अर्धाच गुडघा बदला

डॉ. पराग संचेती
Friday, 18 August 2017

दुखण्यापुढे गुडघे टेकले की नेमके काय करावे हे कळत नाही. पण आता गुडघा संपूर्ण बदलण्याची आवश्‍यकता उरलेली नाही. जर गुडघ्याचा काही भाग खराब झालेला असेल तर तेवढाच भाग बदलून नैसर्गिक गुडघा कायम राखण्याकडे वैद्यकीय तज्ज्ञांचा कल वाढतो आहे. 
 

दुखण्यापुढे गुडघे टेकले की नेमके काय करावे हे कळत नाही. पण आता गुडघा संपूर्ण बदलण्याची आवश्‍यकता उरलेली नाही. जर गुडघ्याचा काही भाग खराब झालेला असेल तर तेवढाच भाग बदलून नैसर्गिक गुडघा कायम राखण्याकडे वैद्यकीय तज्ज्ञांचा कल वाढतो आहे. 
 

वय व वजन वाढते तसे गुडघे कुरकुर करू लागतात. गुडघ्याच्या तक्रारी वाढतात. गुडघा काम करेनासा झाला की संपूर्ण गुडघा बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करायची हा एक पर्याय होता. काहीवेळा गुडघ्याचा काही भागच खराब झालेला असे, पण गुडघा मात्र पूर्ण बदलावा लागत असे. नैसर्गिक गुडघ्याऐवजी कृत्रिम गुडघ्याने वावरावे लागे. पण आता संपूर्ण गुडघा बदलण्याऐवजी गुडघ्याचा खराब झालेला भाग बदलण्याचे तंत्र विकसित झाले आहे. गुडघ्याचा अंश बदलण्याची शस्त्रक्रिया (अर्धा गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया) हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. याचबरोबर गुडघ्याचे अस्थिबंधन आणि दूषित न झालेला कुर्चा यांचे संवर्धनही केले जाते. संपूर्ण गुडघे रोपणशस्त्रक्रियेला पर्याय म्हणून या शस्त्रक्रियेला पाहिले जाते आणि ज्यांच्या गुडघ्याचा काही भागच खराब झाला आहे अशा रुग्णांसाठी ती वापरली जाते. 

गुडघ्याला गरजेपुरता छोटा छेद घेऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे या रुग्णांना संपूर्ण गुडघे रोपण शस्त्रक्रियेच्या रुग्णांपेक्षा कमी वेळ रुग्णालयात राहावे लागते. तसेच रुग्ण त्यांच्या दैनंदिन कामांनाही लवकर सुरवात करू शकतात. 

गुडघ्याच्या अस्थिसंधीवातामध्ये (ओस्टिओअर्थरीटीस) गुडघ्याच्या हाडांना संरक्षण देणारा कुर्चा कालांतराने गळून पडतो. हे संपूर्ण गुडघ्याच्या बाबतीत किंवा त्यातील एखाद्या भागाच्या बाबतीतही होऊ शकते. गुडघ्याचा सांधा तीन विभागांमध्ये विखुरलेला असतो.

मध्य विभाग : गुडघ्याच्या आतला भाग
बाजूचा विभाग : बाहेरील भाग
पॅटेलोफेमोरल विभाग : मांडीचे हाड व गुडघ्याची वाटी यामधील पुढचा भाग
गुडघ्याच्या सांध्याच्या एखाद्या भागाला असलेला ओस्टिओअर्थरीटीस गुडघ्याचा अंश बदलण्याची शस्त्रक्रिया करून बरा करता येतो. या प्रक्रियेमध्ये खराब झालेला भाग काढून टाकून त्याजागी प्लॅस्टिक अथवा धातूचा वापर केला जातो. निरोगी असलेले कुर्चा, हाड तसेच अस्थिबंधन (लिगामेंट) यांचे संवर्धन केले जाते. यामुळे शस्त्रक्रियेनंतर गुडघा अगदी सर्वसाधारण अवस्थेत येतो.

गुडघ्याच्या अंशिक शस्त्रक्रियेचे फायदे : 
तुलनेने आजारापासून लवकर मुक्ती.
रुग्णालयामध्ये कमी वेळ राहायला लागते.
गुंतागुंत कमी असते.
शस्त्रक्रियेनंतर वेदनांचे प्रमाण कमी असते.
तुलनेने कमी रक्त जाते.
संसर्गाची शक्‍यता कमी असते.
तसेच गुडघ्याच्या निरोगी भागातील अस्थी, कुर्चा आणि अस्थिबंधन यांचे संवर्धन केले जाते. त्यामुळे रुग्णांना अंशिक गुडघा बदलणे हे संपूर्ण गुडघा बदलाच्या शस्त्रक्रियेपेक्षा जास्त नैसर्गिक वाटते. 

शस्त्रक्रिया कोणाला सुचवली जाते?
ज्या रुग्णांचा ओस्टिओअर्थरीटीस हा एकाच भागापर्यंत मर्यादित आहे आणि त्यांच्या लक्षणांवर शस्त्रक्रियेविना होणाऱ्या उपचारांचा काहीही उपयोग होत नसेल तर अंशिक गुडघा बदलण्याचा सल्ला डॉक्‍टरांकडून दिला जातो. 

लक्षात घेण्याजोग्या काही गोष्टी :
दाहकता कमी होण्यासाठी तुम्ही काही औषधे घेत असाल, तसेच तुमचे वजनही नियंत्रणात असेल आणि तरीही तुमच्या गुडघ्याच्या वेदना कमी होत नसतील तर तुम्ही गुडघे बदलण्याच्या शस्त्रक्रियेला पात्र असाल.
गुडघ्याचा एक्‍सरे तुम्ही गुडघ्याच्या अंशिक शस्त्रक्रियेला कितपत योग्य आणि तयार आहात हे दर्शवतो. 
तरुण आणि वयोवृद्ध रुग्णांमध्ये गुडघ्याचे एकाच वेळी अनेक भाग बदलणे याचेही अतिशय उत्तम परिणाम दिसून आले आहेत.

या शस्त्रक्रियेस अपात्र कधी?
पुढील पैकी काहीही लक्षणे, घटक रुग्णामध्ये आढळल्यास या प्रक्रियेसाठी पात्र ठरू शकत नाही.
दाहक संधिवात असणे
गुडघ्याचा ताठपणा
अस्थिबंधन खराब होणे
आधुनिक ओस्टिओअर्थरीटीस होणे
तीव्र व्यंग असणे

रोगमुक्तता (रिकव्हरी) कशी होते?
शस्त्रक्रिया झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच रुग्ण गुडघ्याची हालचाल सुरू करू शकतो. संपूर्ण गुडघे बदलण्यापेक्षा यातून कमी वेदनांसह रुग्ण आपल्या दैनंदिन हालचालींकडे लवकर परत येऊ शकतो. रुग्णालयामध्ये असताना तसेच घरी गेल्यापासून दोन ते चार आठवडे गुडघ्याच्या योग्य हालचालींसाठी फिजिओथेरपिस्टची मदत घ्यावी लागते. बहुतांश वेळा शस्त्रक्रियेनंतर सर्वसाधारणपणे एक किंवा दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ रुग्णालयामध्ये राहावे लागत नाही.  रोजचा व्यायाम साधारण चार आठवड्यांनी रुग्ण सुरू करू शकतो. वेगाने चालणे (जॉगिंग) किंवा पळणे यासारखे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जात नाही, कारण गुडघा बदलताना त्यात बेअरिंग सरफेसचा समावेश असतो.

नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न 
गुडघ्याच्या अंशिक शस्त्रक्रियेला वयोमर्यादेचे काही बंधन असते का?

- जर रुग्ण शारीरिकदृष्ट्या या शस्त्रक्रियेसाठी पात्र असेल तर, गुडघ्याची अंशिक शस्त्रक्रिया ही कोणत्याही वयात करता येते. यासाठी असे कोणतेही वयाचे बंधन नाही.

कोणत्या प्रकारच्या अडचणी या शस्त्रक्रियेदरम्यान येऊ शकतात?
- कोणत्याही सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियेसारख्याच अडचणी येऊ शकतात. यातसुद्धा गुडघ्याची अस्थिरता, बदलेला भाग सैल पडणे, संसर्ग होणे, नसांना जखम होणे किंवा रक्तपेशीत किंवा रक्तनलिकेत खोलवर रक्त गोठणे या अडचणी येऊ शकतात. संपूर्ण गुडघे बदलण्याच्या शस्त्रक्रियेपेक्षा अंशिक गुडघे बदलण्याच्या शस्त्रक्रियेत तुलनेने खूप कमी प्रमाणात अडचणी येतात. या सर्व विषयांवर किंवा तुमच्या मनातील प्रश्नांवर तुमच्या डॉक्‍टरांशी नक्की बोला. 

अंशिक गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर रोगमुक्ती (रिकव्हरी) वेदनादायी असते का?
- वेदना या व्यक्तीसापेक्ष असतात. पण तरीही रुग्णांचे अनुभव असे सांगतात की, संपूर्ण गुडघे बदलण्याच्या शस्त्रक्रियेपेक्षा अंशिक गुडघे बदलण्याच्या शस्त्रक्रियेत तुलनेने खूप कमी प्रमाणात वेदना आणि गुडघ्याचा ताठपणा दिसून येतो.

जर मी गुडघ्याची अंशिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला तर गुडघ्याचा संधिवात संपूर्णपणे नष्ट होतो का?
- गुडघ्याचा जो भाग या शस्त्रक्रियेतून बदलला जाणार असेल त्याच भागाला संधिवात असल्यास तो नष्ट होऊ शकतो, परंतु जर संपूर्ण गुडघ्याला संधिवात असेल तर तुम्हाला संपूर्ण गुडघे बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल.

अंशिक गुडघे रोपण शस्त्रक्रियेची काल-मर्यादा काय असते?
- योग्य प्रकारे झालेल्या अंशिक गुडघे बदलण्याच्या शस्त्रक्रियेचा परिणाम पंधरा ते वीस वर्ष राहतो.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा 
हालचाल हेच आयुष्य आहे...आयुष्य हीच हालचाल आहे...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor Change the knee half