रक्तदाब

डॉ. एच. व्ही. सरदेसाई
Friday, 6 October 2017

योग्य रक्तदाब आयुष्य चालू राहण्याकरिता आवश्‍यकच असतो. रक्तदाब असल्याखेरीज रक्त पायाच्या नखापासून केसांच्या मुळापर्यंत पोचवले जाणार नाही. पण हाच रक्तदाब प्रमाणापेक्षा अधिक वाढला तर आजारांना निमंत्रण देतो. म्हणून रक्तदाब किमान तीन महिन्यांतून एक वेळा तपासून घेणे आणि सातत्याने वाढलेला असला, तर उपचार सुरू करणे इष्ट असते. वेळीच काळजी घेण्यातच भलेपणा आहे.

योग्य रक्तदाब आयुष्य चालू राहण्याकरिता आवश्‍यकच असतो. रक्तदाब असल्याखेरीज रक्त पायाच्या नखापासून केसांच्या मुळापर्यंत पोचवले जाणार नाही. पण हाच रक्तदाब प्रमाणापेक्षा अधिक वाढला तर आजारांना निमंत्रण देतो. म्हणून रक्तदाब किमान तीन महिन्यांतून एक वेळा तपासून घेणे आणि सातत्याने वाढलेला असला, तर उपचार सुरू करणे इष्ट असते. वेळीच काळजी घेण्यातच भलेपणा आहे.

आयुष्य चालू राहण्याकरता रक्तदाब आवश्‍यक आहे. रुधिराभिसरण चालू राहण्याकरता प्रत्येक व्यक्तीला रक्तदाबाची गरज असते. मानवी शरीरात एक लक्ष कोटी पेशी असतात. जिवंत राहणे आणि आपापले विशिष्ट कार्य करणे याकरता प्रत्येक पेशीला ऊर्जा लागते. विविध अन्नघटक आणि प्राणवायू यांचा वापर करून प्रत्येक पेशी ही ऊर्जा आपल्या आत तयार करते.

प्राणवायू आणि अन्नघटक प्रत्येक पेशींना पुरवण्याचे काम रुधिराभिसरण संस्था अहोरात्र आजन्म करीत असते. आपल्या घरात स्वयंपाक घराच्या नळापासून आंघोळीच्या शॉवरला पाणी जाण्याकरता जसा पाण्याला नळांत दाब लागतो, तसाच हा रक्तदाब आपल्या शरीराच्या पायाच्या बोटांपासून ते कवटीच्या वरील केसांच्या मुळांपर्यंत रक्त पोचवतो (अगदी नख-शिखांत). रुधिराभिसरणाच्या केंद्रस्थानी हृदय हा एक पंप असतो. या पंपाचे आकुंचन झाले की, रक्तवाहिन्यांत तात्पुरता रक्तदाब वाढतो. याला सिस्टॉलिक रक्तदाब म्हणतात. ग्रीक शब्द ‘सिस्टेल’ (systale) म्हणजे एकत्र येणे, आकुंचन पावणे. यावरून सिस्टॉलिक हा शब्द आला आहे. जेव्हा दोन लागोपाठ आकुंचनामधल्या वेळात हृदयाचा स्नायू शिथिल होतो, तेव्हा रक्तवाहिन्यातील (रोहिण्यांच्या आतील) रक्तदाब तात्पुरता कमी होतो.

त्याला डायास्टॉलिक रक्तदाब म्हणतात. ग्रीक शब्द ‘डायास्टेल’ (diastale) म्हणजे आकाराने मोठे होणे, प्रसरण पावणे. यावरून डायास्टॉलिक हा शब्द आला आहे. हृदयाच्या डाव्या व्हेंट्रिकलपासून प्रत्येक आकुंचनामुळे एक लाट निर्माण होते, ती शरीरातील सर्व रोहिण्यांत पसरते. 

रक्तदाबात खूप फरक असू शकतो. रक्तदाबाची नोंद करताना सिस्टॉलिक रक्तदाबाचा आकडा लिहून समोर एक तिरकी रेघ काढून मग डायास्टॉलिक रक्तदाबाचा आकडा लिहितात. या नंतर इतके ‘मिलिमीटर्स ऑफ मर्क्‍युरी’ (पाऱ्याच्या नळीवर रेखाटलेल्या मिलिमीटर्सचा आकडा) नोंदतात. सामान्यतः तरुण ते प्रौढ व्यक्तीचा रक्तदाब १३५/८० इतका असतो. १४०/९० ते १६०/१०० म्हणजे सौम्य प्रमाणात रक्तदाब वाढलेला आहे आणि यापेक्षाही जास्त असल्यास तीव्रपणे रक्तदाब वाढलेला आहे असे मानले जाते.

उलटपक्षी काही चांगल्या प्रकृतीतदेखील एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब ९५/६० इतका कमीदेखील असू शकतो. मोजलेल्या रक्तदाबाची नोंद करणे इष्ट असते. काही संवेदनक्षम व्यक्तींचा रक्तदाब ‘आता आपला रक्तदाब मोजला जाणार आहे’ या कल्पनेनेच काही काळ (सहसा सिस्टॉलिक) वाढतो.

अमेरिकेत बहुतेक डॉक्‍टर मंडळी काम करताना पांढऱ्या रंगाच्या कापड्याचा कोट घालतात. त्यामुळे अशा वाढलेल्या रक्तदाबाला ‘व्हाईट कोट हायपरटेंशन’ म्हणतात. रक्तदाब बदलत जातो. रात्री झोपेच्या काळात तो कमी असतो. हे बदल चांगल्या प्रकृतीतदेखील होत असतात. आपले उपचार अशा एखाद्या वेळच्या रक्तदाबाच्या मोजमापावरून रुग्णाने स्वतः कमी-जास्त करणे इष्ट नसते. उपचारासंबंधीचे निर्णय आपल्या डॉक्‍टरांनाच घेऊ द्यावेत. आपल्याला होणारे त्रास आणि आपल्या शंका डॉक्‍टरांना अवश्‍य सांगाव्यात, पण उपचारांचे निर्णय डॉक्‍टरांनीच घ्यावेत.

रक्तदाब का वाढतो याचे कारण बहुतेक वेळा समजणे सोपे नसते. मानसिक तणाव किंवा शारीरिक वेदना यामुळे तात्पुरता रक्तदाब वाढू शकतो.

सातत्याने १६०/१०० पेक्षा जास्त असणारा रक्तदाब दखलपात्र असतो. अशा व्यक्तीच्या जीवनशैलीकडे नजर टाकायला हवी. जीवनशैली म्हणजे आहार, व्यायाम आणि विचारसरणी. ज्या व्यक्तीचा रक्तदाब वाढलेला असतो, त्या व्यक्तीने मिठाचे सेवन कमी करण्यास सुरवात करावी. अन्नास चव येईल एवढेच मीठ ठेवावे. आपले वजन योग्य आहे किंवा कसे हे पडताळून पाहावे. असे पडताळण्याकरता एक सूत्र वापरतात. व्यक्तीचे वजन किलोग्रॅममध्ये मोजतात (W for weight). त्याचप्रमाणे व्यक्तीची उंची मीटर्समध्ये मोजतात. (H = height in meters). या आकड्याचा वर्ग काढतात (H2). किलोग्रॅम्समध्ये मोजलेल्या वजनाच्या आकड्याला या मीटर्समध्ये उंची मोजलेल्या आकड्याच्या वर्गाने भागतात (W/H2). येणाऱ्या आकड्याला ‘बॉडीमास इंडेक्‍स’ (बीएमआय) म्हणतात. म्हणजे W/H2 = BMI. हा आकडा १६ ते १८ असणे म्हणजे या व्यक्तीचे वजन योग्य आहे. हा आकडा २० ते २५ असेल तर वजन थोडे जास्त आहे. परंतु, ३० किंवा जास्त असल्यास व्यक्ती स्थूल आहे असे मानले जाते. ज्यांना आपले वजन कमी करावयाचे आहे त्यांनी नियमाने पायी चालण्याचा व्यायाम करावा आणि आहाराकडे लक्ष द्यावे. जेव्हा एखादी व्यक्ती एक तास संथगतीने सपाटीवर सतत चालते, तेव्हा त्या व्यक्तीचे शंभर उष्मांक खर्च होतात. म्हणजे, जर एका आठवड्यात रोज दहा तास चालले तर एक हजार उष्मांक वापरले जातील.

चाळीस मिनिटे सकाळी व चाळीस मिनिटे संध्याकाळी याप्रमाणे एक आठवडा रोज चालल्यास दर आठवड्याला एक हजार उष्मांक वापरले जातील. आपल्या शरीरातील मेद अशाप्रकारे चालून घटविता येतो. असे चालणाऱ्या व्यक्तीचे पस्तीसशे उष्मांक वापरले गेले, की एक पौंड मेदाचे विघटन होईल. आणि सात हजार उष्मांक वापरले गेले तर एक किलोग्रॅम मेद झिजवला जाईल. यावरून संथ गतीने सातत्याने सपाटीवर चाळीस मिनिटे दिवसातून दोन वेळा चालणाऱ्या व्यक्तीचे वजन दोन महिन्यांत एक किलो घटावे. वर्षभरात चार ते पाच किलोग्रॅम्स घटले तरी तीन-चार वर्षांत हवे तितके वजन  बहुतेकांच्या बाबतीत व्हावे. 

आहारात उष्मांक कमी करण्याच्या दृष्टीने मद्यपान पूर्ण सोडावे. साखर आणि साबुदाणा वर्ज्य करावा. दर आठवड्याला आपले वजन एकाच वजनाच्या काट्यावर नोंदावे. वजन अपेक्षेएवढे कमी होत नसल्यास भात, बटाटा, रताळे, गोड फळे (आंबा, द्राक्षे, चिकू, केळी) यांच्या सेवनावर मर्यादा घालाव्यात. योग्य आहार आणि पायी चालणे सर्वांत महत्त्वाचे. त्याचबरोबर तेल, तूप, लोणी, साय हे पदार्थदेखील मर्यादितच ठेवावेत. मिठाई, फरसाण, वाटाणा, पावटा हरभरा असले पदार्थदेखील टाळावेतच.

आपला रक्तदाब आणि आपले वजन दर महिन्याला नोंदावे. रक्तदाब वाढलेला आहे किंवा कसे हे रक्तदाब वाढलेल्या व्यक्तींपैकी पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक व्यक्तींना तपासल्यावरदेखील कळत नाही. आपला रक्तदाब वाढलेला आहे हे जरी समजले नाही तरी सातत्याने जास्त राहिलेल्या (१३५/९० किंवा जास्त) रक्तदाबाचे दुष्परिणाम रोहिण्यांच्या अस्तरावर होऊ लागतात. या रक्तवाहिन्यांच्या अस्तरात सूक्ष्म चिरा पडू लागतात. या चिरांतून कोलेस्टेरॉल नावाचा रक्तातील मेणासारखा पदार्थ रक्तवाहिन्यांच्या अस्तरात शिरतो. तो रक्तवाहिन्यांच्या अस्तरात जमा होऊ लागतो. असा प्रकार वयाच्या १८ ते २५ दरम्यान सुरू होऊ शकतो. जेव्हा रक्तवाहिन्यांच्या अस्तरांत या कोलेस्टेरॉलच्या रेणूंची ढेकळे जमतात तेव्हा रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. अरुंद रोहिण्यांतून रक्ताचा पुरवठा पुरेसा होईनासा होतो. त्यातल्या त्यात हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि डोळ्याच्या मागच्या नेत्रपटलावर विशेष करून होतो. ज्यांचा रक्तदाब जास्त असतो, अशा व्यक्तींना हृदयविकार, पॅरॅलिटिक स्ट्रोक्‍स (अर्धांगवायू), बुद्धिभ्रंश (डिमेंशिया) अथवा मूत्रपिंडे अकार्यक्षम होणे असे आजार मोठ्या प्रमाणात होतात. रक्तदाब वाढलेल्या व्यक्तीच्या रक्तात कोलेस्टेरॉल (एल.डी.एल. कोलेस्टेरॉल)ची पातळी वाढलेली असली, ती व्यक्ती कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन करीत असली तर रोहिणीकाठिण्याचा विकार लवकर होतो.

मोठ्या प्रमाणात होतो. उपचार करून रक्तदाब आटोक्‍यात ठेवला तर हृदयविकार होण्याचा धोका वीस टक्‍क्‍यांनी तर अर्धांगवायूचा झटका येण्याचा धोका चाळीस टक्‍क्‍यांनी कमी होतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

रक्तदाब बराच जास्त वाढेपर्यंत केवळ वाढलेल्या रक्तदाबाचा व्यक्तीला फारसा त्रास जाणवत नाही. जर काही त्रास जाणवला तर तो पुढीलप्रमाणे असू शकतो - १) सकाळी जाग येताना डोके आणि मान या मधली (डोक्‍याच्या मागच्या बाजूचा भाग) जागा ठोके पडल्याप्रमाणे दुखू लागते, २) काहींना नाकपुड्यातून भळाभळा रक्तस्राव होतो (विशेष उन्हाळ्यात), ३) रात्री वारंवार लघवी करण्याकरता उठावे लागते. ४) अंजायना पेक्‍टोरिस (म्हणजे चालताना छातीत भरून येणे), चालताना किंवा नेहमी करीत असणारे श्रम करताना दम लागणे (श्‍वास घेताना अधिक श्रम पडत आहेत याची जाणीव होणे), अर्धांगवायूचे तात्कालिक किंवा कायमचे झटके येणे आणि अंगावर (विशेषतः पायावर घोट्याजवळ) सूज येणे.

रक्तदाब कधी कधी झपाट्याने वाढू शकतो. याला झपाट्याने वाढणारा (ॲक्‍सिलरेटेड) किंवा घातक (मॅलिग्रंट) रक्तदाब म्हणतात. अशा रुग्णाचे अहोरात्र डोके दुखते. नजरेवर दुष्परिणाम होतो, फिटस्‌ (झटके) येतात. आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार करणे आवश्‍यक असते.

रक्तदाब का वाढतो हे जरी कळणे कठीण असले तरी आनुवंशिकता हा एक महत्त्वाचा भाग असतो. वाढलेले वजन, सातत्याने अतिरेकाने मद्यपान करणे हेदेखील दखलपात्र मुद्दे असतात. आहारात तेला-तुपाचे प्रमाण अतिरेकी असणे. मिठाचे सेवन अनावश्‍यक पातळीवर जास्त असणे, सतत चिंतातुरता, अतिरेकी तणाव या सगळ्यांनी काही काळ का होईना, पण रक्तदाब वाढू शकतो. मूत्रपिंडांचे विकार, अंतर्ग्रंथीच्या स्रावांचे आजार, जन्मजात महारोहिणी एखाद्या ठिकाणी अरुंद असणे, गर्भवती स्त्रीला एक्‍लाम्पशिया नावाचा विकार जडणे आणि झोपेत घोरणाऱ्या व्यक्तीचा मधूनच श्‍वास रोखणे ही काही दुरुस्त करण्यासारखी कारणे होत.

रक्तदाब वारंवार (किमान तीन महिन्यांतून एक वेळा) तपासून घ्यावा व सातत्याने वाढलेला (१३५/९५ किंवा जास्त) असला तर उपचार सुरू करावेत, यातच भलेपणा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor dr. h. v. sardesai article blood pressure