प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 8 December 2017

गेल्या ५-६ वर्षांपासून माझ्या चेहऱ्यावर काळे डाग आहेत. मला इतर कुठलाही आजार किंवा त्रास नाही. तरी कृपया त्वचा पूर्ववत होण्यासाठी आयुर्वेदिक उपचार सुचवावेत. माझे वय ५३ वर्षे आहे. .... श्रीमती रजनी लढ्ढा 

गेल्या ५-६ वर्षांपासून माझ्या चेहऱ्यावर काळे डाग आहेत. मला इतर कुठलाही आजार किंवा त्रास नाही. तरी कृपया त्वचा पूर्ववत होण्यासाठी आयुर्वेदिक उपचार सुचवावेत. माझे वय ५३ वर्षे आहे. .... श्रीमती रजनी लढ्ढा 

उत्तर - चेहऱ्यावर किंवा एकंदर त्वचेवर काळपटपणा येणे हे रक्‍तात अशुद्धी वाढल्याचे एक लक्षण असते. स्त्रियांच्या बाबतीत याचा संबंध स्त्रीअसंतुलनाशी असू शकतो. या दोन्हींवर उत्तम उपचार म्हणजे शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म करून घेणे. रक्‍तशुद्धी करणाऱ्या औषधांनी संस्कारित तुपाचे स्नेहपान, अभ्यंग, स्वेदन वगैरे करून विरेचन आणि नंतर रक्‍तशुद्धीकर, वर्ण्य बस्तींची योजना करण्याचा उपयोग होईल. तत्पूर्वी रोज दिवसातून दोन वेळा अगोदर चेहरा साध्या पाण्याने धुऊन नंतर ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ जिरवणे, चेहऱ्याला साबणाऐवजी उटणे किंवा ‘सॅन मसाज पावडर’ आणि मसूरच्या पिठाचे समभाग मिश्रण लावणे हेसुद्धा चांगले. रोज सकाळी मुखशुद्धीच्या आधी किंवा नंतर ‘संतुलन सुमुख तेला’चा गंडुष करणे, वैद्यांच्या सल्ल्याने ‘संतुलन सुमुख पित्त तेल’ वापरणे हे सुद्धा चेहऱ्याच्या नितळ, तेजस्वी कांती साठी उत्तम गुणकारी असते. पंचतिक्‍त घृत, ‘मंजिष्ठासॅन गोळ्या’, महामंजिष्ठादी काढा घेण्याचाही उपयोग होईल. स्त्री संतुलनासाठी ‘फेमिसॅन सिद्ध तेला’चा पिचू वापरणे, शतावरी कल्प, ‘संतुलन अनंत कल्प’ घेणे हेसुद्धा उपयोगी पडेल.  

मला बऱ्याच वर्षांपासून डोके दुखण्याचा त्रास आहे. पूर्वी दर दोन आठवड्यातून एकदा त्रास होत असे, आता दर ८-१० दिवसातून एकदा होतो. बऱ्याचदा आठवड्याच्या सुटीच्या दुसऱ्या दिवशी डोके दुखते. बाम लावला किंवा वेदनाशामक गोळी घेतली की तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते. झोपेमध्ये हातांना अनेकदा मुंग्या येतात. कृपया मार्गदर्शन करावे. 
....श्री. राजेंद्र कुलकर्णी
उत्तर -
बऱ्याचदा सुटीच्या दुसऱ्या दिवशी डोके दुखते, त्यामागे सुटीच्या दिवशी दुपारी झोपणे हे एक कारण असू शकते. कारण, दुपारी झोपण्याने शरीरातील पित्त व कफ दोष वाढतात. एरवीसुद्धा रात्री वेळेवर झोपणे, ७-८ तासांची पुरेशी झोप घेऊन सकाळी लवकर उठणे, दुपारी फार तर १० मिनिटांसाठी बसल्या बसल्या एखादी डुलकी घेणे हे चांगले. डोकेदुखीवर नियमित पादाभ्यंग करणे, रोजच्या आहारात ६-८ चमचे साजूक तुपाचा समावेश करणे, रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल चूर्ण’ किंवा अविपत्तिकर चूर्ण घेणे, नाकात साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे २-३ थेंब टाकणे या उपायांचा उपयोग होताना दिसतो. रोज सकाळी चमचाभर गुलकंद घेण्याचा तसेच सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेण्याचाही फायदा होईल. हातांना मुंग्या येतात त्यासाठी झोपण्यापूर्वी मानेला तसेच हातांना अनुक्रमे ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ आणि ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ हलक्‍या हाताने जिरवण्याने बरे वाटेल. 

माझ्या पत्नीला थायरॉईड तसेच दम्याचा त्रास आहे. त्यासाठी गोळी व इनहेलर वापरणे चालू आहे. मात्र, हवेत थंडावा असला की तिच्या हातापायांच्या पंज्यात व पोटरीमध्ये गोळे येतात, गोळा येतो तेथे एकदम आवळल्यासारखे होते आणि त्या ठिकाणी स्पर्शही सहन होत नाही. विशेषतः निरंकार उपवासाच्या दिवशी रात्री फार वेळ गोळे येत राहतात. गुडघे व टाचाही गेल्या सहा महिन्यांपासून दुखत आहेत. कृपया उपाय सुचवावा. ... श्री. सुरेश अग्रवाल 

उत्तर - गोळे येणे, गुडघेदुखी, टाचदुखी ही सर्व शरीरात वात वाढण्याची लक्षणे आहेत. उपवासामुळे दिवसभर काही खाल्ले नाही की त्यामुळे या वातामध्ये अजूनच भर पडते व त्यामुळे अधिकच त्रास होतो. मुळात उपवासामध्ये दुपारी एक वेळ जेवून, सकाळी व रात्री लंघन करणे हितावह असते. दिवसभर काही न खाणे प्रत्येक प्रकृतीला सोसवेलच असे नाही. याप्रकारे गोळा येऊच नये यासाठी रोज सकाळी खारीक पूड घालून उकळलेले दूध घेण्याचा उपयोग होईल. अंगाला नियमित अभ्यंग, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी पायांना व पोटऱ्यांना ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेला’सारखे तेल लावण्याचा उपयोग होईल. नियमित पादाभ्यंग करण्याने गोळे येणे तसेच टाच दुखणे, हे दोन्ही त्रास कमी होतील. गुडघेदुखीसाठी ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावणे, वरून निर्गुडी किंवा एरंडाच्या पानांनी शेक करणे, सिंहनाद गुग्गुळ, ‘संतुलन वातबल गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे थायरॉईड, दम्याचा त्रास फक्‍त नियंत्रणात ठेवण्याऐवजी तो बरा करण्यासाठी  वैद्यांच्या सल्ल्याने योग्य औषधे सुरू करणे, साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरणे श्रेयस्कर होय. 

माझा नातू चार वर्षे दहा महिन्यांचा आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याला एक दिवसाआड शौचाला होते व त्या वेळी तो वेदनांमुळे मोठ्याने रडतो. इतर वेळी तो अगदी व्यवस्थित असतो. डॉक्‍टरांनी फिशर असे निदान करून औषधे दिली, पण ती लागू पडली नाहीत. कृपया आपण उपाय सुचवावा. ...श्री. विजय कुलकर्णी 

उत्तर - एक दिवसाआड शौचाला होणे तसेच गुदभागी फिशर होणे हे पोटात कोरडेपणा व उष्णता असल्याचे लक्षण आहे. तेव्हा नातवाच्या खाण्यात फार कोरडे पदार्थ येत नाहीत याकडे लक्ष द्यायला हवे. दिवसातून चार वेळा मऊ वरण-भात, खिचडी, दूध-भात वगैरे पदार्थांचा अंतर्भाव असावा, दिवसातून २-३ चमचे साजूक तूप, एक चमचाभर लोणी-साखर पोटात जाईल, असे पाहावे. फिशर आहे तेथे दिवसातून २-३ वेळा शतधौतघृत किंवा जात्यादी घृत किंवा व्रणरोपण तेल लावण्याचा उपयोग होईल. ५-६ मनुका, कोळून घेतलेले पाणी पिण्याचा तसेच एक सुकलेले अंजीर पाण्यात भिजत घालून ते खाण्याचा उपयोग होईल. पचन सुधारावे, आतड्यातील उष्णता, रुक्षता कमी व्हावी यासाठी सकाळ-संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याचाही फायदा होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer