प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Monday, 16 January 2017

"फॅमिली डॉक्‍टर'च्या 29 सप्टेंबर 2016च्या अंकात पंचामृताबाबतचे आपले उत्तर वाचले. माझा प्रश्न असा आहे की, पंचामृत कोणत्या वेळी घ्यावे? सकाळी नाश्‍त्यापूर्वी की जेवणानंतर? तसेच पंचामृतामध्ये खडीसाखर घातली तर चालेल का?... गोविंद कळंबकर 

"फॅमिली डॉक्‍टर'च्या 29 सप्टेंबर 2016च्या अंकात पंचामृताबाबतचे आपले उत्तर वाचले. माझा प्रश्न असा आहे की, पंचामृत कोणत्या वेळी घ्यावे? सकाळी नाश्‍त्यापूर्वी की जेवणानंतर? तसेच पंचामृतामध्ये खडीसाखर घातली तर चालेल का?... गोविंद कळंबकर 

उत्तर - पंचामृतात खडीसाखर घालणे उत्तम होय. साध्या साखरेपेक्षा खडीसाखर अधिक शुद्ध व त्यामुळे अधिक गुणकारी असते. औषधाबरोबर घ्यायची साखरसुद्धा साध्या साखरेऐवजी खडीसाखर किंवा बत्तासा बारीक करून तयार केलेली पिठीसाखर घेणे अधिक चांगले असते. पंचामृत सकाळी नाश्‍त्यापूर्वी घेणे सर्वांत चांगले, पण एखाद्या दिवशी सकाळी घ्यायला वेळ झाला नाही, तर नाश्‍त्यानंतर किंवा संध्याकाळी पाचच्या सुमाराला घेता येते. 

माझी नात अडीच वर्षांची आहे, गर्भसंस्कार केलेले आहेत, त्यामुळे तिचे जेवण, झोप, एकंदर प्रगती उत्तम आहे. नातीला घाम फार येत असतो, तसेच तिचे डोके गरम असते. कृपया यासाठी मार्गदर्शन करावे, नातीला गर्भसंस्कार प्रशस्तिपत्रक मिळालेले आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद. ... यशश्री पुरंदरे 
उत्तर - घाम अधिक प्रमाणात येणे, डोके गरम लागणे ही शरीरात उष्णता अधिक असल्याची निदर्शक लक्षणे आहेत. उष्णता कमी होण्यासाठी तिला काळ्या मनुकांचे पाणी देता येईल. पाच-सहा मनुका कपभर पाण्यात भिजत घालून, तीन-चार तासांनी कोळून काढलेले पाणी दिवसभरात थोडे थोडे पिण्यास देणे चांगले. डोक्‍याला टाळूवर "संतुलन ब्रह्मलीन तेल' लावण्याचा उपयोग होईल. तसेच तिच्या आहारात किमान दोन-तीन चमचे साजूक तुपाचा समावेश करण्याचाही उपयोग होईल. काही दिवस सकाळ-संध्याकाळ एक-एक कामदुधा तसेच "संतुलन पित्तशांती' या गोळ्या दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर उगाळून किंवा चूर्ण करून देण्यानेही उष्णता कमी होण्यास मदत मिळेल. 

माझे वय 55 वर्षे आहे. गेल्या पाच वर्षांत माझे दोन वेळा स्तनाच्या कर्करोगाचे शस्त्रकर्म करावे लागले व मागच्या महिन्यात लहान मेंदूजवळ कर्करोगाची गाठ झाल्याचे निदान झाल्याने पुन्हा शस्त्रकर्म करावे लागले. पुन्हा पुन्हा असा त्रास होऊ नये, यासाठी काही उपाय सुचवावा. .... राऊत 

उत्तर - कर्करोग हा मुख्यत्वे आकाश व वायूतत्त्वातील असंतुलनाशी निगडित रोग असतो. म्हणूनच त्याला नियंत्रणात ठेवणे सोपे नसते. कर्करोगाची गाठ शस्त्रकर्माने काढून टाकता येते, नंतर त्या ठिकाणी रेडिएशन किंवा केमोथेरपी घेऊन पेशींना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करता येतो. मात्र, मुळात पुन्हा पुन्हा पेशींमध्ये बिघाड व्हायला नको असला, तर आकाश-वायू तत्त्वे संतुलित राहण्यासाठी उपचार व्हायला हवेत. तेव्हा शस्त्रकर्म किंवा नंतरच्या थेरपी करण्याचा निर्णय घेतला तरी बरोबरीने आयुर्वेदिक औषधे सुरू करण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो. वैद्यांच्या सल्ल्याने गुळवेल सत्त्व, हिरक भस्म, शरीरशक्‍तीनुसार पंचकर्म, विशेष बस्ती वगैरे उपचार करणे गुणकारी असते. "समसॅन गोळ्या' घेता येतात. नियमित दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम, प्रकृतीला अनुकूल योगासने, ॐकार गूंजन, स्वास्थ्यसंगीत, ध्यान वगैरे उपायही अप्रतिम गुण देणारे असतात. 

"फॅमिली डॉक्‍टर'मधील सर्वच माहिती अतिशय उपयुक्‍त असते. माझ्या पाठीला व मांडीवर सतत खाज सुटत असते. त्याठिकाणची त्वचा खूप कोरडी पडलेली आहे. मलम वगैरे लावून पाहिले पण काहीही फायदा होत नाही. कृपया आपण उपाय सांगावा. ... सुदेश जी. 

उत्तर - या प्रकारच्या त्रासावर रक्‍तशुद्धी करणारे उपाय योजणे आवश्‍यक असते. फक्‍त बाहेरून मलम वगैरे लावण्यापेक्षा त्वचेला आतून योग्य स्निग्धता मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. या दृष्टीने सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा पंचतिक्‍त घृत हे रक्‍तशुद्धीकर औषधांनी संस्कारित केलेले तूप घेणे, दोन-दोन "मंजिष्ठासॅन गोळ्या' घेणे, जेवणानंतर "संतुलन मंजिसार आसव' घेणे, घरी बनविलेल्या साजूक तुपाचा ( किमान चार-पाच चमचे) आहारात समावेश असू देणे हे चांगले. काही दिवस गहू बंद करून त्याऐवजी तांदूळ व ज्वारी या धान्यांचा आहारात समावेश करणे, तसेच वांगे, टोमॅटो, गवार, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, आंबवलेले पदार्थ, शीतपेये वगैरे गोष्टी आहारातून पूर्णतः वर्ज्य करणेसुद्धा श्रेयस्कर. रक्‍त शुद्ध करणाऱ्या द्रव्यांनी सिद्ध तेलाची किंवा तुपाची बस्ती वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घेणे व शास्त्रोक्‍त पद्धतीने शरीरशुद्धी करून घेणेसुद्धा उत्तम होय. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question & answer