प्रश्नोत्तरे

Question and Answer
Question and Answer

‘फॅमिली डॉक्‍टर’ या साप्ताहिक पुरवणीचा मी नित्य वाचक आहे. मला इतर कोणताही मोठा शारीरिक विकार नाही. एकाएकी पोटात, विशेषतः उजव्या बाजूला दुखू लागल्यामुळे सोनोग्राफी केली असता पित्ताशयात खडे झाल्याचे आढळून आले. यावर काय औषधोपचार करावेत? 
..... जोशी 
 आहाराच्या माध्यमातून जाणाऱ्या अशुद्ध, रासायनिक द्रव्यांमुळे व पित्तदोषाच्या असंतुलनामुळे सध्या असा त्रास अनेकांमध्ये आढळतो. कैक वेळा पोटदुखी वगैरे त्रास होत नसला तरी इतर काही कारणासाठी तपासण्या केल्या असता त्यात पित्ताशयात खडे असल्याचे समजले. जेवणापूर्वी ‘सॅनपित्त सिरप’ घेणे, सकाळ-संध्याकाळी कामदुधा, ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेणे, पोटावर रोज दोन वेळा ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावणे हे उपाय योजता येतील. तयार पथ्यादी काढा मिळतो तो सकाळ-संध्याकाळ घेणे, रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर अविपत्तिकर चूर्ण घेणे हे सुद्धा चांगले. आहार शक्‍यतो घरचा व ताजा घेणे, भाज्या-फळे सेंद्रिय असण्याकडे लक्ष देणे, तेलकट, चमचमीत गोष्टी खाणे टाळणे हे सुद्धा उत्तम. 


‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीतील व ‘साम टीव्ही’वरील आपल्या मार्गदर्शनाचा आम्हाला खूप फायदा झाला आहे. माझ्या सूनबाई गाडीवरून पडल्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्‍चर झाला, त्यामुळे डॉक्‍टरांनी शस्त्रकर्म केले. डॉक्‍टरांनी कॅल्शियमसाठी व हाडांच्या मजबुतीसाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला आहे. मी आपणास विचारू इच्छितो की, कॅल्शियमसाठी शाकाहारात व आयुर्वेदिक औषधांत काय घेता येईल? 
...... संपतराव 
 नैसर्गिक शाकाहारात व आयुर्वेदिक औषधांत अनेक उत्तमोत्तम पर्याय आहेत. कपभर दुधात एक चमचा खारीक पूड उकळून नंतर त्यात शतावरी कल्प टाकून घेणे, रोज सकाळी डिंकाचा लाडू, संध्याकाळी अहळिवाची खीर खाणे, आहारात नाचणी सत्त्वाचा समावेश करणे हे या दृष्टीने उत्तम होय. ‘सॅनरोझ’, ‘मॅरोसॅन’सारखे रसायन, ‘कॅल्सिसॅन’ व ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. हाडांच्या मजबुतीसाठी वैद्यांच्या सल्ल्याने काही विशेष क्षीरबस्ती घेण्याचाही उत्तम फायदा होताना दिसतो. अंडी खाण्याची सवय नसली किंवा अंडे प्रकृतीला मानवणारे नसले तर हे पर्याय निवडणे उत्तम होय. 

माझे वजन 125 किलो आहे. जवळपास वीस वर्षांपासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. सकाळी योगासने चालू आहेत. वजन कमी कसे करावे हे कृपया सुचवावे. 
.... रतन सेठिया 
वजन वाढण्यामागचे योग्य निदान होण्यासाठी वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे आवश्‍यक होय. बरोबरीने अंगाला नियमित अभ्यंग व उद्वर्तन करणे, यासाठी ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ व ‘सॅन मसाज पावडर’ हे उटणे वापरणे चांगले होय. मेदपाचक वटी घेणे, चंद्रप्रभा, त्रिफळा गुग्गुळसारख्या मेद कमी करणाऱ्या गोळ्या घेणे, योगासनांच्या बरोबरीने नियमित चालायला जाणे, दिवसभर प्यायचे पाणी गरम व अगोदर वीस मिनिटांसाठी उकळलेले असणे उपयुक्‍त होय. दुपारी बारा-एकच्या दरम्यान आमटी, फळभाजी, भाकरी असा आहार, सूर्यास्तानंतर लवकरात लवकर भूक लागेल त्याप्रमाणात मुगाचे कढण, आमसुलाचे सार असा द्रवाहार घेणे, या व्यतिरिक्‍त अधेमधे भूक लागल्यास साळीच्या लाह्या खाणे अशी आहारयोजना केल्यासही वजन कमी होण्यास मदत मिळेल. 

पचन चांगले व्हावे यासाठी योग्य अन्न कोणते असावे? पोटात गॅस होऊ नयेत किंवा वायू नीट सरून जात नसेल तर काय काळजी घ्यावी? 
... सुषमा 
व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती या न्यायाने प्रत्येक प्रकृतीला कोणते अन्न अनुकूल असते, कोणते प्रतिकूल असते हे वैद्यांकडून जाणून घेणे सर्वांत चांगले असते. तरीही सर्वसामान्य नियमानुसार मुगाची डाळ, वर्षभर जुन्या तांदळाचा कुकर न वापरता भांड्यात शिजविलेला भात, फुलका, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, वेलीवर येणाऱ्या फळभाज्या, ताजे गोड ताक या गोष्टी पथ्यकर समजल्या जातात. आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा चार-पाच चमचे या प्रमाणात समावेश करणे हे सुद्धा पचनाच्या व एकंदर आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. पोटात गॅस होऊ नयेत व थोड्या प्रमाणात झाले तरी विनासायास सरून जावेत यासाठी जेवणापूर्वी आल्या-लिंबाच्या रसात जिरे पूड, सैंधव, ओवा पूड मिसळून घेण्याचा तसेच जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या, लवणभास्कर चूर्ण टाकून ताक घेण्याचा उपयोग होईल. नियमित चालणे, योगासने करणे, भूक लागले त्या प्रमाणात व वेळेवर जेवणे हे सुद्धा चांगल्या पचनासाठी उत्तम असते. 

 मी शिक्षक असून ‘फॅमिली डॉक्‍टर’चा नियमित वाचक आहे. माझे वय 42 वर्षे असून गेल्या दहा वर्षांपासून मला वातावरणात बदल झाला की खोकल्याचा त्रास होतो. खोकला सुरू झाला की कधी कधी एक-दोन महिने थांबत नाही. अशा वेळी दहा-बारा किलो वजन घटते, अशक्‍तपणा येतो. काही डॉक्‍टर म्हणतात की ही दम्याची सुरुवात आहे, तर काही डॉक्‍टर ॲलर्जी आहे असे सांगतात. कृपया आपण योग्य ते मार्गदर्शन करावे. 
..... पवार 

 प्रतिकारशक्‍ती सुधारली की या प्रकारचा त्रास नाहीसा होतो असे दिसते. यासाठी सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण, ‘सॅन रोझ’ व च्यवनप्राशसारखे रसायन घेण्याचा उपयोग होईल. वातावरणात बदल होत आहे असे जाणवू लागले की लगेचच ओव्याच्या पुरचुंडीने किंवा रुईच्या पानांनी छाती व पाठ शेकण्याचा उपयोग होईल. खोकला बरा होत नसल्यास एक बेहडा, एक अडुळशाचे पिकलेले पान व अंगठ्याएवढ्या ज्येष्ठमधाचा तुकडा हे सर्व चार कप पाण्यात उकळून एक कप शिल्लक राहीपर्यंत केलेला काढा घेण्याचा उपयोग होईल. ‘ब्रॉंकोसॅन सिरप’ नियमित घेण्याचाही उपयोग होईल. दही, पनीर, चीज, मांसाहार, फणस, सीताफळ, थंड पेये, फ्रीजमधील पाणी वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य करणे, कायम उकळलेले कोमट वा गरम पाणी पिणे हे सुद्धा चांगले,  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com