सोमयोग (५) 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 17 January 2020

मेंदू चौवीस तास कार्यरत राहू शकत नाही. झोपेपर्यंत मेंदू कामात राहिला तर दिवसातून दुपारच्या वेळी कुठलेही काम नाही, कुठलाही विचार नाही, कुठलाही ताण नाही अशा अवस्थेत दहा मिनिटे शरीर-मनाला विश्रांती द्यावी. ताण दूर होण्यासाठी संगीताचा उपयोग होत असल्याने दहा मिनिटे डोळे मिटून संगीत ऐकत ऐकत ताणरहित व्हावे. कितीही काम असले तरी ही दहा मिनिटे काढणे आवश्‍यक असते. कारण यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन मेंदूला पुन्हा ताकद मिळते. 
 

मेंदू चौवीस तास कार्यरत राहू शकत नाही. झोपेपर्यंत मेंदू कामात राहिला तर दिवसातून दुपारच्या वेळी कुठलेही काम नाही, कुठलाही विचार नाही, कुठलाही ताण नाही अशा अवस्थेत दहा मिनिटे शरीर-मनाला विश्रांती द्यावी. ताण दूर होण्यासाठी संगीताचा उपयोग होत असल्याने दहा मिनिटे डोळे मिटून संगीत ऐकत ऐकत ताणरहित व्हावे. कितीही काम असले तरी ही दहा मिनिटे काढणे आवश्‍यक असते. कारण यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन मेंदूला पुन्हा ताकद मिळते. 
 

जीवन सार्थक होण्यासाठी, यश, कीर्ती, संपत्ती, आरोग्य हे सर्व मिळवून जीवनात आनंद मिळविण्यासाठी काय करावे हा विषय आपण पाहिला. आता हे सर्व मिळविण्यासाठी प्रत्यक्ष कृती काय करावी याचा विचार करावा लागेल. कोणावरही भक्‍ती, प्रेम करायचे असेल, त्यातून पुढे येणारी सेवा करायची असेल तर त्यासाठी संबंधित व्यक्‍तीची स्तुती करणे आवश्‍यक असते. त्या व्यक्‍तीचे डोळे सुंदर आहेत, त्याचा पोशाख सुंदर आहे, त्याचे शरीर सुंदर आहे, त्याचे घर सुंदर आहे, तो सुंदर आहे याप्रमाणे ‘अधरं मधुरं, वदनं मधुरं मधुराधिपतेः अखिलं मधुरम्‌’सारखी कल्पना दृढ झाली तरच ती व्यक्‍ती आपल्याला आवडू शकते, त्याच्याबद्दल प्रेम वाटू शकते, त्याची भक्‍ती होऊ शकते. यासाठी प्रार्थना ही सर्व जगात वापरलेली पद्धत आहे. प्रार्थनेमध्ये परमेश्वराची स्तुती केली जाते, परमेश्वराला माहिती नाही म्हणून आपण त्याची स्तुती करत नाही. परमेश्वराने पीतांबर घातलेला आहे असे म्हणत असताना, आपण पीतांबर धारण केलेला आहे हे परमेश्वराला माहिती असतेच. प्रार्थना करत असताना आवडलेल्या गोष्टीची स्तुती कशी करावी हे आपण शिकण्याचा प्रयत्न करत असतो. प्रार्थनेत देवतेची शक्‍ती, व्यक्‍तिमत्त्व, वागणे, जीवन, कार्यशक्‍ती अशा विविध प्रकारे वर्णन केलेले असते. 

यादृष्टीने ‘सोम’ साधनेत सकाळच्या बारा मिनिटांच्या कालावधीमध्ये काही वेळ प्रार्थनेसाठी ठेवलेला आहे. त्याच्या बरोबरीने, आपल्याला अर्थ कळला नाही तरी, ध्वनीच्या माध्यमातून आपल्या शरीरात व मेंदूत बदल व्हावेत, आपली समज बदलावी या हेतूने काही मंत्र दिलेले आहे. सूर्योपासना करण्यापूर्वी प्रगटस्थ अग्नीची उपासना करण्यासाठी पाच मिनिटे दीपध्यान ठेवलेले आहे. दीपध्यानासाठी शुद्ध साजूक तुपाचे निरांजन सर्वोत्तम असते. हे शक्‍य नसले तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दिव्यासाठी कुठल्याही खनिज तेलाचा, खनिज तेलापासून बनविलेल्या मेणाचा उपयोग करू नये. कारण ही द्रव्ये जळल्यानंतर त्यातून निघणारा वायू शरीराला हानिकारक ठरू शकतो. दिवा एक हात दूर, साधारण डोळ्यांच्या पातळीत ठेवून ज्योतीवर ध्यान करावे, ज्योतीवर नजर एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. मधून निमिषार्धभर पापण्या मिटाव्या लागल्या तरी हरकत नसते. एका बाजूने मंत्र ऐकता ऐकता साधारण पाच मिनिटे ज्योतिध्यान करावे. 

आपल्याला "स्व"शी एकरूप व्हायचे आहे. मन व संपूर्ण शरीर एकत्र झाले की नंतर आतल्या परमात्म्याशी एकरूपता साधता येईल. त्यासाठी ॐकाराच्या स्पंदनांचा उत्तम उपयोग होतो. म्हणून ज्योतिध्यानानंतर ॐकार गावा. अशा प्रकारे रोज सकाळी बारा मिनिटांचा कार्यक्रम करावा. यामुळे संपूर्ण शरीराला शक्‍तीची, ज्ञानाची, साक्षीत्वाची जी आवश्‍यकता आहे त्याची पूर्ती होते. 
नंतर लगेच किंवा थोड्या वेळाने सोळा मिनिटांची योगासने असतात. यामुळे शरीरस्थ अग्नीची उपासना होते. पहिली होती बाह्य अग्नीच्या मदतीने अग्नीची केलेली उपासना, तर योगासने करताना होणाऱ्या कृतींमुळे, त्या वेळी शरीराच्या होणाऱ्या गतिमानतेत, क्रियेत बदल झाल्यामुळे शरीरस्थ अग्नीची उपासना होते. यात सूर्यनमस्कार आवश्‍यक असतात. सूर्यनमस्काराबरोबरच स्थैर्य, समर्पण, स्कंधचक्र, शाबास, स्काय भस्रिका ११, लोम-विलोम, अमृत क्रिया यांचाही समावेश आहे. 
मेंदू चौवीस तास कार्यरत राहू शकत नाही. झोपेपर्यंत मेंदू कामात राहिला तर दिवसातून दुपारच्या वेळी कुठलेही काम नाही, कुठलाही विचार नाही, कुठलाही ताण नाही अशा अवस्थेत दहा मिनिटे शरीर-मनाला विश्रांती द्यावी. ताण दूर होण्यासाठी संगीताचा उपयोग होत असल्याने दहा मिनिटे डोळे मिटून संगीत ऐकत ऐकत ताणरहित व्हावे. कितीही काम असले तरी ही दहा मिनिटे काढणे आवश्‍यक असते. कारण यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन मेंदूला पुन्हा ताकद मिळते. 

सायंकाळी पुन्हा प्रार्थना, ज्योतिध्यान करावे (सोळा मिनिटे). सकाळच्या वेळी व रात्रीच्या वेळी गायले जाणारे मंत्र वेगळे आहेत. दिवसभरात स्वतःच्या झालेल्या चुका कबूल करून पुन्हा मी चुका करणार नाही असे ठरवून ‘क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्‍लिन्नचित्त’ हे स्तोत्र म्हणावे. 

रात्री झोपेत योगनिद्रेत जाण्यासाठी स्वतः काही स्तोत्र वगैरे म्हणावे. अशा तऱ्हेने सोमयोगाची योजना केलेली आहे. ताणरहित अवस्थेत राहणे आवश्‍यक आहे हे समजून घेण्यासारखे आहे. उत्तम प्रतीच्या लोखंडालाही ताण दिला तर एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ते तुटते. अतिताणाने संबंध तुटतात, रबर तुटते, सोने तुटते, लोखंडही तुटते. प्रत्येक कामाचा ताण शरीर-मनावर येतो. तेव्हा आपले शरीर किती वेळ ताणावर ठेवायचे, आपण किती ताण सहन करू शकू हे ठरवणे सोपे नाही. तेव्हा मध्ये शरीर-मन ताणरहित करण्याचा प्रयत्न केल्यास मेंदू पुन्हा नव्याने पुन्हा जोमाने कामाला लागतो. रात्री झोपल्यावर, जे स्मृतीत ठेवले होते ते जागच्या जागी लावण्याचे काम मेंदू करतो. तेव्हा झोपेची योगनिद्रेसारखी अवस्था साधण्याची खूप आवश्‍यकता आहे. या पद्धतीने झोपले तर ‘झोप येत नाही’ ही तक्रार राहात नाही. रात्रीचे दीपध्यान झाल्यावर काही तरी म्हणायला लागावे, गुणगुणायला लागावे. झोप केव्हा येईल हे कळणारही नाही. झोप येण्यासाठी टीव्ही पाहणे, पुस्तक वाचणे, मद्य घेणे, औषधे घेणे वगैरे काही करावे लागणार नाही. आपल्याला स्वतः झोपता यायला पाहिजे. ज्याला स्वतः झोपता येते त्याला स्वतःहून उठताही येते. ‘मी उठलो’ असे आपण म्हणतो, पण आपण उठलेलो नसतो, आपल्याला घड्याळाने उठविलेले असते, शेजारच्याने उठविलेले असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Som Yog (5) article written by Dr Shree Balaji Tambe