प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 20 January 2017

माझे वय 25 वर्षे आहे. मला गेल्या पाच-सहा वर्षांपासून मलावष्टंभाचा त्रास होतो आहे. सकाळी उठल्यानंतर एक लिटर पाणी प्यायल्यानंतरच मला आवेग येतो. गेली दोन वर्षे मी प्राणायाम करते आहे, त्याचाही दिवसेंदिवस चांगला परिणाम होतो आहे. पण नैसर्गिकरीत्या पोट साफ होण्यासाठी काय करावे हे सांगावे. तसेच गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी असे पाणी पिणे योग्य आहे काय? .... कविता 

माझे वय 25 वर्षे आहे. मला गेल्या पाच-सहा वर्षांपासून मलावष्टंभाचा त्रास होतो आहे. सकाळी उठल्यानंतर एक लिटर पाणी प्यायल्यानंतरच मला आवेग येतो. गेली दोन वर्षे मी प्राणायाम करते आहे, त्याचाही दिवसेंदिवस चांगला परिणाम होतो आहे. पण नैसर्गिकरीत्या पोट साफ होण्यासाठी काय करावे हे सांगावे. तसेच गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी असे पाणी पिणे योग्य आहे काय? .... कविता 
उत्तर - प्राणायाम करत राहणे उत्तम आहेच, बरोबरीने नियमित चालायला जाणे, सूर्यनमस्कार करणे हे सुद्धा शरीरातील हलनचलन व्यवस्थित होण्यासाठी सहायक असते. सकाळी एकदम लिटरभर पाणी पिण्याऐवजी रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप टाकून घेणे आणि सकाळी उठल्यावर पुन्हा एक ग्लासभर गरम पाणी पिणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी काही दिवस चमचाभर अविपत्तिकर चूर्ण किंवा "सॅनकूल चूर्ण' घेण्याने पचन सुधारणे किंवा सकाळी उठल्यावर शौचाचा आवेग येणे, पोट साफ होणे शक्‍य होते. रोज काळ्या मनुका, सुके अंजीर, चार-पाच चमचे घरी बनविलेले साजूक तूप यांचा आहारात समावेश करणे हे सुद्धा चांगले. गरोदरपणातसुद्धा हे सर्व उपाय करायला हरकत नाही. 

माझी मुलगी 35 वर्षांची आहे. ती व्यवसायाने शिक्षिका असून, रोज दुचाकीवर साधारणपणे तीस किलोमीटर प्रवास करते. तिचे खाणे, पिणे, झोपणे व्यवस्थित आहे, परंतु पथ्यकर खाणे खाऊनही तिला संपूर्ण डोके दुखण्याचा वारंवार त्रास होतो. मासिक पाळीत तर डोके नक्कीच दुखते. आतापर्यंत तिने एमआरआय, सीटी स्कॅन, रक्‍त-लघवीच्या अनेक वेळा तपासण्या करून घेतल्या आहेत. पण त्यात काहीच सापडले नाही. कृपया आपण काही उपचार सुचवावा. ...श्री. नेटके 
उत्तर - स्त्रियांच्या बाबतीत डोके दुखण्याचा त्रास सहसा स्त्री-असंतुलनाशी निगडित असतो. अशा वेळी मुख्यत्वे स्त्री-असंतुलनावर योग्य उपचार करणे महत्त्वाचे असते. यादृष्टीने "फेमिसॅन तेलाचा पिचू' वापरणे, आठवड्यातून दोन-तीन वेळा "संतुलन शक्‍ती धुपा'ची धुरी घेणे, सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर शतावरी कल्प घेणे, अंगावरून पांढरे जाणे किंवा पाळीमध्ये अधिक रक्‍तस्राव होण्याची प्रवृत्ती असेल तर अशोकारिष्ट, पुष्यानुग चूर्ण, "अशोक-ऍलो सॅन गोळ्या' घेणे आवश्‍यक होय. दुचाकीवरून प्रवास करताना कपाळावर, कानावर स्कार्फ बांधणे, विंड चिटर घालणे चांगले. नियमित पादाभ्यंग करणे, "संतुलन पित्तशांती गोळ्या' घेणे आणि पंधरा दिवसांतून एकदा दोन चमचे एरंडेल घेऊन पोट साफ होऊ देणे, या उपायांचाही डोकेदुखीवर उत्तम उपयोग होताना दिसतो. या उपचारांचा फायदा होईलच, पण गरज वाटल्यास वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणेही चांगले होय. 

मला दोन-तीन वर्षांपासून एका ठिकाणी बसले की लगेच झोप येते. रात्री चांगली व पुरेशी झोप झाली तरी दिवसा कामात नसले की झोप येते. फॅमिली डॉक्‍टरांच्या सल्ल्याने तपासण्या केल्या तर त्यात काही दोष आढळला नाही. तरी यावर काही औषध असेल तर ते सुचवावे. .... जयश्री 
उत्तर - काही कारणाने शक्‍ती कमी पडत असली किंवा शरीरात आमदोष अधिक प्रमाणात वाढलेला असला, तर त्यामुळे अशा प्रकारे वेळी-अवेळी झोप येऊ शकते. रक्‍ताच्या तपासणीमध्ये काही दोष आढळला नाही हे चांगलेच आहे. तरी शक्‍ती वाढण्यासाठी रोज च्यवनप्राश, धात्री रसायन, "सॅन रोझ'सारखे रसायन घेणे, रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे, आहार वेळेवर व प्रकृतीचा विचार करून घेणे चांगले. रात्रीची झोप शांत व गाढ लागण्यासाठी अभ्यंग करण्याचा उपयोग होईल. बरोबरीने नाकपुड्यांमध्ये दोन-तीन थेंब घरी बनविलेले साजूक तूप किंवा औषधांनी संस्कारित केलेले "नस्यसॅन घृत' घालण्याचाही फायदा होईल. आमदोष वाढण्याची इतर लक्षणे म्हणजे अंग आंबणे, दुखणे, अपचन होणे, अंग जड वाटणे, आळसावल्यासारखे वाटणे वगैरे जाणवत असल्यास लवकरात लवकर तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे, आहारात गरम पाणी, सूप, मऊ भात, मऊ खिचडी, ज्वारी किंवा तांदळाची भाकरी आणि साधी फोडणी घालून केलेल्या फळभाज्या वगैरे पचण्यास सोप्या पदार्थांचा समावेश करणे, वैद्यांच्या मार्गदर्शनाने योग्य वेळेस शास्त्रोक्‍त पंचकर्म करून घेणे उत्तम होय. 

मी 22 वर्षांची तरुणी आहे. मला दोन वर्षांपासून अचानक छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला आहे. जेव्हा त्रास होतो तेव्हा छातीत अक्षरशः कळा येतात. तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून तपासण्या करून घेतल्या, पण सर्व रिपोर्टस्‌ व्यवस्थित आहेत. त्यांनी पित्त कमी करण्याच्या गोळ्या दिल्या होत्या. मला यावर योग्य ते मार्गदर्शन करावे. ....माधुरी पाटील 
उत्तर - रात्री झोपण्यापूर्वी एक-एक चमचा अविपत्तिकर चूर्ण किंवा "सॅनकूल चूर्ण' घेणे, सकाळ-संध्याकाळ मूठभर साळीच्या लाह्या पाण्यास भिजवून चार-पाच तासांनी गाळून घेतलेले पाणी पिणे, छाती-पोटावर "संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेला'सारखे तेल लावणे हे उपाय करता येतील. सकाळी उठल्यावर चमचाभर गुलकंद आणि "संतुलन पित्तशांती'च्या दोन गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. काही दिवस तिखट, आंबट या चवी वर्ज्य करणे, कच्चे मीठ टाळणे, गव्हाऐवजी तांदूळ, ज्वारी, मूग यांवर भर देणे, आहारात किमान चार-पाच चमचे इतक्‍या प्रमाणात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा समावेश करणे हे सुद्धा चांगले. या उपायांनी बरे वाटेलच, तरीसुद्धा दुखणे अंगावर न काढता एकदा तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम होय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question & answer