आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झालेल्या रुग्णांची वाचण्याची शक्‍यता जागतिक पातळीवर पन्नास टक्के असली, तरी भारतात ती सेहेचाळीस टक्के आहे. भारतातील कर्करोग झालेल्या रुग्णांचे लवकर निदान होणे आणि आवश्‍यक ते उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे कर्करोगातून वाचणाऱ्यांचे प्रमाण वाढू शकेल. स्त्रियांमध्ये ब्रेस्ट आणि गर्भाशयाचा कॅन्सर, तर पुरुषांमध्ये तोंड आणि घशाचा कॅन्सर, अशा कॅन्सरची लक्षणे लवकर दिसतात. त्यामुळे वेळीच उपचारही घेता येऊ शकतात.

स्त्रियांना होणाऱ्या कॅन्सरपैकी सवार्’ंत गंभीर कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. दर वर्षी एकदा तरी स्क्रिनिंग करून घेतले पाहिजे. शिवाय, स्वपरिक्षण हेही महत्त्वाचे आहे. याशिवाय गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये कॉल्पोस्कोपी आणि नंतर बायोप्सी करतो. एचपीव्ही म्हणजेच पॅपिल्लोमा व्हायरसचा प्रादुर्भाव, जास्त लठ्ठपणा, ओटीपोटात लठ्ठपणा, असेही अनेक प्रकार कॅन्सरमध्ये आहेत. पण, कोणत्याही स्वरूपात तंबाखूचा वापर हे कर्करोगाचे सवार्’ंत महत्त्वाचे कारण आहे. तीस टक्के कॅन्सरचे प्रमाण हे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळल्यामुळे रोखता येऊ शकते. भारतात जर कर्करोगाविरुद्ध लढाई द्यायची असेल, तर तंबाखू, अल्कोहोल आणि लठ्ठपणा यावर मर्यादा आणणे महत्त्वाचे आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या अहवालानुसार, कॅन्सर जागतिक अर्थव्यवस्थेतील तीन सर्वांत मोठ्या धोक्‍यांपैकी एक आहे आणि या सर्वांच्या मुळाशी आहे तंबाखू हे सर्वांत महत्त्वाचे कारण. त्यामुळे जर कॅन्सरशी लढा द्यायचा असेल, तर आधी तंबाखूशी लढा देणे गरजेचे आहे! पाश्‍चात्त्य देशांनी तंबाखूसेवनाचे प्रमाण दहा पटीने कमी केले आहे. स्वाभाविकच तेथे कर्करुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झाल्याचे दिसते. 

कर्करुग्णांवरील उपचारपद्धतीत भारतात आमूलाग्र बदल झाला आहे. सगळ्यांना सारख्याच पद्धतीने उपचार केले जात नाहीत. रुग्णाच्या परिस्थितीनुसार शस्त्रक्रिया, रेडिएशन, केमोथेरपी यासंबंधीचे निर्णय सर्व तज्ज्ञ एकत्र बसून घेतात. प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्रपणे उपचाराचा आराखडा तयार केला जातो. त्याची कल्पना रुग्णाला दिली जाते आणि नंतर उपचार केले जातात. खासगी रुग्णालयातच नव्हे, तर शासकीय रुग्णालयातही याच प्रकारे उपचार केले जात आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षांतील हा सर्वांत मोठा बदल आहे. 

पूर्वी कोबाल्ट रेडिएशनचा वापर उपचारांसाठी करीत असत. आता ‘रेनॉयर ऑटोमोटिव्ह रेडिएशन’चा पर्याय वापरला जातो. तो अधिक सुरक्षित व अधिक परिणामकारक आहे. पूर्वी कर्करुग्णांवर मुंबईत टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत. आता राज्यात अगदी जिल्ह्याच्या ठिकाणीही कर्करुग्णांवर चांगले उपचार होऊ शकतात, तशा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. शासनाच्या सकारात्मक सहभागामुळे सुविधांचे विकेंद्रीकरण शक्‍य झाले आहे. परदेशी तंत्रज्ञान व औषधे भारतात यायला पूर्वी किमान बारा-पंधरा वर्षे लागायची. ही दरी आता उरलेली नाही. परदेशात एखादे औषध तयार झाले की लगेच भारतात ते उपलब्ध होऊ लागले आहे. नवे संशोधन व नवे उपचार भारतातील रुग्णांसाठी लगेच मिळू लागले आहेत.

आधीच्या काळातील उपचारात एक त्रुटी नेहमीच जाणवायची ती म्हणजे, ते उपचार थोडे घातक होते. कर्करोगग्रस्त पेशींबरोबरच शरीरातील चांगल्या पेशीही त्या उपचारपद्धतीत मारल्या जायच्या. त्याचे दुष्परिणाम अधिक होते. काही वेळा तर कॅन्सर परवडला, पण त्याचे उपचार नको, असे वाटायचे. पण आता ते बदलले आहे. आता उपचारात अधिक सुरक्षितता, अधिक काळजी घेता येत आहे. ‘टार्गेटेड थेरपी’चा वापर केला जातो. त्यामुळे ग्रस्तपेशींवरच हल्ला केला जातो. त्याचे दुष्परिणामही कमी होतात. यापुढच्या काळात गुणसूत्रे (जीनस्‌) व कर्करोग यांकडे अधिक उत्सुकतेचा विषय असेल. ‘जेनेटिक थेरपी’  कर्करोगग्रस्तांसाठी वरदान ठरेल. 

या सगळ्या उपचार पद्धतीत विकास होत आहे. साहजिकच कर्करोगाविषयीची भीतीही कमी झाली. एव्हरेस्ट शिखर नेहमीच धोकादायक असते, पण पुण्यात आता चौदा एव्हरेस्टवीर आहेत, साहजिकच त्याविषयीची भीती कमी वाटते. आपल्या आसपास कर्करोगमुक्तांची संख्या वाढत असलेली दिसत असल्यानेच भीती कमी झाली आहे. पण, त्यामानाने सजगता आलेली दिसत नाही. मला आठवते, दै. ‘सकाळ’ने गुटख्याच्या जाहिराती घ्यायच्या बंद केल्या त्याला आता वीस वर्षे होऊन गेली. त्यानंतर सरकारने काही प्रतिबंधात्मक उपाय योजले. सार्वजनिक कार्यक्रमातून गुटख्याचे प्रायोजकत्व घेणे बंद झाले. पण, तरीही तंबाखू व गुटखा खाणे पूर्ण थांबलेले नाही. तंबाखूविरोधी जनमत तयार झाले पाहिजे. कष्टकरी माणूस, रिक्षा-ट्रक-बस ड्रायव्हर या वर्गात अजूनही तंबाखू-गुटख्याचे व्यसन आहे. आपल्याला हे व्यसन थांबवता आले, तर कर्करुग्णांची संख्या एकदम तीस टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकेल. सध्या तरी जनजागृतीवरच आपला भर असला पाहिजे.

६० टक्के अखेरच्या टप्प्यात निदान 
3० टक्के तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कर्करोग होण्याचे प्रमाण
२०० कर्करोगाचे प्रकार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com