esakal | रजोनिवृत्ती हा निसर्गनियम
sakal

बोलून बातमी शोधा

रजोनिवृत्ती हा निसर्गनियम

रजोनिवृत्ती स्त्रीच्या आयुष्यातली स्वाभाविक घटना असली, तरी ती योग्य वेळेलाच यावी व त्यादरम्यान स्त्रीला त्रास होऊ नये, याकडे लक्ष ठेवायला हवे. रजोनिवृत्ती ही नैसर्गिक अवस्था असल्यामुळे त्यामुळे त्रास होतोच, असे नाही. होत असलेल्या बदलांना जर शारीरिकदृष्ट्या मदत मिळू शकली आणि मानसिकरीत्या स्वीकारण्याची तयारी ठेवली, तरी रजोनिवृत्तीतील त्रासांपासून दूर राहता येणे अवघड नाही.

रजोनिवृत्ती हा निसर्गनियम

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

रजोनिवृत्ती स्त्रीच्या आयुष्यातली स्वाभाविक घटना असली, तरी ती योग्य वेळेलाच यावी व त्यादरम्यान स्त्रीला त्रास होऊ नये, याकडे लक्ष ठेवायला हवे. रजोनिवृत्ती ही नैसर्गिक अवस्था असल्यामुळे त्यामुळे त्रास होतोच, असे नाही. होत असलेल्या बदलांना जर शारीरिकदृष्ट्या मदत मिळू शकली आणि मानसिकरीत्या स्वीकारण्याची तयारी ठेवली, तरी रजोनिवृत्तीतील त्रासांपासून दूर राहता येणे अवघड नाही. 

कोणताही बदल स्वीकारणे हे तितकेसे सोपे नसते. स्त्रीच्या शरीरात वयोपरत्वे किंवा निसर्गनियमांनुसार अनेक बदल होत असतात. यापैकी एक महत्त्वाचा आणि स्वीकारायला सर्वांत अवघड बदल म्हणजे रजोनिवृत्ती अथवा मेनोपॉझ.

स्त्रीशरीरात रसधातूला खूप महत्त्व असते. रसधातू हा संपूर्ण शरीराचे प्रसादन करणारा असतो, सर्व शरीरावयवांना तृप्त करण्याची जबाबदारी रसधातूवर असते आणि अशा रसधातूचा उपधातू असणाऱ्या रजावर गर्भधारणा झाली, तर गर्भाचे पोषण करण्याची जबाबदारी असते, मात्र गर्भधारणा झाली नाही, तर हे रज ‘मल’ म्हणून शरीराबाहेर टाकले जाते. आयुर्वेदात या संबंधात पुढीलप्रमाणे सांगितले आहे, 

मासि मासि रजः स्त्रीणां रसजं स्रवति त्र्यहम्‌ ।
वत्सराद्‌ द्वादशात्‌ ऊर्ध्वं याति पञ्चाशतः क्षयम्‌ ।।
...अष्टांग हृदय शारीरस्थान

प्रत्येक महिन्याला रसधातूपासून तयार होणारे रज स्त्रीशरीरातून तीन दिवसांपर्यंत स्रवत असते. ही क्रिया साधारण १२व्या वर्षांपासून सुरू होते व पन्नाशीनंतर थांबते. फक्‍त गर्भधारणा झाली की या चक्रामध्ये खंड पडतो. ‘रज’ हा रसधातूचा उपधातू असल्याने स्त्रीचा रसधातू व मासिक पाळी यांचा खूप जवळचा संबंध असतो. रसधातू जितका चांगला, जितका संपन्न, तितकी मासिक पाळी व्यवस्थित व नियमित असते. मात्र, वयानुरूप शरीरात वात वाढायला लागला, की त्यामुळे रसधातूची संपन्नता कमी कमी होत जाते आणि त्यातूनच रजोनिवृत्तीची सुरुवात होते. 

वयानुसार रजोनिवृत्ती येणे स्वाभाविक असते, हे समजते. वयानुरूप रसधातूची संपन्नता कमी होणेही स्वाभाविक असते, पण जर रसधातू प्रमाणापेक्षा कमी झाला, रसक्षय म्हणता येईल इतक्‍या अवस्थेपर्यंत पोचला, तर रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीला अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. आयुर्वेदाने रसक्षयाची म्हणूून सांगितलेली लक्षणे रजोनिवृत्तीच्या काळात उद्भवू शकतात. 

रसे रौक्ष्यं श्रमः शोषो ग्लानि शब्दासहिष्णुता ।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान

    शरीरात कोरडेपणा वाढतो म्हणजे त्वचा, केस, डोळे, योनी वगैरे ठिकाणी कोरडेपणा जाणवू लागतो.
    फारसे श्रम झाले नाहीत तरी खूप थकवा जाणवतो.
    मुख, घसा, जिभेला शोष पडतो. 
    शरीराला ग्लानी येते, उत्साह वाटत नाही. 
    आवाज सहन होईनासा होतो.. 
    अकारण धडधड होते.
    मन अस्वस्थ होते, शून्यता अनुभूत होते. 


याखेरीज एकाएकी वजन वाढणे किंवा कमी होणे हेही रसधातूशी संबंधित असल्याने रजोनिवृत्तीच्या दरम्यान वजन वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. तसेच, मासिक पाळीमध्ये एकाएकी बदल होणे उदा. दोन मासिक पाळीतील अंतर कमी होणे वा वाढणे, रक्‍तस्राव अतिप्रमाणात होणे किंवा बरेच दिवस होत राहणे, पाण्यासारखा वा पांढरा स्राव होणे यांसारखी लक्षणेही रजोनिवृत्तीच्या काळात निर्माण होऊ शकतात. एकाएकी गरम होणे (हॉट फ्लशेस्‌), घाम फुटणे, असाही त्रास काही स्त्रियांमध्ये होताना दिसतो. 

खरे तर रजोनिवृत्ती ही नैसर्गिक अवस्था असल्यामुळे त्यामुळे त्रास होतोच असे नाही. होत असलेल्या बदलांना जर शारीरिकदृष्ट्या मदत मिळू शकली आणि मानसिकरीत्या स्वीकारण्याची तयारी ठेवली, तरी रजोनिवृत्तीतील त्रासांपासून दूर राहता येणे अवघड नाही. 

रजोनिवृत्तीचा त्रास व्हायला नको असेल, तर मुळात रसधातूची सुरुवातीपासून काळजी घ्यायला हवी. तरुण वयातच रसधातू अशक्‍त असला, तर वयानुरूप संपन्नता कमी होण्याच्या काळात म्हणजेच रजोनिवृत्तीच्या काळात रसक्षय होतो आणि मग रजोनिवृत्ती त्रासदायक ठरू शकते. रसधातूची काळजी घेण्याबरोबरच वय वाढले, तरी त्यामुळे वाढणारा वात शक्‍य तेवढा संतुलित राहील, याकडे लक्ष ठेवायला हवे. स्त्रीविशिष्ट अवयव सुरुवातीपासूनच व्यवस्थित कार्यक्षम राहण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. हे सर्व साध्य होण्यासाठी साधे व सहज करता येण्यासारखे उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतात - 

सुरुवातीपासून पाळी व्यवस्थित येण्याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. कारण यामुळे रसधातू व्यवस्थित काम करतो आहे, हे समजू शकते. 

आहारात रसपोषक पदार्थांचा उदा. साळीच्या लाह्या, दूध, प्रकृतीनुरूप फळांचे रस वगैरेंचा समावेश करणे. 

नियमित अभ्यंग करणे. आहारासह साजूक तूप पुरेशा प्रमाणात सेवन करणे. यामुळे शरीरातील अग्नीही संतुलित राहू शकतो, वातही नियंत्रित राहतो.  हाडे मजबूत राहण्यासाठी दूध, डिंकाचे लाडू, खारीक, खसखस यांचे नियमित सेवन करणे.

    स्त्रीविशिष्ट अवयवांची काळजी घेण्याच्या दृष्टीने योनिपिचू, योनिधूप, अधून मधून कुमारी आसव, अशोकारिष्ट वगैरे औषधांचे सेवन करणे.

    रसधातू, शुक्रधातू, तसेच एकंदरच स्त्रीप्रजननसंस्था निरोगी व कार्यक्षम राहण्यासाठी शतावरी कल्प, धात्री रसायन, ‘सॅन रोझ’सारख्या रसायनांचे सेवन करणे. 

    वाताचे, अग्नीचे संतुलन होण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने व प्राणायाम करणे, सर्वसामान्यांना दैनंदिन आचरणासाठी व आरोग्यावर लक्ष ठेवून विकसित केलेल्या संतुलन क्रिया योगपैकी  ‘संतुलन फुलपाखरू’ क्रिया, समर्पण, सूर्यनमस्कार या क्रिया सुचविता येतील.

    रस, अग्नी हे शरीरातील अतिशय संवेदनशील घटक असल्याने त्यांच्यावर मानसिकतेचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असतो. दुःख झाले की भूक लागत नाही किंवा खूप मानसिक ताण आला, तर चेहरा काळवंडतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात याचा प्रत्यक्षात अनेकदा प्रत्यय येत असतो. आयुर्वेदात अतिचिंता हे रसक्षयाचे एक मुख्य कारण सांगितले आहे. म्हणूनच मनाची प्रसन्नतासुद्धा रसधातू संपन्न ठेवण्यासाठी, अग्नीला संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाची असते. त्यासाठी ‘स्त्री संतुलन’संगीत ऐकणे, योगासने व अनुलोम-विलोमसारखा प्राणायाम यांचाही रोजच्या दिनक्रमात समावेश करणे उत्तम ठरते.

या सर्वांमुळे स्त्रीआरोग्य उत्तम राहायला मदत मिळते. शिवाय रजोनिवृत्तीच्या काळातही फारसा त्रास होऊ नये, यासाठी पूर्वतयारी होत असते. पण तरीही ऐन रजोनिवृत्तीच्या काळात आवर्जून कराव्यात, अशाही काही गोष्टी सांगता येतात. 

    आहारात दूध, खारीक, साजूक तूप यांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे.
    अंगाला अभ्यंग करणे, योनीत औषधी तेलाचा पिचू ठेवणे. 
    शतावरी कल्प, ‘सॅन रोझ’, ‘मॅरोसॅन’सारखे रसायन सेवन करणे. 
    रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागली की तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन-चार उत्तरबस्ती करून घेणे.
    पाळीच्या संबंधात काही त्रासदायक बदल होत असल्यास बिघाड संतुलित करू शकणारे उपाय योजणे.
    सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रजोनिवृत्ती शरीरातील एक स्वाभाविक बदल आहे, याचा मानसिकदृष्ट्या स्वीकार करणे.

रजोनिवृत्तीला कधी सुरुवात होईल, रजोनिवृत्तीची लक्षणे सुरू झाल्यावर संपूर्णपणे रजोनिवृत्ती कधी येईल, असे प्रश्न पडणे स्वाभाविक असले, तरी यांची उत्तरे प्रत्येक स्त्रीनुसार वेगवेगळी असू शकतात. सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे आयुर्वेदानुसार पन्नाशीनंतर रजोनिवृत्ती येणे अपेक्षित असते. सध्याच्या जीवनपद्धतीत पाळीच्या दिवसांत बरेचसे नियम पाळणे शक्‍य होत नाही, तसेच प्रकृतीनुसार आहार-विहार होत नाही आणि म्हणून रजोनिवृत्तीचे वय बरेच अलीकडे आलेले दिसते. पण, फार लवकर रजोनिवृत्ती होणे स्त्रीच्या आरोग्यास, तारुण्यास, सौंदर्यास बाधक ठरू शकते. वयाच्या पस्तीशी-छत्तीशीलाच रजोनिवृत्तीची लक्षणे दिसायला लागली, तर तो विकार समजायला हवा व दूर करण्यासाठी प्रयत्नही करायला हवेत, हे नक्की. 

थोडक्‍यात सांगायचे तर रजोनिवृत्ती स्त्रीच्या आयुष्यातली स्वाभाविक घटना असली, तरी ती योग्य वेळेलाच यावी व त्या दरम्यान स्त्रीला त्रास होऊ नये, याकडे लक्ष ठेवायला हवे. सुरुवातीपासून काळजी घेतली, तर रजोनिवृत्तीस कधी सुरुवात झाली व रजोनिवृत्ती कधी आली हे समजतही नाही, अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात. अधिकाधिक स्त्रियांनी याचा अनुभव घेतला, तर एकंदरच स्त्री-आरोग्याची पातळी लक्षणीयरीत्या उंचावेल, यात काही शंका नाही