esakal | #FamilyDoctor जिवंत नारळ
sakal

बोलून बातमी शोधा

#FamilyDoctor जिवंत नारळ

नारळाचे झाड बहुगुणी आहे. भारतीय समाजात श्रीफळाला कुटुंबातील एक व्यक्‍ती किंवा समाजातील प्रतिष्ठित अस्तित्व असे स्थान मिळालेले आहे. शुभ म्हणून नारळ घरात ठेवणे ही भारतीय संस्कृतीतील एक चांगली पद्धत आहे. 

#FamilyDoctor जिवंत नारळ

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

पाणी हेच जीवन, हे पाणी नारळात असल्यामुळे नारळ जिवंत समजले जाते आणि म्हणून त्याला श्रीफळही म्हटले जाते. श्रीफळ (नारळ) देऊन एखाद्याच्या कार्याचा गौरव-सन्मान केला तर तो सर्वात मोठा. एखाद्याला काहीतरी वस्त्र, शाल, अगदी चांदीचे ताट द्यायचे असले तरी त्याच्याबरोबरीने हळद-कुंकू लावून श्रीफळ दिले नाही तर तो सत्कार भारतीय संस्कृतीनुसार सत्कार समजला जात नाही, ती एक भेट होते. श्रीफळ दिल्याशिवाय भेट देण्यामागे असलेला आदर व्यक्‍त होत नाही. श्रीफळाचे महत्त्व खूपच आहे. भारतीय समाजात तर श्रीफळाला कुटुंबातील एक व्यक्‍ती किंवा समाजातील प्रतिष्ठित अस्तित्व असे स्थान मिळालेले आहे. नारळाच्या झाडाचा उल्लेख बऱ्याच वेळा ‘नुसताच ताडामाडासारखा वाढला आहेस, पण अक्कल काडीचीही नाही’ असा तुच्छतेने केला जातो. पण नारळाचा उल्लेख मात्र तुच्छतेने कधीच केला जात नाही. अर्थात त्यामागची भावना बरोबर नसली व एखाद्याला काढून टाकायचे असेल तर तोच नारळ उलटा करून देत असताना ‘त्याला एकदा नारळ द्या’ असा वाक्‍प्रचार वापरला जातो, पण तो क्वचितच. पूजेला नारळ लागतो, एखाद्या अदृश्‍य शक्‍तीशी संभाषण सुरू करण्यापूर्वी किंवा त्या शक्‍तीला संतुष्ट करण्यासाठी नारळ द्यायची पद्धत असते. 

नारळी पौर्णिमा लवकरच येत आहे. समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेच्या दिवशी पूजा करून नारळच अर्पण केला जातो. एखाद्या नव्या वास्तूचे, वस्तूचे, यंत्राचे किंवा एखादा मोठ्या प्रोजेक्‍टचे उद्‌घाटन असल्यास नारळ द्यावा लागतो व वाढवावा लागतोच. ‘नारळ फोडावा’ असा वाक्‍प्रचार केला जात नाही, तर ‘नारळ वाढवावा’ असेच म्हटले जाते, ते याच कारणामुळे. नारळ नुसताच भौतिक पातळीवर उपयोगी ठरणारा नव्हे तर मानसिक व आध्यात्मिक पातळीवरही उपयोगी पडतो. नारळ हा भारतीय संस्कृतीत इतका खोलवर रुजलेला आहे की लिहिता वाचता येत नसलेल्या, अत्यंत मागासलेल्या व शिक्षण न मिळालेल्या अवस्थेत राहणाऱ्यांनाही नारळ उपयोगाचा वाटतो. 

साधारण नारळ हे समुद्रकिनाऱ्यावर येणारे पीक. समुद्राची खारी हवा, खारी जमीन व मुळाशी घातलेले मीठ नारळाला मानवते. अशी सर्व खारी उष्णता पचवून नंतर जे खोबरे तयार होते ते मात्र शीत गुणाचे असते. नारळात असलेले पाणी त्याहूनही शीत गुणाचे असते. उन्हातान्हातून परत आल्यावर उष्णता बाधू नये किंवा खाल्लेल्या एखाद्या पदार्थाचे उष्णवीर्य बाधू नये म्हणून नारळाचे पाणी अप्रतिम औषध समजले जाते. असे म्हणतात की, संपूर्ण प्रतिसृष्टी निर्माण करण्याच्या ईर्ष्येपायी ‘मी एक मनुष्य तयार करीन’ असे प्रयोग केले त्यातून तयार झाले नारळाचे झाड. 

मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीमध्ये एक मोठा फरक असा दिसून येतो की त्याचा मेरुदंड जमिनीशी काटकोनात असून आकाशाकडे सरळ उभा असतो. इतर सर्व प्राण्यांचा मेरुदंड जमिनीला समांतर असतो. हे माणसाचे विशेषत्व आहे. मेरुदंडाच्या वर असते डोके. नारळाचे झाडाचे खोड म्हणजे मणके एकमेकांवर ठेवून तयार झालेला जणू मेरुंदड आणि त्याच्यावर येणारे नारळ हे जणू डोके, ही कल्पना अतिशय सुंदर व चपखल वाटते. डोक्‍यामध्ये कवटीच्या आत मेंदू व विशिष्ट पाणी असते तसेच नारळाच्या कवटीच्या आत खोबरे व पाणी असते. नारळालाही केस व डोळे असतात. म्हणूनच माणसाशी अत्यंत साधर्म्य असणारा वा प्रतीक वाटणारा असा हा नारळ वा श्रीफळ.

कुणाला भेटवस्तू द्यायची झाल्यास जगातील सर्वात मोठी भेट म्हणजे नारळ, कारण नारळ हा माणसाच्या अहंकाराचे प्रतीक ठरतो. दुसऱ्यासमोर शरण जाण्यासाठी आपण मस्तक नमवतो, तसेच आपण ज्याच्या हातात नारळ ठेवून पायावर डोके ठेवतो म्हणजे आपले डोके त्याच्या हातात देऊन त्याच्या ठिकाणी संपूर्णतः शरण आहे हे दर्शविले जाते. ज्याच्यासमोर आपण नारळ वाढवतो म्हणजे अहंकाराचा पूर्ण नाश करून, सांडलेल्या अहंकाराची भेट देऊन त्याच्यापायी आपण संपूर्णतः नतमस्तक आहे असे दाखविले जाते. म्हणून कुणाचा सत्कार करताना वा देवाला देताना मनुष्याच्या अहंकाराचे प्रतीक म्हणून नारळाचा उपयोग केलेला असतो. नारळात पाणी असल्यामुळे म्हणा किंवा निसर्गाची योजना म्हणा, नारळावर प्रक्षेपित केलेल्या इच्छा टिकून राहतात असे म्हटले जाते. शुभ म्हणून नारळ घरात ठेवणे ही भारतीय संस्कृतीतील एक चांगली पद्धत आहे असे दिसते. 

नारळ पूर्ण तयार होण्यापूर्वी हिरवी शहाळी वर्षभर सर्वांना गोड व थंड पाणी तर देतातच, पण आतील मलईसारखे खोबरे म्हणजे तर स्वर्गीय आनंदच. सर्व प्रकारे खोबऱ्याचे तर अनेक उपयोग आहेतच. खोबऱ्यापासून निघणाऱ्या तेलावर आयुर्वेदीय संस्कार केल्यावर ते मालिशसाठी किंवा केशवर्धनासाठी अत्यंत उपयोगी असते. ओल्या नारळाचे दूध काढून केसाला लावल्यास केस वाढायला मदत होते, हेच दूध चेहऱ्याला लावले तर चेहऱ्याच्या त्वचेला वर्ण्य ठरते. खोबऱ्याचा रोजच्या स्वयंपाकात वापर केलेलाच असतो. नारळापासून खोबरेपाक, नारळीभात वगैरे पक्वान्नेही करता येतात. साबुदाण्याची खिचडी, पोहे वगैरे देताना त्यावर ओल्या नारळाचा कीस टाकला नाही तर गरम बटाटे-पोह्यांची मजाच काय? समुद्रकिनाऱ्यालगतच्या ठिकाणी जेथे दुधाची कमतरता असते तेथे नारळाचे दूध काढून काम चालवले जाते. अशा तऱ्हेने नारळाचे झाड बहुगुणी आहे. हे झाड समुद्रकिनारी लावल्यानंतर त्याचा विस्तार वर गेलेला असल्यामुळे खालचा समुद्र तर नीट दिसतो व झाडामुळे किनाऱ्याला शोभा येते.