गरोदरपणातील मधुमेह 

gestational diabetes
gestational diabetes

गर्भारपणात अचानक तिला काही त्रास सुरू होतो आणि तपासणीत रक्तातील साखरेची पातळी वाढलेली दिसते. हा जेस्टेशनल डायबेटिस गरोदरपणात होतो. सहसा गरोदरपणाच्या दुसऱ्या टप्प्यात (दुसऱ्या तिमाहीत) हा मधुमेह होतो. बाळाला जन्म दिल्यानंतर बहुतेकदा हा मधुमेह राहात नाही. 

अनेकदा गर्भार असताना स्त्रीला मधुमेह झाल्याचे लक्षात येते. म्हणजे असे की, गरोदर राहण्यापूर्वी तिला मधुमेह नसतो. पण गर्भारपणात अचानक तिला काही त्रास सुरू होतो आणि तपासणीत रक्तातील साखरेची पातळी वाढलेली दिसते. हा जेस्टेशनल डायबेटिस गरोदरपणात होतो. जेस्टेशनल डायबेटिस हा सध्या मधुमेहाचा सर्वाधिक वेगाने वाढणारा प्रकार आहे. जेस्टेशनल डायबेटिस म्हणजे केवळ गरोदरपणात रक्तातील साखरेची पातळी वाढते ती अवस्था होय. बाळाला जन्म दिल्यानंतर बहुतेकदा हा मधुमेह राहात नाही. गरोदरपणात स्त्रीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवणारे हार्मोन्स वारेमार्फत निर्माण केले जातात. सहसा गरोदर स्त्रीचे स्वादुपिंड या अतिरिक्त साखरेवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक तेवढे इन्शुलिन निर्माण करते. मात्र, स्वादुपिंडाने पुरेसे इन्शुलिन निर्माण केले नाही, तर रक्तातील साखरेची पातळी वाढलेली राहते आणि जेस्टेशनल डायबेटिस होतो. 

सहसा गरोदरपणाच्या दुसऱ्या टप्प्यात (दुसऱ्या तिमाहीत) हा मधुमेह होतो. गरोदर स्त्रीला मधुमेह झाला आहे का, याची तपासणी स्त्रीरोगतज्ज्ञ गरोदरपणाच्या चौविसाव्या ते अठ्ठाविसाव्या आठवड्यादरम्यान करतात. स्त्रीला मधुमेहाचा धोका अधिक असेल तर डॉक्टर यापूर्वीही चाचणी करवून घेऊ शकतात. गरोदरपणात कोणत्याही स्त्रीला मधुमेह होऊ शकतो. पण पुढील परिस्थितीतील स्त्रियांना हा धोका अधिक असतो : 

· बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ३०हून अधिक असेल तर 

· यापूर्वीच्या गरोदरपणात जेस्टेशनल डायबेटिस झाला असेल तर 

· आई-वडिलांपैकी एकाला किंवा भावंडांना मधुमेह असेल तर 

· वय ३५ वर्षांहून अधिक असेल तर 

· पॉलीसिस्टिक ओव्हरीअन सिंड्रोम (पीसीओएस) असेल तर 

जेस्टेशनल डायबेटिस असलेल्या स्त्रियांमध्ये सहसा काही लक्षणे आढळत नाहीत. गरोदरपणात केल्या जाणाऱ्या नेहमींच्या चाचण्यांतूनच बहुतेकींना हे कळते. ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (ओजीटीटी) करून जेस्टेशनल डायबेटिसचे निदान केले जाते. जेस्टेशनल डायबेटिसची चाचणी करण्यासाठी स्त्रीला साखरयुक्त/ग्लुकोजयुक्त पाणी प्यावे लागते. यामुळे स्त्रीच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. एक तासानंतर रक्ताची चाचणी करून वाढलेल्या साखरेच्या पातळीचा सामना तिच्या शरीराने कसा केला हे तपासले जाते. जर रक्तातील साखरेचे प्रमाण विशिष्ट मर्यादेहून अधिक (१३० मिलिग्रॅम/डीएल किंवा अधिक) आहे असे लक्षात आल्यास स्त्रीला एचबीएवनसी ही तीन महिन्यांतील सरासरी साखर तपासणारी चाचणी करवून घेण्यास सांगितले जाते. 

जेस्टेशनल डायबेटिस असलेल्या बहुतेक स्त्रिया निरोगी बाळांना जन्म देतात. मात्र, जेस्टेशनल डायबेटिसचे व्यवस्थापन काळजीपूर्वक केले नाही, तर रक्तातील साखरेची पातळी अमर्याद वाढू शकते आणि त्यातून आई व बाळ दोघांसाठी समस्या निर्माण होतात. गरोदर स्त्रीला जेस्टेशनल डायबेटिस असेल, तर तिच्या बाळाला पुढील धोके संभवतात : जन्मत: अतिरिक्त वजन, मुदतपूर्व जन्म आणि रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, उच्च रक्तदाब (प्रीक्लॅम्पशिया). 

जेस्टेशनल डायबेटिस असलेल्या स्त्रियांनी वारंवार रक्तातील साखर तपासणे आवश्यक असते. म्हणजे डॉक्टर त्यांना योग्य पातळी राखण्याबद्दल आणि गरोदरपणात मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याबद्दल सल्ला देऊ शकतात. रक्तातील साखरेवर गरोदरपणाचा परिणाम होतोच. गरोदर स्त्री काय खाते-पिते, ती किती व्यायाम करते यावर ही पातळी अवलंबून असते. तिच्या आहारात बदल सुचवले जाऊ शकतात किंवा तिला आणखी क्रियाशील राहण्याचा सल्ला दिला जातो. तिला इन्शुलिन किंवा औषधेही दिली जाऊ शकतात. 

जेस्टेशनल डायबेटिस नसलेल्या गरोदर स्त्रीच्या रक्तातील साखरेची पातळी जेवढी असेल तेवढीच पातळी जेस्टेशनल डायबेटिस असलेल्या स्त्रीची राहावी यासाठी उपचार केले जातात. गरोदरपणात जेस्टेशनल डायबेटिस झालेल्या स्त्रियांना पुढे दिल्याप्रमाणे काही उद्दिष्टे निश्चित करून दिली जातात. 

- फास्टिंग ब्लड शुगर (एफबीएस) 

उत्तम <९० एमजी/डीएल 

चांगली <९५ एमजी/डीएल 

ठीक <१०० एमजी/डीएल 

- पोस्ट प्रॅण्डियल ब्लड शुगर (पीपीबीएस) 

उत्तम <१२० एमजी/डीएल 

चांगली <१३० एमजी/डीएल 

ठीक <१४०एमजी/डीएल 

- एचबीएवनसी (३ महिन्यांतील सरासरी पातळी) 

उत्तम <५.८% 

चांगली <६.० % 

ठीक <६.४% 

जेस्टेशनल डायबेटिस बहुतेकदा निरोगी आहार व नियमित शारीरिक व्यायामाच्या मदतीने आटोक्यात राखता येतो. मात्र, काही स्त्रियांना औषधे (मेटफोर्मिन) किंवा इन्शुलिन इंजेक्शन्स घेऊन जेस्टेशनल डायबेटिस नियंत्रणात ठेवावा लागतो. जेस्टेशनल डायबेटिस आटोक्यात ठेवण्यासाठी संबंधित स्त्रीला दररोज तीन वेळा नियमित जेवण घ्यावे लागते तर दोन ते तीनवेळा हलका आहार (स्नॅक्स) घ्यावा लागतो. रात्री एकदा जेवावे लागते. आरोग्यपूर्ण आहाराच्या नियोजनात आहारतज्ज्ञ मदत करू शकतात. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे व्यायाम. व्यायाम आहाराला पूरक ठरतो. नियमित व्यायाम केल्यास तुमच्या शरीरातील साखर अतिरिक्त इन्शुलिनशिवाय वापरली जाते. यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्सचा सामना करण्यातही व्यायाम उपयुक्त ठरतो. म्हणूनच मधुमेहींनी व्यायाम नियमित करणे आवश्यक असते. मात्र, डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणताही व्यायाम सुरू करू नका. डॉक्टरांना विचारून तुम्ही नियमित व्यायाम करू शकता आणि गरोदरपणानंतरही तो सुरू ठेवू शकता. गरोदरपणात सुरक्षित असलेल्या व्यायामाबद्दल डॉक्टरांशी बोला. चालणे, योगासने व अन्य शारीरिक व्यायाम त्यांना विचारून करा. 

गरोदरपणात शरीराला ऊर्जेचे रूपांतर करणे आवश्यक होत असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी-जास्त होऊ शकते. घरी वापरता येण्याजोग्या साधनांनी रक्तातील ग्लुकोजवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. जेस्टेशनल डायबेटिसमुळे वाढलेली तुमच्या रक्तातील साखरेची पातळी मर्यादेत आहे की नाही हे तपासत राहा. यामुळे योग्य ते उपचार केले जाऊ शकतात आणि डॉक्टरांना गरज वाटल्यास त्यात बदलही करता येतो. 

जेस्टेशनल डायबेटिसच्या व्यवस्थापनामध्ये आरोग्यकारक आहाराचे नियोजन व शारीरिक व्यायाम यांचा समावेश होतो. तुमचा आहार व शारीरिक व्यायाम रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात राखण्यासाठी पुरेसे ठरत नसतील, तर इन्शुलिन किंवा औषधे घेण्याची गरज भासू शकते. 

बाळ जन्माला आल्यानंतर जेस्टेशनल डायबेटिस सहसा नाहीसा होतो. बाळंतपणानंतर सहा आठवड्यांनी एकदा रक्तातील साखर तपासून (ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट) रक्तातील साखरेची पातळी सामान्य झाली आहे याची खातरजमा करता येते. अर्थात, जेस्टेशनल डायबेटिस झालेल्या स्त्रियांना पुढील आयुष्यात टाइप टू मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. त्यांनी किमान दर दोन-तीन वर्षांनी मधुमेहाची चाचणी करून घेणे आवश्यक असते. 

बाळंतपणानंतर रक्तातील साखरेची पातळी सहसा सामान्य होते. मात्र, जेस्टेशनल डायबेटिस झालेल्या स्त्रीला टाइप टू मधुमेहाचा धोका असतो. जेस्टेशनल डायबेटिस झालेल्यांपैकी एक तृतीयांश स्त्रियांना बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच मधुमेह किंवा सौम्य स्वरूपात रक्तातील साखर वाढण्याची समस्या जाणवते. जेस्टेशनल डायबेटिस झालेल्यांपैकी १५ ते ७० टक्के स्त्रियांना पुढील आयुष्यात मधुमेह होण्याची शक्यता असते. 

रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात ठेवल्यास बाळाचा जन्म सहज होतो आणि बाळ निरोगी जन्माला येते. गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांकडून तपासून घेणेही कधीही उत्तम असते, कारण, डॉक्टर तुमच्या एकंदर गरोदरपणातील स्वास्थ्यासोबत जेस्टेशनल डायबेटिसच्या शक्यतेचे मूल्यांकनही करू शकतात. एकदा का तुम्हाला गर्भधारणा झाली की गरोदरपणात काळजी घेण्याचा भाग म्हणून डॉक्टर तुम्हाला जेस्टेशनल डायबेटिससाठी चाचणी करायला सांगतात. स्थूल स्त्रिया गर्भधारणेपूर्वी अतिरिक्त वजन कमी करून जेस्टेशनल डायबेटिसची शक्यता कमी करू शकतात. गर्भधारणेपूर्वी व गरोदरपणात शारीरिक व्यायाम करणे जेस्टेशनल डायबेटिस टाळण्यासाठी चांगले समजले जाते. आरोग्यपूर्ण आहार घ्या. सॅच्युरेटेड फॅट्सचे आहारातील प्रमाण मर्यादित ठेवा. भरपूर भाज्या, कडधान्ये, फळे व होलग्रेन समाविष्ट असलेला आहार घ्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com