esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

Question and Answer

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आम्ही सर्वजण सुरुवातीपासून फॅमिली डॉक्टर वाचतो आणि त्यानुसार काळजीही घेतो. आम्हा सर्वांचेच आरोग्य पहिल्यापेक्षा सुधारल्याचे जाणवते. माझा प्रश्र्न असा आहे, की च्यवनप्राश संपूर्ण वर्षभर आणि घरातील सर्वांनी घेतलेला चालतो का? कृपया मार्गदर्शन करावे.

- श्री. समीर कारखानीस

उत्तर - च्यवनप्राश घरातील सर्वांनी आणि बाराही महिने घेण्यासाठी एक उत्कृष्ट रसायन आहे, फक्त तो आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितल्यानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि उत्तम प्रतीच्या घटकद्रव्यांपासून तयार केलेला असावा. रोज सकाळी एक चमचा च्यवनप्राश घेता येतो. संतुलन च्यवनप्राश कोणीही घेतला तरी चालतो. चाळिशीनंतर संतुलन आत्मप्राश आणि रक्तदाब किंवा हृदयासंबंधी काही त्रास असला तर संतुलन सुहृदप्राश घेणे, मधुमेह असला तर सुहृदप्राश प्लस हा कमी साखर टाकून बनविलेला विशेष च्यवनप्राश घेणे उत्तम होय.

माझी मुलगी २५ वर्षांची आहे. तिला डोकेदुखीचा खूप त्रास होतो. उलटी झाली की बरे वाटते. हा त्रास तिला आठवड्यातून १-२ वेळा तरी होतोच. कृपया यावर काही उपाय सुचवावा.

- सौ. मनीषा कोरडे

उत्तर - या त्रासावर पित्तदोष कमी करण्यासाठी उपचार करायला हवेत. सकाळ- संध्याकाळ संतुलन पित्तशांती, कामदुधा या गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून किमान दोन वेळा पादाभ्यंग करणे, रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण वा सॅनकूल चूर्ण घेणे सुद्धा चांगले. डोके दुखायला सुरुवात होईल किंवा मळमळ सुरू होईल तेव्हा कोरड्या साळीच्या लाह्या खाण्याचीही पित्त कमी होण्यास मदत मिळते. आहारात घरी बनविलेले साजूक तूप, मुगाचे कढण, भात, खिचडी, ज्वारीची भाकरी, तुपाची फेडणी देऊन केलेली एखादी फळभाजी यांचा समावेश करण्यानेही हळूहळू हा त्रास आटोक्यात येण्यास मदत मिळेल. मात्र वेळेवर जेवणे, योग्य वेळी पुरेशी झोप घेणे हे सुद्धा आवश्यक.

गर्भारपणात केशर दुधात टाकून घेतल्याने शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते का? अशा वेळी केशराचे प्रमाण किती असावे याबद्दल मार्गदर्शन करावे, तसेच केशरामुळे अपत्य गोरे होते ही गोष्ट खरी आहे का?

- सौ. सुहासिनी गायकवाड

उत्तर - केशर उष्णवीर्याचे असले तरी ते मर्यादित प्रमाणात म्हणजे बारीक चिमूटभर घेतले तर गरम पडण्याएवढे उष्ण नसते. गर्भारपणात दुधात किंवा पंचामृतात केशराची पूड टाकून घ्यायला मुळीच हरकत नाही. बाजारात केशराच्या काड्या उपलब्ध असतात. परंतु काड्यांच्या स्वरूपातील केशर शरीरात पूर्णतः स्वीकारले जाऊ शकत नसल्याने केशराची पूड करून घेणे आवश्‍यक असते. केशर हे त्वचेला हितकर व वर्ण उजळवणारे असते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. प्रत्यक्षातही असे दिसते की केशर-सुवर्णयुक्त अमृतशर्करा घेणाऱ्याची त्वचा उजळते, सतेज कांतीचा लाभ होतो. गर्भवतीने गर्भारपणात नियमितपणे अमृतशर्करा घेण्याने बालकाला फक्त सतेज कांतीच मिळते असे नाही तर त्याची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहाते, बुद्धी व स्मृती तल्लख होण्यास मदत मिळते.

loading image
go to top