प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 31 March 2017

मी सतरा वर्षांची आहे. हल्ली माझे केस फार गळतात. केसांमध्ये कोंडासुद्धा फार झालेला आहे. केस खूप खराब झालेले आहेत. केस पहिल्यासारखे व्हावेत यासाठी उपाय सुचवावा. .... ऐश्वर्या वरपे 

मी सतरा वर्षांची आहे. हल्ली माझे केस फार गळतात. केसांमध्ये कोंडासुद्धा फार झालेला आहे. केस खूप खराब झालेले आहेत. केस पहिल्यासारखे व्हावेत यासाठी उपाय सुचवावा. .... ऐश्वर्या वरपे 
उत्तर - केसांचे सौंदर्य आणि आरोग्य परत मिळवायचे असेल, तर केसांना आतून शक्‍ती द्यायला हवी आणि बाहेरून नीट निगा राखायला हवी. यादृष्टीने आठवड्यातून दोन वेळा केसांना "संतुलन व्हिलेज हेअर तेला'सारखे केश्‍य द्रव्यांनी संस्कारित केलेले तेल लावणे, आठवड्यातून दोन वेळा शिकेकाई, रिठा, नागरमोथा वगैरे द्रव्यांच्या मिश्रणाने किंवा तयार "संतुलन सुकेशा हेअर वॉश'ने केस धुणे, न्हाण्याआधी केसांच्या मुळाशी ओल्या नारळाचे दूध अर्ध्या तासासाठी लावून ठेवणे चांगले. केसांचे आरोग्य हाडांच्या अशक्‍ततेवर अवलंबून असते, त्यामुळे रोज खारीक चूर्णाबरोबर उकळवलेले दूध पिणे, आहारात खसखस, नाचणी सत्त्व, डिंकाचे लाडू यांचा समावेश असू देणे, "कॅल्सिसॅन' तसेच "हेअरसॅन' या गोळ्या घेणे हेसुद्धा केसांच्या आरोग्यासाठी उत्तम होय. 

सुवर्णसिद्ध जल तयार करण्यासाठी पाणी आणि सोन्याचे प्रमाण कसे असावे? तसेच चांदी वापरूनसुद्धा असे जल तयार करता येईल काय? .... के. जी. पतकी 
उत्तर - पाण्याबरोबर सोन्याचा जितका अधिक संपर्क येईल तितके चांगले असल्याने सोन्याच्या नाण्यापेक्षा किंवा वळशापेक्षा सोन्याचा पातळ पत्रा बनवून त्याच्या मदतीने सुवर्णसिद्ध जल तयार केले तर ते उत्तम होय. हे सोने 24 कॅरटचे म्हणजे अगदी शुद्ध असायला हवे. घरातील सर्वांसाठी सुवर्णसिद्ध जल तयार करण्यासाठी अडीच ग्रॅम सोन्याचा पातळ पत्रा बनवून घेता येतो आणि रोज वापरता येतो. पाण्यामध्ये हा पत्रा न झिजता वर्षानुवर्षे तसाच राहतो असा अनुभव आहे. चांदी वापरून अशा प्रकारे पाणी संस्कारित करण्याची पद्धत दिसत नाही. मात्र तयार सुवर्णसिद्ध जल साठवून ठेवण्यासाठी, तसेच पिण्यासाठी चांदीचे भांडे वापरणे उत्तम असते. 

माझी मुलगी पाच वर्षांची असून तिला खरे तर दूध खूप आवडते; पण दूध प्यायली की तिला मळमळ सुरू होते आणि उलट्या होतात. यानंतर आठ- पंधरा दिवस तिला जेवण जात नाही. तिला दूध पचत नाही असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे व तिला दूध देऊ नये असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. पण, तिला दूध फार आवडते. कृपया मार्गदर्शन करावे. ...... मयूरी मोहिते 
उत्तर - मुळात दूध चांगल्या प्रतीचे, शुद्ध व होमोजिनायझेशन न केलेले आहे ना, याची खात्री करून घ्यायला हवी. कारण दुधावर केलेल्या विविध प्रक्रियांमुळे दूध पचणे अवघड होते असा अनुभव आहे. शक्‍यतो भारतीय वंशाच्या गाईचे, कोणतीही प्रक्रिया न केलेले दूध मिळवून ते वावडिंग व सुंठीबरोबर संस्कारित करून मुलीला देणे चांगले राहील. अर्धा कप दुधात अर्धा कप पाणी, वावडिंगाचे सात- आठ दाणे आणि बोटाच्या पेराच्या आकाराचा सुंठीचा चेचून घेतलेला तुकडा हे सर्व मिश्रण मंद आचेवर पाऊण कप शिल्लक राहीपर्यंत उकळणे आणि गाळून घेऊन त्यात "संतुलन चैतन्य कल्प' किंवा शतावरी कल्प टाकून दिले, तर ते पचण्यास सोपे होते. बरोबरीने मुलीची पचनशक्‍ती सुधारावी यासाठी तिला बिल्वावलेह किंवा "बिल्वसॅन' देण्याचा, जेवणानंतर पुनर्नवासव देण्याचा, सकाळ- संध्याकाळ "संतुलन बाल हर्बल सिरप' देण्याचा फायदा होईल. लहान वयात दूध हे उत्तम आहारद्रव्य असते, त्यामुळे मुलीला दररोज दूध पिता यावे यासाठी आवश्‍यक ते सर्व प्रयत्न करणे भाग आहे, यासाठी वरील उपाय योजता येतील. तसेच, वैद्यांचा प्रत्यक्ष सल्लासुद्धा घेता येईल. 

 "सकाळ' वृत्तपत्राची "फॅमिली डॉक्‍टर' ही पुरवणी म्हणजे समाजाला मिळालेले एक वरदान आहे. मी गृहिणी आहे. सकाळी पाच वाजेपासून माझी घरची कामे सुरू होतात. आठवड्यातून तीन दिवस उपवास करते. तसेच चतुर्थी, एकादशीलाही उपवास करते. माझी समस्या अशी आहे, की सकाळी माझे पोट साफ होते; मात्र मळाला अतिशय दुर्गंधी असते. हा काही आजार आहे का आणि यावर काही औषधोपचार आहेत काय? ... उषा चौधरी 
उत्तर - मळाला दुर्गंधी हे अपचनाचे, विशेषतः शरीरात आमदोष तयार होत असण्याचे एक लक्षण आहे. सकाळी लवकर उठणे, घरातील कामे करणे हे उत्तम आहे; मात्र घरकामात गुंतल्यामुळे जेवणाच्या वेळा सांभाळण्याकडे दुर्लक्ष होत नाही ना, याची खात्री करून घेणे चांगले. सकाळी आठच्या सुमाराला ताजा व गरम नाश्‍ता, दुपारी बारा ते एकच्या दरम्यान जेवण आणि रात्री नऊ वाजेपूर्वी हलके जेवण करणे श्रेयस्कर होय. उपवासाची संख्यासुद्धा बरीच आहे. उपवासाला तळलेले पदार्थ, शेंगदाणे, साबुदाण्यापासून बनविलेले पदार्थ खाण्यात आले, तर त्यामुळे हलके हलके पचनशक्‍ती खालावू शकते. तेव्हा शक्‍यतो उपवासाचे दिवस कमी करणे, उपवासाच्या दिवशी भगर, राजगिरा, उकडलेल्या बटाट्याची भाजी असे काही तरी साधे खाणे चांगले. फार दिवस उपवास करण्याऐवजी आठवड्यातून एकदा रात्रीचे जेवण न करता लंघन करणे हे आरोग्यासाठीसुद्धा उत्तम असते. काही दिवस गहू न खाता ज्वारी, तांदूळ, नाचणी या धान्यांवर भर देणे चांगले. जेवणानंतर "संतुलन अन्नयोग गोळ्या' घेणे, "सॅनकूल चूर्ण' घेणे, जेवताना उकळून घेतलेले गरम पाणी पिणे, जेवण्यात आल्याचा वापर करणे हेसुद्धा चांगले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question & answer