संस्कार फराळाचे

Rites of `Faraal`
Rites of `Faraal`

दिवाळीत ज्या वस्तू तुपात तळून केलेल्या असतात, त्यांचा पचनासाठी, वीर्यवर्धनासाठी खूप फायदा होतो. हे साजूक तूप असावे. दूध न तापवता वेगळा केलेला स्निग्ध पदार्थ हा मेद (फॅट) आहे. ही फॅट पुढे प्रक्रिया करून बनविलेल्या वस्तूला "तूप' म्हणता येत नाही. वनस्पतिजन्य तूप हेही खरे तूप नाही. फराळ करताना तुपाऐवजी तेल वापरले तरी हरकत नाही, पण तेल शेंगदाण्याचे किंवा तिळाचेच असावे. भारतीय संस्कृतीतील दीपावली हा सर्वांत मोठा महोत्सव संपत आला. आता अखेरचे पर्व, तुळशीचे लग्न, आवळी भोजन व शेवटी त्रिपुरारी पौर्णिमा झाली की सुरू होतील मनुष्यमात्रांचे लग्नसमारंभ. दीपावलीतील फराळ संपत नाहीच. करंजी, खीर, चिरोटे हे पदार्थ पक्वान्ने म्हणूनही जेवणात असतात. आयुर्वेदात फराळाच्या पदार्थांचा उल्लेख आहे व त्यांच्या कृतीही दिलेल्या आहेत. आपण करंजीत फक्‍त खोबरे घालतो, फार फार तर त्यात थोडी वेलची मिसळून सारण करतो. बाहेरची पारी खुसखुशीत व्हावी म्हणून बेकिंग पावडरसारखे द्रव्य टाकलेले असते. आयुर्वेदाने करंजीचा उपयोग सांगताना करंजी धातुवर्धक, वीर्यवर्धक, हृदयाला हितकर असते असे सांगितलेले आहे. तसेच ती पचायला थोडी जड असली तरी मलप्रवृत्ती साफ करवणारी असते, मोडलेल्या हाडांचे संधान होण्यासाठी उत्तम असते. तसेच पित्त व वात दोष कमी करणारी असते असे सांगितलेले आहे. गव्हाचा रवा तुपावर भाजून घेऊन त्यात साखर, वेलची, लवंग, मिरी, खोबरे, चारोळ्या, थोडासा कापूर मिसळून सारण बनवायला सांगितलेले आहे. चकली, कडबोळी करतेवेळी हिंग, मीठ, थोडे किसलेले आले या गोष्टी उडदाच्या पिठात घालून घट्ट मळावे व दातेदार चकल्या करायच्या असतील तर साचा वापरावा, अथवा हाताने कडबोळीसारखा आकार द्यावा. चकल्या वाफेवर शिजवून खाल्ल्या तर अधिक फायदा होतो असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. या चकल्या थोडेसे पित्त वाढवितात; परंतु प्रवास करणाऱ्यांसाठी हितकर असतात. याच चकल्या तुपात तळल्या तर पचायला थोड्या जड झाल्यातरी ताकद वाढिवतात, तृप्ती देतात, शुक्रवर्धक असतात, अग्नी वाढवितात, पित्त-कफदोष वाढविणाऱ्या असल्या तरी वातशामक असतात. साच्यात घालून काटे नसणाऱ्या तुपात तळून केलेल्या पदार्थाला कडबोळी म्हणतात. ज्या वस्तू तुपात तळून केलेल्या असतात त्यांचा पचनासाठी, वीर्यवर्धनासाठी खूप फायदा होतो. स्वस्त पडते म्हणून कुठल्यातरी स्वस्त तेलात तळल्या तर तेलामुळे शरीरात आलेला विकार घालवायला पुढे चौपट खर्च होतो. तूप हे साजूक तूप असावे. दूध शंभर अंश सेंटिग्रेडपर्यंत तापवून आलेल्या मलईला विरजण लावून तयार झालेले दही घुसळून मिळालेले लोणी कढवून तयार केलेले तूप असावे. दूध न तापवता वेगळा केलेला स्निग्ध पदार्थ ही फॅट आहे. ही फॅट पुढे प्रोसेस करून बनविलेल्या वस्तूला "तूप' म्हणता येत नाही. तसेच वनस्पतिजन्य तूप हे खरे तूप नाही. आपल्याला चांगले तूप हवे असेल तर दीपावलीच्या आधीच काही दिवस जास्ती दूध घेऊन घरीच तूप कढवणे चांगले. तेलाचेही असेच आहे. आज अनेक तेलाच्या जाहिराती होताना दिसतात. ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची तेले आजच का आली? इतकी वर्षे का नव्हती? स्वस्त आहे अशा नावाखाली ही अनेक तेले बाजारात आलेली दिसतात. पण अशी स्वस्त तेले वापरल्याने आरोग्याशी खेळ सुरू होतो. शेंगदाण्याचे किंवा तिळाचे तेल ही दोन तेले उत्तम असतात, करडईचे तेल केव्हा तरी चालू शकते. ही तेले रिफाईंड नसावीत. कचरा वगैरे निघून जाण्याइतपतच फिल्टर केलेली असावीत. फराळ करताना तुपाऐवजी तेल वापरले तरी हरकत नाही, पण तेल शेंगदाण्याचे किंवा तिळाचेच असावे. गोडाच्या पदार्थांमध्ये अनारशांचे स्थान वरचे आहे. अनारसे धातुवर्धन करतात, रुची वाढवितात, गुणांनी स्निग्ध तर वीर्याने थंड असतात, ताकद देणारे असतात, अतिसाराला प्रतिबंध करतात. आपल्या परंपरेत अनारशांचे वाण देण्याची पद्धत आहे. उत्तर हिंदुस्थानातही अनारसे पक्वान्न खास समजले जाते व दिले जाते. चिरोट्यांची कृतीही आयुर्वेदात दिलेली आहे. चिरोटे शुक्रवर्धक सांगितलेले आहेत, ताकद वाढवतात. शरीरात शुक्रवर्धन झाले की त्रिदोषांचे आपोआप शमन होते. शुक्रधातू शरीराची ताकद वाढवतो, हृदयाला व मेंदूला पोषक असतो. चिरोटे पचायला थोडे जड असले तरी चिरोटे वातशमन करतात. तांदळाची खीर, पायस, श्रीखंड ही पक्वान्ने आयुर्वेदात सांगितलेली आहेत. कच्च्या दुधाच्या दह्याच्या चक्‍क्‍यापासून बनविलेले श्रीखंड खाणे हे धाडसाचे काम आहे असे म्हणावे लागेल. बाजारातून आयते श्रीखंड वा चक्का आणण्याऐवजी घरी तापविलेल्या दुधाचे नीट दही करून त्यापासून श्रीखंड बनवावे. ज्या भांड्यात दही लावायचे आहे त्या मातीच्या भांड्याला आतून थोडा कापूर, चित्रक लावावे. घरात वयस्कर व्यक्‍ती असल्यास भांड्याला आतून सुंठही लावता येते. अशा दह्याच्या चक्‍क्‍यापासून बनविलेले श्रीखंड हा अप्रतिम पदार्थ होय. अशा चक्‍क्‍यात साखर, केशर, तूप, जायफळ, मध, सुंठ, मिरी, दालचिनी, तमालपत्र, वेलची, नागकेशर हेही टाकले जाते. श्रीखंड बनविताना अनैसर्गिक रंग घालू नये, आपल्याला परवडत असेल त्याप्रमाणात केशरच वापरावे. अशा प्रकारे बनविलेले श्रीखंड हे सर्वगुणसंपन्न असते. ते शरीरात कुठलाही विकार तर उत्पन्न करत नाही तर ते रोगांना थांबविणारे असते, शरीरात आंबटपणाची वाढ करत नाही, त्यामुळे आमवात, सांधेदुखी असणाऱ्यानाही नडत नाही. फराळाचे पदार्थ व पक्वान्ने सणावारी व कार्यप्रसंगी नेहमी खाण्यात असतात. वापरायची धान्ये, तेले वगैरे सर्व वस्तू उत्तम प्रतीच्या व परंपरेने सिद्ध झालेल्या घ्याव्या. खायचे रंग म्हणून असले तरी भलभलते रंग वापरणे इष्ट नाही. हे सर्व सांगण्यामागचा उद्देश असा, की प्रत्येकाने आयुर्वेदाने सांगितलेल्या कृतीप्रमाणे फराळ अवश्‍य बनवावा, ज्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com