आहारविधान

डॉ. श्री बालाजी तांबे
Tuesday, 9 May 2017

‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ अर्थात शरीरातील जाठराग्नीला आहुती दिल्याप्रमाणे जेवायचे असेल, तर योग्य वेळी आणि इतर सर्व नियम पाळून जेवले पाहिजे. जेवण हे नेहमी सुरक्षित ठिकाणी आणि एकांतात करावे. एकांत म्हणजे एकट्याने असा अर्थ येथे अपेक्षित नाही, तर उघड्यावर, जेथे लोक येत-जात आहेत, वर्दळ आहे अशा ठिकाणी जेऊ नये. जेवण अनेकांबरोबर एकत्र करणे उत्तम, पण तेथे सगळे जेवणासाठीच एकत्र आलेले असावेत.

अग्नीचे संरक्षण करणे आणि अग्नी बिघडू नये यासाठी काय करावे याची माहिती आपण घेतली. आहार आणि अग्नी यांचा किती जवळचा संबंध असतो हे सुद्धा आपण पाहिले. आहार सेवन करताना ज्या गोष्टी लक्षात घ्यायच्या त्यांना ‘आहारविधान’ किंवा ‘भोजनविधान’ म्हटले जाते. या बाबतीतील अजून काही मुद्दे आज आपण पाहणार आहोत. 

मुख्य जेवण हे दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी व संध्याकाळी करायचे असते. 
सायंप्रातर्द्विजातीनाम्‌ अशनं श्रुतिनोदितम्‌ ।
नान्तरा भोजनं कुर्यात्‌ अग्निहोत्रसमो विधिः ।।
....निघण्टु रत्नाकर

वेदवचनानुसार सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा जेवण करणे हे अग्निहोत्राप्रमाणे असते. जेवणाच्या आधी आपण समर्थ श्री रामदासस्वामींनी लिहिलेली  ‘वदनी कवळ घेता’ ही प्रार्थना म्हणतो त्यातही ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ असे 

म्हटलेले आहे. अर्थात, शरीरातील जाठराग्नीला आहुती दिल्याप्रमाणे जेवायचे असेल, तर योग्य वेळी आणि इतर सर्व नियम पाळून जेवले पाहिजे. 

या ठिकाणी सकाळी जेवण करणे म्हणजे सूर्योदयानंतर सहा तासांच्या आत जेवण करणे असा अर्थ अपेक्षित आहे. 

याममध्ये न भोक्‍तव्यं यामयुग्मं न लंघयेत्‌ ।
याममध्ये रसोत्पत्तिः यामयुग्मात्‌ बलक्षयः ।।
....निघण्टु रत्नाकर

सूर्योदयानंतरच्या तीन तासांत भोजन करून नये, मात्र त्यानंतरच्या तीन तासांत भोजनावाचून राहू नये. कारण पहिल्या तीन तासांत आदल्या दिवशी संध्याकाळी सेवन केलेल्या अन्नातून आहाररस तयार होत असतात, त्यामध्ये अडथळा येऊ नये याची काळजी घेणे भाग असते. मात्र पुढचे तीन तास संपण्यापूर्वी जेवण करणे भाग असते. 
साधारणतः साडेसहा-सातला सूर्योदय होतो असे धरले, तर किमान दुपारी एक-दीड वाजण्याच्या पूर्वी जेवायला हवे. ही वेळ टळून गेली आणि तरी जेवण झाले नाही, तर बलक्षय म्हणजे शक्‍तीचा ऱ्हास होतो. 

याचा अर्थ सकाळी काहीच खाऊ नये असा होत नाही. नाश्‍त्यासाठी पंचामृत, दूध, एखादे-दुसरे रसायन, तसेच थोडे पोहे, सांजा वगैरे ताजा व गरम पदार्थ खाल्ला, तरी त्यामुळे जेवणाप्रमाणे पोट भरून जाणार नाही याचे भान ठेवणे आवश्‍यक होय. सकाळी थोडे खाल्ले तरी दुपारी जेवणाच्या वेळी नीट भूक लागायला हवी. बऱ्याचदा सकाळी दहा-अकरा वाजता कामानिमित्त घर सोडायचे असते. त्यामुळे त्याआधीच पोटभर जेवून घेण्याची सवय लावून घेतलेली दिसते, पण हे एकंदर आरोग्याच्या, अग्निरक्षणाच्या दृष्टीने योग्य नाही. 

जेवणाची वेळ सांभाळणे महत्त्वाचे खरे, पण त्याहीपेक्षा अगोदरचे अन्न नीट पचल्यानंतर जेवणे हे अधिक महत्त्वाचे. आधीचे अन्न पचले आहे की नाही हे पुढील लक्षणांवरून समजून घेता येते, 

उद्‌गारशुद्धिउत्साहो वेगोत्सर्गो यथोचितः ।
लघुता क्षुत्पिपासा च जीर्णाहारस्य लक्षणम्‌ ।।
....निघण्टु रत्नाकर

शुद्ध ढेकर येणे, मन उत्साहित असणे, मलमूत्राचे विसर्जन यथायोग्य झालेले असणे, शरीराला हलकेपणा जाणवणे, भूक आणि तहान अनुभूत होणे. 

जेवणाची वेळ झाली असूनही शरीरावर ही लक्षणे दिसली नसली तर त्याचा अर्थ एक तर पचनशक्‍ती मंदावलेली आहे किंवा आधीचे जेवण पचायला जड, मात्रेत अधिक आणि प्रकृतीला प्रतिकूल होते असे म्हणता येते. यातील नेमके कारण शोधून त्यानुसार योग्य उपचार घेणे किंवा आहारात बदल करणे गरजेचे असते. 

जेवण हे नेहमी सुरक्षित ठिकाणी आणि एकांतात करावे. एकांत म्हणजे एकट्याने असा अर्थ येथे अपेक्षित नाही, तर उघड्यावर, जेथे लोक येत-जात आहेत, वर्दळ आहे अशा ठिकाणी जेवू नये. जेवण अनेकांबरोबर एकत्र करणे उत्तम, पण तेथे सगळे जेवणासाठीच एकत्र आलेले असावेत. खूप लोक आहेत आणि एखादा मनुष्य एकटाच जेवण करतो आहे असे होऊ नये. उघड्यावर जेवण करण्याने लक्ष्मी निघून जाते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. 

तृषितास्तु न चाश्नीयात्‌ क्षुधितो न जलं पिबेत्‌ ।।
....निघण्टु रत्नाकर

तहान लागली असता पाणी न पिता अन्न सेवन करू नये, तसेच भूक लागली असता जेवण न करता पाणी पिऊ नये. यामुळे अपचन होण्याचा शक्‍यता वाढते. 
अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी सांभाळल्याने आरोग्य टिकण्यास मदत मिळत असते. जेवण करताना अजूनही काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात, याची माहिती आपण पुढच्या वेळी पाहूया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Doctor article by Dr. Shri Balaji Tambe about food