esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

Question and Answer

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

 मी ‘फॅमिली डॉक्‍टर’चे सर्व अंक आवर्जून वाचते. मला यातील मार्गदर्शनाचा बराच फायदा झाला आहे. माझे वय ६५ वर्षे आहे. मला सायटिकाचा त्रास आहे. कंबरेच्या मणक्‍यात गॅप आहे. डॉक्‍टरांच्या उपायांनी तात्पुरते बरे वाटते. डॉक्‍टरांनी एमआरआय केला व शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. मला शस्त्रक्रिया करायची नाही. यावर आयुर्वेदात उपाय आहे का? माझी मान, पाठ, कंबर व मांडी सारखी दुखत असते. मला फार चालवत नाही किंवा उभे राहवत नाही. कृपया उपाय सुचवावा. 
.... सुषमा 

आयुर्वेदात यावर चांगल्या प्रकारे उपाय करता येतात. वयाचा आणि त्रासाच्या तीव्रतेचा विचार करता वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्मातील हलके विरेचन, बस्ती, पिंडस्वेदनसारखे उपचार करून घेणे सर्वांत चांगले. बरोबरीने पाठीच्या कण्याला, तसेच सायटिकामुळे दुखणाऱ्या पायाला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ जिरविण्याचा उपयोग होईल. तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याचा तसेच ‘संतुलन वातबल’ या गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. ज्या ठिकाणी दुखते तेथे अगोदर तेल लावून वरून निर्गुडी किंवा एरंडाची पाने वाफवून त्याचा शेक करण्याचा उपयोग होईल. पंचतिक्‍त घृत घेण्याचाही उपयोग होईल. 

 मी `फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीचा नियमित वाचक आहे. आम्ही कुटुंबातील सर्व सदस्य रोज सकाळी पंचामृत घेतो. माझ्या वडिलांना मधुमेह आहे, मात्र साखर नियंत्रणात आहे. तरी त्यांना पंचामृत देऊ शकतो का? 
.... सतीशकुमार 
मधुमेहात पथ्य सांभाळणे गरजेचे असते, उदा. दुधापासून किंवा चण्याच्या डाळीच्या पिठापासून बनविलेल्या मिठाया मधुमेहात टाळणे आवश्‍यक असते. मात्र, रोज एक ते दीड चमचा साखर कच्च्या स्वरूपात घेण्यास हरकत नसते. म्हणूनच आयुर्वेदाच्या संहितांमध्ये प्रमेहावर सुचविलेल्या बहुतेक औषधांचे अनुपान मध वा उसाची साखर असते. पंचामृतामध्ये कच्ची साखर टाकायची असल्याने व मध सुद्धा मधुमेहात चालत असल्याने वडिलांना रोज पंचामृत देऊ शकता. त्यांच्यासाठी पंचामृत बनविताना साखर थोड्या कमी प्रमणात टाकली तरी चालू शकेल. 

 

माझ्या दीड वर्षाच्या मुलाला दुधाची ऍलर्जी आहे. त्याला गाईचे वा म्हशीचे दूध पाजले तर त्याच्या चेहऱ्यावर सूज येते. तो दुधाचे कोणतेच पदार्थ खाऊ शकत नाही, दूध पिऊ शकत नसल्याने तो अशक्‍त दिसतो. कृपया मार्गदर्शन करावे. 
... रूपाली 
 दूध न पचणे, दुधाची एलर्जी येणे हे प्रकार सध्या वाढलेले दिसतात, मात्र यामागे बहुतांशी वेळा चांगले दूध न मिळणे हे कारण असते. प्रक्रिया केलेले किंवा संकरित गाईचे दूध शरीरात सामावणे अवघड असते. देशी, स्थानिक वंशाच्या गाईचे दूध सध्या ए२ या नावाने बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असते. तेव्हा असे शुद्ध दूध देण्याचा प्रयत्न करावा व हे दूध सुंठ व वावडिंगाने संस्कारित करून मुलाला प्यायला द्यावे. यासाठी अर्धा कप दुधात बोटाच्या पेराच्या आकाराचा सुंठीचा तुकडा चेचून घालावा, त्यात ७-८ वावडिंगाचे दाणे थोडे कुटून घालावे, अर्धा कप पाणी मिसळावे व हे मिश्रण मंद आचेवर निम्मे पाणी उडून जाईपर्यंत उकळावे. शिल्लक राहिलेले पाऊण कप दूध गाळून घेऊन त्यात शतावरी कल्प किंवा ‘संतुलन चैतन्य कल्प’ टाकून मुलाला प्यायला द्यावे. सहसा अशा दुधाचा कोणताही त्रास होत नाही. मात्र तरीही चेहऱ्यावर सूज येत असली तर वैद्यांच्या सल्ल्याने पचन सुधारणारी औषधे सुरू करणे आवश्‍यक. 

 मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ नियमित वाचते. यातील लेखांचे अनुसरण करून पाहिले आहे व त्याचा मला त्वरित लाभ झालेला आहे. माझी मुलगी २२ वर्षांची आहे. तिला पित्ताचा खूप त्रास होतो. सतत डोके दुखणे, मान भरून येणे, छातीत जळजळणे हे त्रास होतात. खूप पाणी पिऊनही उलटी होत नाही. गेल्या वर्षापासून ती अभ्यासानिमित्ताने पुण्याला आहे. तेव्हापासून त्रास अधिकच वाढला आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
..... वृषाली जाधव 
 कधीतरी पित्त वाढले आणि आपणहून उलटी होऊन पडून गेले तर हरकत नसते, मात्र मुद्दाम जास्ती पाणी पिऊन उलटी करण्याची सवय चांगली नसते. त्याऐवजी पित्ताला संतुलित ठेवण्यासाठी दिवसातून २-३ वेळा ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या, रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून २-३ वेळा पादाभ्यंग करणे, मान व डोक्‍यावर ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावणे, रोजच्या आहारात साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे हे सुद्धा चांगले. शिक्षणानिमित्त घराबाहेर राहावे लागत असले तरी जेवण वेळेवर करणे, रात्री जागरण न करणे, ढोबळी मिरची, वांगे, गवार, चिंच, आंबट दही वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य करणे आवश्‍यक होय. या उपायांनी गुण येईलच, तरीही एकदा वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप औषधे व आहाराची योजना करणे श्रेयस्कर. 

 माझे वय ५८ वर्षे असून गेल्या चार-पाच महिन्यांपासून मला साधारण अर्ध्या-अर्ध्या तासाने लघवीला आल्यासारखे वाटते. लघवीला गेल्यावर लघवी अगदी कमी होते. मी शाकाहारी आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
..... सुशीला 
चार-पाच महिन्यांपासून त्रास आहे, तो अंगावर काढणे चांगले नाही. लघवीची तपासणी करून त्यात जंतुसंसर्ग आहे का हे पाहून घेणे आवश्‍यक. गर्भाशय खाली सरकले आहे का याचीही तपासणी करून घेणे चांगले. तत्पूर्वी ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे, ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे, जेवणानंतर पुनर्नवासव घेणे हे उपाय करता येतील. ओटीपोटाला तेल लावून वरून गरम पाण्याच्या पिशवीने शेक करण्याचाही उपयोग होईल. आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात अनंतमूळ म्हणून सुगंधी वनस्पती मिळते, ती कुटून घेऊन भरड चूर्ण तयार करावे. कपभर पाण्यात अर्धा चमचा हे चूर्ण भिजवून पाणी कोमट झाले की गाळून घेऊन प्यावे. यामुळे सुद्धा हा त्रास कमी होईल.