प्रश्नोत्तरे

Question and Answer
Question and Answer

 माझा नातू दोन वर्षांचा आहे. त्याला दात व्यवस्थित आले आहेत; पण तो कोणताही पदार्थ चावून खात नाही. सर्व मिक्‍सरमधून बारीक करून द्यावे लागते. तसेच, त्याला भूक खूपच कमी लागते, त्यामुळे तो तब्येतीने बारीक आहे. दूधसुद्धा ग्लासने पीत नाही. तब्येत सुधारण्यासाठी कृपया काही उपाय सुचवावा. 
... क्ष 

दात येतात त्यानुसार सुरवातीपासून हळूहळू आहाराचे स्वरूप बदलणे गरजेचे असते. म्हणजे सहाव्या महिन्यात स्तन्य आहाराच्या बरोबरीने इतर अन्न सुरू केले, की पहिले तीन-चार महिने अन्न बारीक करून द्यायला हरकत नाही. मात्र, नंतर हाताने कुस्करून तयार केलेला काला, गरगटा भात, मऊ खिचडी असे खाण्याची मुलांना सवय लावणे आवश्‍यक असते. दोन वर्षांच्या मुलाला समजत असल्याने आता ही सवय बदलणे जड जाणार असले तरी ते करण्यावाचून पर्याय नाही. भूक चांगली असली तर ही सवय बदलणे सोपे जाते. यादृष्टीने नातवाला सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याचा उपयोग होईल. सकाळी पाव चमचा वावडिंग चूर्ण मधात मिसळून चाटवण्याचाही उपयोग होईल. अजून सहा महिने ‘संतुलन बालामृत’सारखे रसायन देता येईल, ज्यामुळे एकंदर विकास होण्यास उत्तम हातभार लागत असतो. नियमित अभ्यंग करण्यानेही भूक लागण्यास व तब्येत सुधारण्यास मदत मिळते. 

माझे वय ४५ वर्षे असून सकाळी साधारण नऊ वाजता नाश्‍ता (उपमा, पोहे, इडली वगैरे) केला तर दुपारी तीन वाजेपर्यंत भूकच लागत नाही. अधूनमधून खाल्लेल्या अन्नाच्या चवीचे ढेकर येत राहतात. पोट नीट साफ होत नाही. हा त्रास बऱ्याच वर्षांपासून आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
..... योगेश                                                                                                                                           
यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म, विशेषतः विरेचन, बस्ती हे उपचार करून घेणे श्रेयस्कर. बरोबरीने पाचक औषधे, आहार नियोजन व व्यायाम- योग यांचाही उपयोग होईल. जेवणानंतर शंखवटी किंवा ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या, तसेच अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. जेवताना अगोदर उकळलेले व थर्मासमध्ये भरून ठेवलेले गरम पाणी पिणे. जेवणाच्या अगोदर आले-लिंबाचा रस एक चमचा, त्यात पाव चमचा जिऱ्याची पूड व चवीनुसार सैंधव मीठ मिसळून घेणे. भूक शमेल परंतु पोटाला जडपणा येणार नाही इतक्‍या प्रमाणातच जेवणे. दोन जेवणांच्या मध्ये किमान सहा तासांचे अंतर असणे चांगले. सकाळी नाश्‍ता न करता फक्‍त कपभर चहा, दूध, चमचाभर च्यवनप्राशसारखे रसायन, काहीतरी खावेसे वाटले तर मूठभर साळीच्या लाह्या घेतल्या तर दुपारी वेळेवर म्हणजे बारा ते एकच्या दरम्यान नीट भूक लागेल व या वेळेत जेवल्यास एकंदर पचन सुधारण्यास मदत मिळेल. रोज सकाळी चालणे, सूर्यनमस्कार व अनुलोम- विलोम यासाठी किमान अर्धा तास काढणे हेसुद्धा श्रेयस्कर. रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर ‘सॅनकूल’ चूर्ण घेण्याचा व आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा चार-पाच चमचे या प्रमाणात समावेश करण्याने क्रमाक्रमाने पोट साफ होण्यासही मदत मिळेल. 

मला नेहमी निरुत्साही वाटते, व्यायाम करण्यास जोम राहात नाही. लघवीला वारंवार जावे लागते. त्या ठिकाणी चुरचुर होते. आंबट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले तर सर्वांगाला खाज येते. कृपया मार्गदर्शन करावे. मला मधुमेह, रक्‍तदाब वगैरे काही नाही. 
..... सोहोनी 

निरुत्साह, अशक्‍तता या गोष्टी शरीरातील अग्नितत्त्वावर व वातदोषाच्या संतुलनावर अवलंबून असतात. यासाठी प्रकृतीनुरूप, पचायला हलका, पण तरीही शरीरपोषक वातशामक आहार घेणे आवश्‍यक. यादृष्टीने पारंपरिक आहार योजना म्हणजे वरण-भात-तूप, सध्या पावसाळा आहे त्यादृष्टीने फुलका किंवा ज्वारीची भाकरी, वेलीवर येणारी फळभाजी, लोणी काढून तयार केलेले ताक हे उत्तम होय. रात्री झोपताना नियमित अभ्यंग केला तर उत्साह व शक्‍ती दोन्ही वाढायला मदत मिळते असा अनुभव आहे. आठवडाभर आहारात बदल आणि अभ्यंग केला की दोन-तीन सूर्यनमस्कार करण्यापुरता जोम नक्की येईल व ही संख्या हळूहळू दहा-बारापर्यंत नेता येईल. सकाळ- संध्याकाळ पुनर्नवाघनवटी, ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ व जेवणांनंतर पुनर्नवासव घेतल्यास लघवीची तसेच त्वचेशी संबंधित समस्या दूर होईल. मूत्रमार्गासंबंधित काही जंतुसंसर्ग तर नाही ना याची तपासणी करून घेणे चांगले. 

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’चा नियमित वाचक आहे. यातील ‘प्रश्नोत्तरां’च्या सदराचा समस्त वाचकांना खूप फायदा होतो. माझा नातू चार वर्षांचा आहे. त्याला महिन्यातून १५-२० दिवस सर्दी, खोकला, ताप असतो. तो काही खात नाही. अशक्‍त आहे. शिवाय खूप हट्टी व हेकेखोर आहे. अजिबात ऐकत नाही. त्याची तब्येत सुधारण्यासाठी कृपया काही उपाय सुचवावा. 
.... विश्वास 

सतत आजारपण असले तर त्यामुळे शक्‍ती कमी होऊन स्वभाव चिडचिडा, हट्टी, हेकेखोर होऊ शकतो. मुळात इतक्‍या लहान वयात याप्रकारे वारंवार सर्दी-ताप येणार नाही यासाठी प्रतिकारशक्‍ती सुधारायला हवी, यादृष्टीने नातवाला रोज सकाळ- संध्याकाळ अर्धा-अर्धा चमचा सीतोपलादी चूर्ण मधात मिसळून देण्याचा, ‘ब्राँकोसॅन सिरप’ देण्याचा आणि च्यवनप्राश किंवा ‘सॅनरोझ’ हे रसायन देण्याचा उपयोग होईल. घरात सकाळ- संध्याकाळ ‘संतुलन प्युरिफायर धूप’ करण्याचा, तसेच प्यायचे पाणी सुवर्णसिद्ध करून घेण्याचाही फायदा होईल. आहारात घरी बनविलेले साजूक तूप, घरचे लोणी- खडीसाखर, भिजविलेले बदाम, चैतन्य कल्प मिसळलेले दूध, खसखस, डिंकाचा लाडू यांचा समावेश असणे चांगले. अंगाला नियमित अभ्यंग करणे, टाळूला ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ लावणे याचाही स्वभाव शांत होण्यास व एकंदर तब्येत सुधारण्यास उत्तम हातभार लागेल. 

छोट्या बाळासाठी बालामृत हे जे रसायन आहे ते आईच्या दुधाबरोबर द्यावे का? अजून कोणती रसायने बाळाला द्यावीत? 
... भांडीवडेकर 

‘संतुलन बालामृत’ हे खास बालकांसाठी बनविलेले रसायन होय. जन्मापासून ते बाळ अडीच- तीन वर्षांचे होईपर्यंत नियमितपणे हे रसायन द्यायचे असते. शुद्ध केशर, सुवर्णवर्ख, गुडूचीसत्त्व हे रोगप्रतिकारशक्‍ती, मेधा, बुद्धी, स्मृती तल्लख होण्यासाठी उत्तम असतात असे आयुर्वेदात सांगितलेले आहे व प्रत्यक्षातही हा अनुभव येतो. ‘संतुलन बालामृता’चा सर्वाधिक फायदा होण्यासाठी ते मधासोबत द्यायचे असते; मात्र काही कारणामुळे मध देणे वा मध मिळणे शक्‍य नसेल तर ते आईच्या दुधाबरोबर दिले तरी चालते. ‘संतुलन बाळगुटी’ हेसुद्धा असेच बहुपयोगी रसायन होय. बालकाच्या शरीरातील सर्व संस्था नीट विकसित व्हाव्यात, जंत होऊ नयेत, जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी हे रसायन उत्तम गुणकारी ठरते, हेसुद्धा मधाबरोबर किंवा खारीक- बदाम उगाळून केलेल्या मिश्रणाबरोबर देता येते. ब्राह्मी, जटामांसी, वेखंड वगैरे मेंदूला पोषक असणाऱ्या द्रव्यांनी संस्कारित ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ हेसुद्धा लहान मुलांसाठी उत्तम रसायन असते. दोन वर्षांपर्यंत दररोज तीन-चार थेंब, पाच वर्षांपर्यंत एक अष्टमांश चमचा व नंतर एक चतुर्थांश ते अर्धा चमचा या प्रमाणात हे घृत देण्याचा उपयोग होतो. ‘संतुलन बेबी मसाज तेला’चा नियमित अभ्यंग हेसुद्धा बालकाच्या भावी आरोग्याच्यादृष्टीने उत्तम वरदान होय.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com